
River Cleaning Movement : पुणे येथील संदीप आणि सायली जोशी या दांपत्याने १९९८ मध्ये सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट (SERI) ही संस्था स्थापन केली होती. संदीप जोशी यांना ‘पर्यावरण शल्य विशारद’ (‘ग्रीन सर्जन’) म्हणून जगभर ओळखले जायचे. त्यांच्या ‘ग्रीन ब्रिज’ या तंत्रावर तर संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमांनी (यूएनईपी) शिक्कामोर्तब केले आहे.
आंतरराष्ट्रीय जलाशय पर्यावरण समिती (आयलेक) या जपान सरकारच्या समितीबरोबरही ते जलतज्ज्ञ म्हणून काम पाहत होते. आंतरराष्ट्रीय जलाशय परिषद व आंतरराष्ट्रीय पर्यावरण परिषदेतही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. केनिया, झिम्बाब्वे या देशातही त्यांनी पर्यावरण व नदी सुधार योजनेसाठी सल्लागार म्हणून काम केले होते.
त्यांच्या ग्रीन ब्रिज तंत्रज्ञान व नदी सुधारणा क्षेत्रातील कामांबद्दल फिलिपिन्स येथील लॉस बॅनर्स विद्यापीठाने गौरव केला होता. दुर्दैवाने २०१४ मध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने संदीप जोशी यांचे दुःखद निधन झाले. मात्र त्यांच्या पश्चात आजही सायली जोशी यांच्या नेतृत्वात सेरी ही संस्था कार्यरत आहे. गंगा नदीच्या अनेक उपनद्यांवर ग्रीन ब्रिज तंत्रज्ञानाच्या साह्याने शुद्धीकरणाचे काम सुरू आहे.
ग्रीन ब्रिज तंत्राने पाणी प्रदूषण निर्मूलनाच्या कामाची सुरुवात होते ती त्या प्रवाहाविषयी अधिक माहिती गोळा करण्यातून. त्या ठिकाणची संपूर्ण परिस्थितिकी (इकोसिस्टीम) समजून घेतली जाते. पाण्यातील दूषित पदार्थांतील घटक, त्यांचे प्रमाण यानुसार योग्य उद्दिष्ट ठरवले जाते. ते साध्य करण्यासाठी प्रकल्पाची आखणी केली जाते.
विविध हंगामामध्ये प्रवाहाची रुंदी किती आहे? पावसाळ्यात पाणी आल्यावर तो किती पसरतो? त्याचा वेग व विसर्ग किती असतो? हे दूषित पाणी विशिष्ट उंचीला अडवले तर पाण्याचा थोप कोठवर जाईल? त्यामुळे काठावर काय परिस्थिती असेल? प्रवाहाचे पाणलोट (कॅचमेट) कुठून सुरुवात होते, कोठून काय काय वाहत येते? त्यात मिसळले जाणारे दूषित पाणी, औद्योगिक आणि घरगुती सांडपाणी अशा घटकांची नोंद घेतली जाते.
सांडपाण्यातील विविध प्रदूषित घटक, त्यांचे प्रमाण, २४ तासांत त्यांच्या प्रमाणात होणारे बदल, २४ तासांत विसर्गात (discharge) होणारे बदल, त्यामुळे रासायनिक गुणधर्मात होणारे बदल यांचा विचार केला जातो.
प्रत्येक जलस्रोताचे स्वतःचे वैशिष्ट्य असते. तेही लक्षात घ्यावे लागते. उदा. काही प्रवाहात पाणी खूप संथ असते, तर खोली खूप असते. काही नद्यांमध्ये कठीण खडक असतात, तर काही नद्यांच्या तळाशी वाळूचे खूप उंच थर असतात. असे वेगवेगळे टप्प्यात नदी किंवा प्रवाहाची निरीक्षणे नोंदवत मोजमापे घेतली जातात.
यानंतर समजून घ्यावी लागते ती नदीची किंवा प्रवाहाची परिस्थितिकी (इकोसिस्टीम).
प्रत्यक्ष जिथे प्रवाहावर काम करायचे तेथील निसर्गच बरेच काही सांगत असतो. ते ऐकण्यासाठी बारकाईने केलेले निरीक्षण महत्त्वाचे ठरते. प्रत्यक्ष प्रक्रियेमध्ये त्याची खूप मदत होते. उदा. नदीच्या काठावर दिसणाऱ्या पक्ष्यांवरूनही अनेक अनुमान काढता येतात. घार, कावळे, टिटव्या असे पक्षी बहुधा कुजलेले मांस खातात. त्यावरून तिथे मृत मासे मोठ्या संख्येने आहेत, हे समजते. याचा अर्थ नदीची परिस्थितिकी मृतावस्थेकडे निघाली आहे, हे समजू शकते. त्याऐवजी जिवंत मासे खाणारे खंड्या, बगळा या सारखे पक्षी व त्यांची मुबलक संख्या असेल, ती नदी जिवंत आहे असे मानण्यास वाव असतो.
एखाद्या नदीच्या परिसरात पिंपळ, वड, उंबर, करंज व तत्सम वृक्ष खूप कमी असतील किंवा अजिबात नसतील तर त्यांच्या बिजांचे वहन करणारे पक्षी तिथे नाहीत, हे समजावे. हे पक्षी नसण्यामध्ये भारद्वाजासारखे आक्रमक पक्ष्यांची अधिक संख्या कारणीभूत असू शकते. भारद्वाज पक्षी विविध पक्ष्यांना घरट्यातून हुसकून त्यांच्या अंड्याचा फडशा पाडतात. परिणामी, अंतिमतः या पक्ष्यांची संख्या कमी आणि म्हणून त्यांच्या विष्ठेद्वारे वाढणारी वृक्षसंपदाही कमी ही स्थिती असते. जिथे जलपर्णी आहे, त्या पाण्यात फाॅस्फेट, नायट्रेट व तत्सम रसायने आहेत. बेशरम, अळू, कर्दळी भरपूर वाढलेली असेल तर पाणी नक्की दूषित आहे. कारण ही पक्ष्यांशिवाय वाढणारी इकोसिस्टीम आहे.
नदी पात्राबाहेर, पण लगतच्या भागात विविध कीटकांसह बरेच जीव दिसतात. उदा. विंचू, सरडे, गोम, छोटे साप इ. दगड किंवा त्यांच्या खोबणीत आढळतात. असे छोटे सरपटणारे प्राणी नदीकाठच्या भागात असल्यास तिथली प्रदूषणाची पातळी खूप कमी असल्याचे स्पष्ट होते. ते दिसत नसल्यास त्यांचा आहार असलेले कीटकही नाहीत. म्हणजेच ती जागा प्रदूषित आहे.
नदीकाठांवर, पाण्यातल्या जलपर्णीवर, पाण्यात पडलेल्या व सडलेल्या कचऱ्यांवर अनेक प्रकारच्या बुरशी उगवतात. अति प्रदूषित पाण्यातही अनेक बुरशी येतात. या जैवनिदर्शकांमुळे (बायोइंडीकेटर) आपली प्रवाहाबद्दलची समज वाढते. त्यातून त्या त्या प्रवाहाची नेमकी समस्या काय आहे, हे स्पष्ट होते. त्यावर त्यांच्या जैवसुधारणा प्रक्रियेचा (बायोरिमिडिअल ट्रिटमेंट) आराखडा ठरवला जातो.
‘बायोकल्चर’ मध्ये काय असते?
बायोकल्चरमध्ये काही एकपेशीय प्राणी (म्हणजेच प्रोटोझोआ), शेवाळे, बुरशी आणि विशिष्ट जिवाणू यांचा एक समुच्चय केलेला असतो. त्यासाठी तांत्रिक व शास्त्रीय भाषेत ‘कन्सोर्शिया ऑफ बॅक्टेरिया’ असे म्हणतात. यातील काही जिवाणू पाण्यातील रसायने खातात, त्यांचे विघटन करून तुटण्यास अवघड अशा रेणूंच्या साखळ्या तोडतात. त्यातून एक अन्नसाखळी सुरू होते. कारण या मृत जिवाणू किंवा त्यांच्या टाकाऊ भाग एकपेशीय प्राणी (प्रोटोझोआ) खातात.
तसेच मृत होणाऱ्या जिवाणू किंवा एकपेशीय प्राण्यांवर जगणाऱ्या बुरशी वाढतात. त्यांचे विघटन होत असताना त्यात शेवाळांचीही वाढ होत असते. पुन्हा या प्रकारचे शेवाळ जिवाणूंचे खाद्य म्हणून उपयोगी असते. या जिवाणूंवर जगणारे छोटे मोठे कीटक व अन्य अन्नसाखळी वाढत जाते. अन्न साखळीत घटकांची जागा बदलू शकते.
जिवाणू म्हटले जाहिरातींमुळे आपल्या मनात विनाकारण नकारात्मक भावना तयार होते. पण निसर्गामध्ये ९० टक्के जिवाणू माणूस व निसर्गासाठी उपयुक्त आहेत, हे लक्षात ठेवावे. ते निसर्गातील जवळजवळ सर्वच घटकांचे (अगदी धातूंचेही) विघटन करतात. त्यामुळे निसर्गातील निर्मिती, जन्म, मृत्यू, विघटन यांचे एक संतुलन राखले जाते.
वनस्पतींच्या मुळाभोवती राहून झाडांना मातीतून अन्न उपलब्ध करण्याचे कामही जिवाणूच करतात. अगदी वर पानांसोबत राहून प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेमध्येही मोलाची मदत करणारे जिवाणू आहेत. म्हणजे वनस्पतीच्या जगण्यामध्ये, अन्न निर्मितीमध्ये जिवाणू महत्त्वाचे आहे. अन्नसाखळीची सुरुवात जिवाणूंपासून होऊन ती मोठमोठ्या भक्षक प्राण्यांमध्ये विस्तारते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे.
प्रदूषण म्हणजे नेमके काय?
प्रदुषणातील रसायनांमुळे याच तळातील सूक्ष्मजिवांच्या अन्नसाखळीची विल्हेवाट लागते. या अन्नसाखळीचे असंतुलन म्हणजे प्रदूषण असेही उलटे म्हणता येईल. ही बाब जमीन, पाणी, हवा आणि अन्न या सगळ्या प्रदूषणाला लागू होते. कारण निसर्ग रचना नेहमी संतुलनाकडे प्रवास करत असते. त्या दिशेनेच सगळ्या नैसर्गिक प्रक्रिया चालतात. पाणी प्रदूषित होते म्हणजे काय, तर तेही इकॉलॉजिकल टाॅक्झिसिटी वाढते. पाण्यातील या सूक्ष्मजीवांच्या वसाहती विस्कळित होतात. त्यातून सारेच असंतुलित होत जाते.
सृष्टी तंत्रज्ञान नक्की काय करते ?
ज्यात सुधारणा करायची आहे, तिथे त्या त्या स्थानिक स्थितीनुसार योग्य अशी सूक्ष्मजीवांची वसाहत आणि एकूणच अन्नसाखळी पुनर्प्रस्थापित करण्याचे काम सृष्टी तंत्रज्ञानाद्वारे केले जाते. ही पुनर्स्थापित केलेली इकोसिस्टीम पुढे स्वतःला संतुलित करण्याचे काम करते. पर्यावरणातील विषारी घटक कमी करण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी त्या त्या रसायनांमध्ये वाढणारे, त्यांचे विघटन करणारी जिवाणू समुच्चय तिथे वाढवले जातात.
प्रदूषित पाण्यातील रसायनांचे काही रेणू कमी गुंतागुंतीचे तर काही रेणू खूप गुंतागुंतीचे असतात. जास्त गुंतागुंतीची रचना असलेल्या घटकांना ‘हेवी मेटल्स’ म्हणतात. पण जवळजवळ सर्वच रेणूमध्ये नायट्रोजन (N), हायड्रोजन (H), ऑक्सिजन (O), कार्बन (C) हेच घटक असतात. यांच्या विविध संरचनेतील साखळ्या व त्यातील बंध तोडण्याचे काम जिवाणू करतात. हीच त्यांची मुख्य भूमिका.
कठीण गुंतागुंतीच्या रेणूंच्या साखळ्या तुटल्यानंतर कमी गुंतागुंतीच्या रेणू तयार होत त्यांचे विघटन सुरू होते. या प्रत्येक टप्प्यावर विघटन करण्याचे काम जिवाणू करतात. त्यांना जोपर्यंत खाद्य उपलब्ध आहे, तोपर्यंत त्यांची वाढ होत राहून विघटनाचे काम वेगाने होत राहते. दूषित पाण्यातील घटक जसे बदलत जातात, तसे जिवाणूंचे प्रकारही बदलले जातात. प्रवाहाच्या प्रमाणानुसार जिवाणूंची संख्या किंवा कल्चरचे प्रमाणही ठरवले जाते.
यात एक महत्त्वाचे पथ्य पाळावे लागते, ते म्हणजे त्यात प्लॅस्टिक किंवा अन्य घन कचरा येऊ न देण्याचे. यातील विघटनाच्या प्रक्रियेत तयार होणारा ऑक्सिजन व बॅक्टेरिया समुच्चयाच्या श्वसनातून येणारा आॅक्सिजन पाण्यात विरघळत राहतो. त्या विषयी बोलताना सायली जोशी नेहमी आपल्या शरीरातील किडनीचे उदाहरण देतात. त्यांच्या मते, बायोरिमिडियल पद्धती ही जणू किडनीला कार्यक्षम करण्यासारखे आहे. पुढील शुद्धीकरणाची प्रक्रिया आपोआप होत राहते. त्याऐवजी सिवेज ट्रीटमेंट किंवा इफ्युलंट ट्रिटमेंट प्लांट हे डायलिसिस केंद्रासारखे काम करतात.
‘ग्रीन ब्रिज’ म्हणजे काय?
क्षितिज समांतर जैविक गाळणी (इको फ्रेंडली फिल्टर ) असे याचे स्वरूप आहे. जलाशयांच्या शुद्धतेसाठी संबंधित जलाशयांनीच विकसित केलेल्या जैविक प्रक्रिया असेही त्याला म्हणता येईल. (ग्राफ्टिंग ऑफ इकोसिस्टीम फॉर द रिव्हायल ऑफ सेल्फ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर बाॅडी). नदी जिवंत मानली तर तिच्या स्वतःच्या काही अंतर्गत प्रक्रिया असतात. प्रदूषणामुळे त्या बंद पडतात, त्या प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते.
प्रवाहाला काही प्रमाणात अडवणारी पर्यावरण पूरक जैविक गाळणी (ग्रीन ब्रिजेस) लावली जाते. त्यात सूक्ष्मजीवांसह अनेक जैविक घटकांचा (बायो कल्चर) वापर केला जातो. या जैविक गाळण्यांचा आकार नदीचा प्रवाह, त्यातल्या सांडपाण्याचे प्रमाण, प्रदूषणाचा स्तर यावर ठरवला जातो. या साऱ्या बाबी नदीपात्रातच उभारल्या जात असल्यामुळे प्रकल्पासाठी कोणतीही अतिरिक्त जागा लागत नाही. कोणतीही ऊर्जा, यंत्रे, रसायने किंवा अनावश्यक बांधकामे यांची गरज नसते. सुरुवातीच्या काळाव्यतिरिक्त देखभालीसाठी मनुष्यबळही फारसे लागत नाही.
अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर शेतात नुसती दगडे रचून ताली बांधतो, तसेच नदीच्या प्रवाहात उभारायच्या. गरज असेल त्याला आधारासाठी जाळी बांधायची. म्हणजे गॅबियन बंधाऱ्याचे रूप द्यायचे. प्रवाहाकाठी, प्रवाहात छोटे बेट असेल तिथे काही झाडाझुडपांची लागवड, सगळ्यात मुख्य म्हणजे निवडक जिवाणू समुच्चय (बॅक्टेरीया कंन्सॉर्शिअम) यांची बांधणी करायची. या सूक्ष्मजिवांच्या वाढीसाठी काही काळासाठी तरी दूषित प्रवाहाचा वेग कमी करून स्थिर ठेवणे गरजेचे असते.
त्यासाठी आवश्यकता असल्यास प्रवाह थोडाबहुत वळवून, त्यातील वाहणारा प्लॅस्टिक व तत्सम घन कचरा अडवण्यासाठी काही झाडे झाडे झुडपे लावावी लागतात. खालील वाळू किंवा मातीला आधार द्यावा लागतो. त्यासाठी दगडी ताली किंवा गॅबियन बंधारासदृश संरचना उपयोगी ठरतात. बरे ही झाडे झुडपेही दूषित पाण्यात वाढणारी, पुरामध्येही तग धरणारी निवडली जातात. त्यांच्या मुळांच्या श्वसनामुळे दूषित पाण्यात ऑक्सिजन मिसळत राहतो.
- सतीश खाडे , ९८२३०३०२१८,
(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ या पुस्तकाचे लेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.