
Government Policies on Cows: गाय हा उपयुक्त पशू आहे, याबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. आपल्या उपयोगाचा, कामाचा प्राणी असल्यानेच शेकडो वर्षांपासून शेतकरी गोपालन करीत आले आहेत. त्यातून त्यांना शेतीच्या कामासाठी चांगले बैल मिळत, गायीचं दूध मिळे. दही, ताक, तुपाची गरज त्यावर भागत होती. वयस्कर झालेली गाय कोणी मरेपर्यंत सांभाळत होतं, तर कोणी खाटकाला विकत होतं. पाप-पुण्याची भावना व्यक्तिगत पातळीवर होती, तोपर्यंत गायीला चांगले दिवस होते. मात्र काही लोकांनी गायीला पवित्र प्राणी नव्हे, माता बनवायला सुरुवात केली.
गोहत्येवर बंदी घालण्याची मागणी करणारे मूठभर लोक स्वातंत्र्यपूर्व काळापासून होते. त्यात कट्टर हिंदुत्ववाद्यांपासून भाबडे सर्वोदयवादी, गांधीवादीही होते. हा विषय केवळ भावनिक बनवला गेल्याने अनेक राज्यांत गोहत्याबंदीचा कायदा आला. वास्तविक महाराष्ट्रात १९७६ पासूनच गोहत्येवर निर्बंध लागू आहेत. थोडक्यात, तेव्हापासूनच गायीच्या हत्येवर बंदी आहेच. परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये सुधारित गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यामुळे गायींबरोबरच बैल, वळू, खोंड हा गोवंशही कायद्याच्या कक्षेत आला. त्यामुळे गायीला माता मानणाऱ्यांना पुण्यकर्म केल्याचं समाधान मिळालं असावं. मात्र या कायद्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. गायीच्या प्रेमाखातर केलेला हा कायदा प्रत्यक्षात गायींची संख्या वाढण्याला मारक ठरला. गोरक्षक म्हणवणारेच एका अर्थाने गायीच्या मूळावर आले आहे.
गायीला माता मानणारे काही भाबडे आहेत. बाकी बहुतेक जणांचा हा धार्मिक आणि राजकीय कावा आहे. हे सगळे गायीचे शत्रू आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांनी हळूहळू गायी पाळणं कमी केलं. कारण गायी पाळणं ही कायदेशीर जोखीम बनली. त्यातून गावोगाव टुकार गोभक्त जन्मले. त्यांनी गायींचा व्यापार करणाऱ्यांना मारहाण करायला, ब्लॅकमेल करून पैसे उकळायला सुरुवात केली. गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना अडवून, जमावाकडून मारहाण केली जाऊ लागली.
या सगळ्यांचा परिणाम गायींच्या व्यापारावर झाला. बाजारातील गायींचे व्यापारी कमी झाले. गायींना योग्य किंमत मिळेनाशी झाली. त्याचा विपरीत परिणाम गोपालनावर झाला. प्रजननक्षम गाय, म्हैस असो की बैल; कुठलाच शेतकरी ते खाटकांना विकत नाही. कारण ते उत्पन्नाचं साधन आहे. मात्र म्हातारी गाय असो की बैल; त्यांना मरेपर्यंत गोठ्यात सांभाळणं अपवादात्मक शेतकऱ्यालाच शक्य होतं. कारण हा केवळ चारा-पाण्याचा प्रश्न नाही. आजारी, वृद्ध जनावरं सांभाळणं, त्यांच्यावर औषधोपचार करणं, त्याच्या मरणाची प्रतीक्षा करणं हे आर्थिक व भावनिकदृष्ट्या न परवडणारं, मानसिक खच्ची करणारं आहे.
मरणाच्या दारातील जनावरांची आपल्या ज्येष्ठ आई-वडिलांशी तुलना करून भावनिक वाद घालणारे लोक हे शेतकरी नाहीत. ते गोपालकही नाहीत. त्यांचं गोप्रेम हे नाटक, ढोंग आहे. त्यांना या प्रश्नावरून केवळ राजकारण करायचंय. मात्र यामुळं नुकसान झालंय, होतंय ते गायीचं आणि शेतकऱ्यांचं. महाराष्ट्र सरकारने केलेला गोवंश हत्या बंदीचा कायदा मूर्खपणाचा कळस आहे. यामुळे शेतकऱ्यांचा गोपालनाबरोबरचं, बैल पालनाचाही उत्साह कमी झाला आहे.
एका बाजूला सरकारी धोरण असे, तर दुसऱ्या बाजूला पशुपालनासाठी शेतीत अनुकूल परिस्थिती राहिलेली नाही. खास जनावरांच्या चाऱ्यासाठी गावोगाव राखून ठेवलेली गायरान जमीन केव्हाच इतिहासजमा झालीय. त्यामुळे परंपरागत चारा संपला. खासगी मालकीची बहुतांश जमीन ही प्रत्येक शेतकऱ्याची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्यामुळे प्रत्येक पिढीत जमिनीचे तुकडे पडत जातात. ते रोखणं कोणालाही शक्य नाही. आज ८० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यातही स्वत: कसणारे शेतकरी अत्यल्प.
याचे कारण दोन-अडीच-तीन एकर जमीन कसणं कोणाही शेतकऱ्याला परवडणारं नाही. तो शेतगडी ठेवू शकत नाही की बैल. हा सगळा अल्पभूधारक शेतकरीवर्ग त्याची जमीन भाड्याच्या ट्रॅक्टरने कसून घेतो. याचा मोठा फटका गायींना बसला. शेतीसाठी बैल मिळतात म्हणून, शेतकरी मोठ्या कौतुकाने जातिवंत गायी सांभाळायचे. आता बैलच लागणार नसतील, तर गायी सांभाळायच्या कशासाठी?
गायीपेक्षा म्हैस सांभाळणे छोट्या शेतकऱ्यांना अधिक सोयीचं आहे. म्हशीच्या दुधाचे चांगले पैसे होऊ शकतात. म्हैस भाकड झाली, की ती खाटकाला विकली तर त्याचेही काही पैसे मिळतात. त्यात आणखी काही पैसे घालून नवीन दुधाची म्हैस घेता येते. म्हशी, वगारी मोठ्या संख्येने कटाईसाठी जातात, तरीही त्यांची संख्या वाढतेच आहे. याचे उत्तर अर्थकारणात आहे. ज्या जनावरांतून शेतकऱ्यांना डोकेदुखी न होता चार पैसे मिळतील, तेच जनावर ते सांभाळणार.
गाय भाकड झाल्यावर तिचं करायचं काय, हा अवघड प्रश्न आहे. गोवंश हत्याबंदी कायद्याने गाय सांभाळणं अधिकच कठीण बनवलंय. बैलांनाही मांसासाठी चांगली मागणी आहे; पण इथं गोवंश हत्याबंदीचा कायदा आडवा येतो. अशा वेळी केवळ दुधासाठी किंवा कोणीतरी अर्धवट शहाणा गोमूत्राचे महत्त्व सांगतोय म्हणून कुठलाही शेतकरी गाय सांभाळणार नाही. जाचक बंधनं, अडचणीचे कायदे असताना कुठलाही व्यवसाय वाढू शकत नाही, ही साधी बाब आहे. गाय व गोवंश हत्येवर बंदी घातल्यामुळे गायींची व बैलांची संख्या वाढेल, असा दावा करणारे दीडशहाणे आहेत. आज त्यांचा दावा वास्तवात खोटा ठरला आहे.
कोंबडी आणि बकरीचं उदाहरण याबाबतीत पुरेसं बोलकं आहे. दरवर्षी लाखो नव्हे तर करोडो कोंबड्या, बकऱ्या खाण्यासाठी कापल्या जातात. त्यांचा वंश केव्हाच संपायला हवा होता. पण चित्र उलट आहे. कुक्कुटपालन, शेळीपालनाचा व्यवसाय देशभरात भरभराटीला आलाय. याचे कारण हा व्यवसाय करणाऱ्यांना त्याचे चांगले पैसे मिळतात. कोंबड्या, बकऱ्यांना हक्काचे गिऱ्हाईक आहे. देशभरचा बाजार आहे. माल चांगल्या किमतीला विकला जाईल याची खात्री आहे.
त्यामुळे या उद्योगात जसे छोटे शेतकरी आहेत तशाच बड्या कंपन्याही आहेत. कारण या व्यवसायात जाचक कायदे नाहीत. हा व्यवसाय खुला आहे. याउलट केवळ जाचक कायदे व जनमानसाच्या भोंगळ भावनिकतेमुळे पशुपालनाचा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे शेती व्यवसायाचं, एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेचं किती मोठं नुकसान होत आहे, याची बैलबुद्धी गोभक्तांना जाणीव नाही. ती त्यांना होणारही नाही.
याचं कारण गायीला गोमाता बनवण्याचे सगळे चटके शेतकऱ्यांना बसत आहेत. गोभक्तांना ना गाय सांभाळायचीय ना गोवंश वाढवायचाय. सगळा बोलाचा भात, बोलाचीच कढी. मात्र जेव्हा खुद्द सरकारच गोभक्ताच्या भूमिकेत वावरू लागतं, तेव्हा पशुपालनाला चांगले दिवस येणं हा भाबडा आशावाद ठरतो.
मी २०११ पासून आजूबाजूच्या जनावरांच्या बाजारांचा बारकाईने अभ्यास करतोय. दर वर्षी बैलांची संख्या कमी होत चाललीय. गत वर्षीचा बाजार या वर्षीपेक्षा चांगला होता, असंच म्हणण्याची पाळी प्रत्येक वर्षी येतेय. गेल्या चार वर्षांत गायींची संख्या तर दखलपात्रही राहिलेली नाही. म्हशींच्या भल्या मोठ्या बाजारात एका कोपऱ्यात पाच-दहा गायी, कालवडी असतात. एका बाजूला म्हशींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना, गायींची संख्या का रोडावत चाललीय, या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर शोधलं तर त्यावर मार्ग निघू शकतो.
अन्यथा येत्या काही दशकांत गाय आणि बैल हे प्राणी दुर्मीळ होऊन जातील. वीस वर्षांपूर्वीची स्थिती बघितली तर त्या तुलनेत आज फक्त दहा टक्के शेतकऱ्यांकडेच बैल आहेत. सालगड्यांची व मजुरांची चणचण बघता ही संख्या आणखी रोडावत जाणार आहे. गायींच्या तुलनेत म्हशी सांभाळणे अधिक सोपं, सोयीचं आहे. गाय, बैलांना जर म्हशींपेक्षा चांगले पैसे मिळू लागले, त्यासाठी विशेष प्रयत्न केले गेले तरच शेतकरी गोपालनाकडे वळतील. गोशाळेत किंवा पांजरपोळात गायींची पैदास वा संवर्धन होऊ शकत नाही.
हा प्रश्न सोडविण्याचा एकमेव उपाय म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा तातडीने रद्द करून जनावरांचा व्यापार पूर्णपणे मुक्त करणं. जनावरं कोण खरेदी करतोय, ती कटाईला जातात की आणखी कशासाठी, याची उठाठेव बंद करा. गाय ही माता नाही तर, ती उपयुक्त पशू आहे; म्हणून इतर पशूंप्रमाणेच तिची योग्य देखभाल, संगोपन करावे. असं झालं तर पशुपालनाला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात.
या व्यवसायात कंपन्या, उद्योजक उतरू शकतात. जनावरांना बाजारात चांगल्या किमतीचे हमखास गिऱ्हाईक मिळणार असेल तर शेतकरी स्वतःहून पशुपालन करतील. मग शेतकऱ्यांना पशुपालन करा म्हणून शहाणपणा शिकवण्याची गरज उरणार नाही. पशुपालनाला अडथळे ठरतील असे कायदे करायचे, व्यवसायावर निर्बंध लादायचे आणि वर पशुपालन करण्याचा साळसुद सल्ला द्यायचा, हे ढोंग आहे. या ढोंगाला शेतकरी फसणार नाहीत, हे मात्र नक्की.
एका बाजूला सरकार सेंद्रिय शेतीच्या वल्गना करीत असताना दुसऱ्या बाजूला पशुधनाची संख्या चिंतनीय पातळीवर कमी होत चाललीय, ही बाब सरकारच्या धोरणाचे पितळ उघडे पाडते. पशुधन वाढवण्यासाठी सर्वंकष मदतीचं धोरण राबविलं तरच ही परिस्थिती बदलू शकते. पण राज्य सरकारला याचं काहीच पडलेलं नाही. देशी गायीला ‘राज्यमाता गोमाता’ जाहीर करण्याचा बैलबुद्धी निर्णय घेण्यापलीकडे त्यांची धाव जात नाही.
शंकराचार्यांनी आदेश दिल्यामुळे देशी गायीचे नामकरण करण्याचा धाडसी निर्णय घेऊ शकलो, असं दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. यात कसलं आलं आहे धाडस? खरं तर गायींच्या संवर्धनापेक्षा धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करण्यात सत्ताधाऱ्यांना जास्त रस आहे, याची ती जाहीर कबुली म्हणावी लागेल. राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे देशी गायींच्या संख्येत मोठी घट झाली, ही वस्तुस्थिती आहे. गायीबद्दल सरकारचं प्रेम खरं असेल आणि नियत साफ असेल, तर हा कायदा रद्दबातल करण्याचं धाडस सरकार दाखवणार का? त्यासाठीचा साक्षात्कार कधी होणार?
महारुद्र मंगनाळे ९४२२४६९३३९, ९०९६१३९६६६
रुद्राहट, ता. अहमदपूर, जि. लातूर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.