Kokankanyal Goat : कोकणात शेळीपालनाची नवी क्रांती ; कोकणकन्याळ शेळीची पैदास अन् संवर्धन

Goat Farming : दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निळेली येथील पशू संशोधन केंद्राने शेळीची कोकणकन्याळ ही जात विकसित केली. सन २०१० मध्ये ही जात प्रसारित झाल्यानंतर आत्तापर्यंत १४०० हून अधिक जातिवंत शेळ्या- बोकडांची विक्री झाली आहे.
Goat Farming
Kokankanyal Goat Breed Agrowon
Published on
Updated on

Indigenous Goat Breed : प्रचंड पावसाचा प्रदेश अशीच कोकणची ओळख आहे. पावसाळ्यात साडेचार हजार मिमीपर्यंत पाऊस येथे होतो. तर उन्हाळ्यात ३८ अंशांपर्यंत तापमान वाढते. पशुधनाच्या अनुषंगाने सांगायचे तर कोरडवाहू किंवा जिरायती भागात अनुकूल ठरणाऱ्या शेळ्यांच्या जातींनी म्हणूनच कोकणात तितका तग धरला नाही.

अनेक शेतकऱ्यांनी अगदी राज्याबाहेरूनही शेळ्या आणल्या. आवश्यक कृत्रिम वातावरण निर्मिती करून प्रयत्नपूर्वक त्यांचा सांभाळ केला. मात्र बहुतांशी शेतकऱ्यांच्या पदरी शेळीपालनात अपयश आले. काही शेतकरी कर्जबाजारी झाले. त्यामुळे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने कोकणातील हवामानाला अनुकूल अशी शेळीची जात विकसित करण्याचे मनावर घेतले.

संशोधनास मिळाली चालना

विद्यापीठांतर्गत निळेली (ता. कुडाळ) येथील पशू संशोधन केंद्राकडून शेळीच्या जातीवर संशोधन सुरू झाले. यातील शोधकार्यात दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ भागांतील स्थानिक शेळ्यांच्या कळपांमध्ये काही शेळ्या, बोकडांमध्ये वेगळेपण दिसून आले. केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. कविटकर, डॉ. एस. जी. शिरसाट, डॉ. सी. व्ही. भांबुरे यांच्या पथकाला त्यातून चालना मिळाली.

कळपातील काही शेळ्या, बोकड यांचा चेहरा, मान आणि कानावर काळ्या रंगासह पांढरी किनार होती. त्यांची संशोधनासाठी निवड करण्यात आली. सतत सहा वर्षे काम सुरू होते. यात बी. जी. देसाई, डी. एन. यादव, डॉ. एम. ए. गोवेकर, डॉ. एस. टी. थोरात, डॉ. आर. जी. बुर्टे, डॉ. एस. ए. चव्हाण यांचे योगदान होते. अखेर शेळीची जात विकसित करण्यास शास्त्रज्ञांना यश आले.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालन, पोल्ट्रीतून उंचावली अर्थव्यवस्था

नवी जात म्हणून शिक्कामोर्तब

सन २००४ मध्ये ‘संयुक्त ॲग्रेस्को’मध्ये जातीच्या मान्यतेसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला. परंतु शास्त्रीयदृष्ट्या नवी जात सिद्ध होण्यासाठी आवश्‍यक गुणधर्माची किमान एक हजार वेगवेगळी निरीक्षणे आणि त्यांचे पृथक्करण या बाबींची आवश्यकता असते. पुढील सहा वर्षामध्ये हे संशोधनात्मक कार्य पूर्ण करण्यात आले. सन

२०१० मध्ये संयुक्त ॲग्रेस्कोमध्ये कोकणकन्याळ या नावाने ही जात प्रसारित करण्यात आली. कोकणातील उष्ण व दमट वातावरण तसेच अति पर्जन्यमान भागामध्ये तग धरणारी जात असे तिचे वैशिष्ट्य आहे. कोकणातील ही संशोधित पहिलीच जात ठरली. कर्नाल- हरियाना येथील ‘राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो’कडे २२ व्या अनुक्रमाने या जातीची नोंदही झाली. कोकण कन्याळ जातीशी साधर्म्य असलेली तमिळनाडू येथे कनियाडू ही शेळीची जात आहे. त्यामुळे ‘ब्यूरो’च्या शास्त्रज्ञांनी २००८ आणि २००९ मध्ये दोन वेळा निळेली येथे भेट दिली होती. त्या वेळी दोन्ही जातींमध्ये फरक असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला होता.

Goat Farming
Goat Farming : शेळीपालनात दोन वर्षाला तीन वेत कसे मिळवाल?

पैदास अन् प्रसार

विद्यापीठाने या जातीचे संशोधन करण्याबरोबरच तिचे संवर्धन व पैदासही सुरू केली आहे. निळेली तसेच कृषी तंत्र विद्यालय लांजा, पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, दापोली, मध्यवर्ती संशोधन केंद्र वाकवली, कृषी विज्ञान केंद्र, रोहा (रायगड) आदी सहा ठिकाणी कोकणकन्याळ शेळीची पैदास केंद्रे स्थापन केलेली आहे. विविध चारा पिकांची लागवडही करण्यात आली आहे. पैदाशीसाठी नर प्रति किलो ४०० रुपये, तर शेळी ५०० रुपये या दराने विक्री केली जाते.

आत्तापर्यंत १४०० हून अधिक जातिवंत शेळ्या- बोकडांची विक्री झाली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, गोवा येथील वातावरणात ही जात पोषक असल्याने तेथून मागणी आहे. गोवा येथील ‘आयसीएआर’च्या केंद्रामार्फत २०२३ मध्ये ही शेळी लक्षद्विप येथे नेण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. कविटकर म्हणतात, की कोकणात या जातीच्या रूपाने शेळीपालन व्यवसायासाठी मोठा वाव आहे. ‘राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो’ यांच्याकडून कोकणकन्याळ जातीच्या संशोधनाला नस्ल संरक्षण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

शेळीपालकाचा अनुभव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कडावल येथील शेतकरी राजू सावंत कोकणकन्याळ शेळीचे संगोपन करतात. ते सांगतात की कोकणातील ऊन, वारा,थंडी आणि पाऊस यांचा कोणताही परिणाम तिच्यावर होत नाही. अतिशय काटक असल्यामुळे ती डोंगरदऱ्यात सहज वावरते. येथील वातावरणातील पैदास असल्यामुळे आरोग्यावर फार खर्च येत नाही.

मी वर्षभरात एकदाही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासाठी बोलाविलेले नाही. माझ्याकडील १४ महिने वयाच्या बोकडाचे ३६ किलो तर १० महिन्याच्या बोकडाचे वजन ३२ किलोपर्यंत मिळाले आहे.

शेळीच्या दुधाचे प्रमाणही अन्य देशी शेळींच्या तुलनेत खूप चांगले आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी ही जात अत्यंत उपयुक्त आहे. तिची कांती तजेलदार आहे. बंदिस्त, अर्धबंदिस्त आणि मुक्त अशा तिहेरी पद्धतीने तिचे पालन करता येऊ शकते. योग्य व्यवस्थापन, हिरवा चारा आणि वेळच्या वेळी देखरेख केली तर ही शेळी चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते.

कोकणकन्या शेळीची वैशिष्ट्ये

  • जन्मतः करडाचे वजन २.०९ किलो, तर एक वर्षे वयाचे वजन २२.४१ किलो.

  • पूर्ण वाढ झालेल्या मादीचे ३२ किलो, तर नराचे वजन ४९.९९ किलो.

  • मरतुकीचे प्रमाण ३.६ टक्के.

  • मादीचे वयात येण्याचे वय ३२९.२५ दिवस.

  • दोन वेतांतील अंतर ७.५ महिने.

  • दोन करडांचे प्रमाण ४० टक्के, तर तीन करडांचे प्रमाण ०.३ टक्का.

  • स्थानिक शेळीपेक्षा उंच, काटक आणि आकाराने मोठी.

  • कान लांब, लोंबकळणारे, चपटे. चेहरा, मान आणि कानांवर काळ्या रंगासह पांढरी किनार.

  • कपाळ पसरट आणि रुंद.

  • मादीचा बांधा मोठा. त्यामुळे एकापेक्षा जास्त करडे गर्भाशयात जोपासण्याची क्षमता.

  • परिपक्व नराची सरासरी उंची ८७.२ सेंमी, तर मादीची उंची ६९.६ सेंमी.

  • पाय मजबूत, काटक, खूर टणक व उंच.

  • मांस उत्पादनासाठी उत्तम. स्वादिष्ट. दीड वर्षाच्या बोकडाच्या मटणाचा उतारा ५३ टक्के.

  • खुल्या व बंदिस्त अशा दोन्ही पद्धतीने वाढविता येते.

डॉ. व्ही. एस. कविटकर ९४२०७४०९००

पशुवैद्यकीय अधिकारी, पशू संशोधन केंद्र, निळेली ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com