Lal Kandhari Cow : लालकंधारी गोवंशाच्या सेंद्रिय खताने शेती समृद्ध

Organic Farming : नांदेडपासून सुमारे चाळीस किलोमीटरवर असलेल्या सायाळ (ता. लोहा) येथील चंदनसिंग हरिसिंग ठाकूर यांच्याकडे सुमारे सत्तर एकर शेती असून, त्यासाठी आवश्यक शेणखत ते गेल्या काही वर्षापासून लालकंधारी गोवंश पालनातून मिळवत आहेत. या सेंद्रियखताच्या उपलब्धतेमुळे उत्पादनात वाढ मिळाली असून, शेती समृद्ध झाली आहे.
Indigenous Cow
Lal Kandhari Cow Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : वडील हरिसिंग ठाकूर (सध्या वय ९० वर्ष) हे गेल्या सात वर्षापूर्वीपर्यंत संपूर्ण शेती पाहत होते. २०१८ पासून चंदनसिंग यांच्याकडे शेतीचे व्यवस्थापन आले. पूर्वीही त्यांच्याकडे लालकंधारी गाई असल्या तरी चंदनसिंग यांनी हळूहळू त्यात वाढ करत नेली.

२०२० पर्यंत दोन वर्षात लहान-मोठी चाळीस जनावरे जमवली. या जनावरांपासून मिळणाऱ्या शेणखतामुळे दरवर्षी पंचवीस एकर क्षेत्रासाठी सेंद्रिय खताची पूर्तता होते.

आजही उर्वरीत क्षेत्रासाठी काही प्रमाणात (सुमारे २५ टक्के) खते विकत घ्यावी लागतात. गोवंश पालनामुळे भरपूर सेंद्रिय खत उपलब्ध होत असल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.

अडीच हजार चौरस फुटाचा गोठा

चाळीस लालकंधारी गाईंसाठी ६० फूट बाय ४० फूट आकाराचा गोठा उभारला आहे. यात दुधाळ जनावरे, गाभण जनावरे, मोठे नर व वासरे यांना बांधण्यासाठी स्वतंत्र जागा केलेल्या आहेत. गोठ्यातच वीस हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा हौद बांधला आहे. गोठ्यात दगडी फरशी टाकून घेतली असून, ती स्वच्छतेच्या दृष्टीने चांगली पडते.

तसेच त्यावर जनावरांचे पाय घसरत नाहीत. जनावरांना चारा देण्यासाठी प्लॅस्टिकच्या टाक्या ठेवल्या असून, त्यातून सुका आणि हिरवा चारा प्रमाणात दिला जातो. चंदनसिंग ठाकूर यांच्याकडे पाच सालगडी आहेत. यात चारजण शेतीची कामे, तर एक व्यक्ती जनावरांची देखभाल करतो.

सकाळी पाचपासून कामाची सुरुवात

गोठ्यातील कामाची सुरुवात सकाळी पाच वाजता शेण काढण्यापासून होते. सध्या दूध देणाऱ्या आठ गायी, गाभण दहा गायी आहेत. सहा वाजता वासरांना सोडून दूध काढले जाते. एका वेळेस केवळ दहा लिटर दूध काढून बाकी सर्व दूध वासरांना सोडले जाते.

यामुळे वासरांची वाढ जोमदार होते. निरोगी गोधन उपलब्ध होत असल्याचे चंदनसिंग सांगतात. दूध काढल्यानंतर जनावरांना हिरवा तसेच वाळला चारा दिला जातो. यानंतर हौदाचे पाणी जनावरांना पाजून सकाळी दहा वाजता त्यांना चरण्यासाठी सोडले जाते.

सायंकाळी चार वाजता जनावरे चरून आल्यानंतर गोठ्यात बांधली जातात. यानंतर पाच वाजता जनावरांना वाळला चारा दिला जातो. यानंतर वासरांना सोडून दूध काढले जाते. यानंतर पुन्हा एकदा चारा दिला जातो.

पाच महिने गोठ्याबाहेर

पावसाळा आणि हिवाळ्याचा काळ संपल्यानंतर जनावरांना गोठ्याच्या बाहेर शेतात बांधले जाते. रब्बीची पिके निघताच ही जनावरे शेतात बांधून शेतीला खत दिले जाते. शेतात बांधल्यामुळे जमिनीला शेणखतासह गोमूत्रही मिळते.

यामुळे जमिनीत सेंद्रीय कर्बाचे प्रमाण झपाट्याने वाढते, असे चंदनसिंग सांगतात. पाच ते सहा महिने शेतात बांधल्याने त्यांची दहा एकर जमीन खताने आच्छादली जाते. या काळात जनावरांनाही मोकळ्या वातावरणात राहण्यास मिळते. त्यांचे आरोग्य चांगले राहते.

Indigenous Cow
Gir Cow Farming : जातिवंत ‘गीर’ संगोपनातून वाढवला दुग्धव्यवसाय

तुपाची विक्री

लालकंधारी गायीचे दूध प्राधान्याने त्यांच्या वासरांना दिले जाते. त्यानंतर शिल्लक दूध सुमारे काढले जाते. सकाळ- संध्याकाळी मिळणाऱ्या वीस लिटर दुधापासून तूप तयार केले जाते. देशी गायीच्या तुपाला मागणीही चांगली आहे. हे तूप तीन हजार रुपये प्रति किलो दराने विकले जाते. दरवर्षी दहा किलो तुपाची विक्री होते.

दूध अजिबात विकत नाहीत. दूध लहान मुले, वयोवृद्धांना मोफत दिले जाते. दर वर्षी काही शुद्ध वंशाच्या लाल कंधारी गाई व गोऱ्ह्याच्या विक्री करून गोठा मर्यादित ठेवतात. एकूणच गोसंगोपनामुळेच आपल्याला बरकत आल्याची चंदनसिंग यांची भावना आहे.

असे असते सेंद्रिय खताचे नियोजन

चंदनसिंग यांच्याकडे असलेल्या लहान-मोठ्या चाळीस जनावरांच्या गोठ्यातील शेणामुळे पंधरा एकर जमिनीला शेणखत उपलब्ध होते. तर पाच ते सहा महिने शेतात बांधलेल्या जनावरांपासून दहा एकर जमिनीला शेणखत मिळते. तसेच चंदनसिंग ठाकूर इतर शेतकऱ्यांकडून वीस ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत विकत घेऊन ते दहा एकर जमिनीला देतात.

यातून त्यांची पस्तीस एकर शेतीमध्ये दरवर्षी सेंद्रिय खतांची उपलब्धता केली जाते. ही खते आलटून पालटून वेगवेगळ्या शेतात दिली जात असल्याने त्यांच्या सत्तर एकर जमीन सुपीक बनली आहे.

त्यांनी हळूहळू रासायनिक खतांचे प्रमाण कमी केले असून, कपाशीसारख्या नगदी पिकाला केवळ पंचवीस टक्के एवढेच रासायनिक खत द्यावे लागते, असे ते सांगतात. घरच्या शेणखतामुळे त्यांना दरवर्षी दोन लाखांच्या रासायनिक खताची बचत होते. रब्बीमधील पिकांना तर रासायनिक खते देत नाहीत. यामुळे त्यांच्या रब्बीतील हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांना ग्राहकांकडून मोठी मागणी असते.

Indigenous Cow
Cow Farming : शेवगाव तालुक्यातील परमेश्वर देशमुख यांचे गोपालन

खाण्यासाठी करडई तेल

मागील चाळीस वर्षापासून ठाकूर हे दोन एकर करडईचे पीक घेतात. या करडईचे तेल घाण्यावर काढून ते वर्षभर खाण्यासाठी वापरले जाते. यासोबतच रब्बी ज्वारी (दगडी ज्वारी), गहू ही पिकेही रासायनिक खते न देता घेतली जातात. हे धान्य व तेल घरगुतीच वापरले जाते. त्यामुळे वयोवृद्ध आई वडिलांसह सर्वांचे आरोग्य चांगले राहते. वयाच्या नव्वदीतही वडील शेतातील कामे करून घेत फिरत असल्याचे चंदनसिंग सांगतात.

गावरान कोंबड्यांचे संगोपन

कोरोनाच्या काळापासून चंदनसिंग शेतातील आखाड्यावर तीनशे गावरान कोंबड्यांचेही संगोपन करतात. त्यासाठी जनावरांच्या गोठ्याशेजारी जाळीचे शेड केले आहे. जिवंत गावरान कोंबडी पाचशे रुपये किलो, तर अंडे वीस रुपये दराने विकले जाते. या कोंबड्या जनावरांच्या अंगावरील गोचिडीसारखे परजिवी खातात. तसेच त्यांचा शेणखताच्या खड्ड्यावरही वावर असतो. त्यामुळे शेणखतातून शेतामध्ये किडींच्या अवस्था फारशा जात नसल्याचे चंदनसिंग सांगतात.

Indigenous Cow
Cow Farming : रशियातील पदवीधर बनला सह्याद्रीतील गोपालक

कष्टाने केली सात एकराची सत्तर एकर

वडील हरिसिंग यांच्या वाट्याला सात एकर वडिलोपार्जित शेती मिळाली होती. शेतीसोबतच पाच लालकंधारी गाई पाळल्या होत्या. आईवडिलांना घेतलेल्या कष्ट व नियोजनातून मागील चाळीस वर्षात ६३ एकर जमीन विकत घेतली. एकाच तळावर साठ एकर जमीन झाली आहे.

दरवर्षी पन्नास लाखांचे उत्पादन

दरवर्षी खरिपात सोयाबीन, तूर, कपाशी तर रब्बीमध्ये हरभरा, ज्वारी, गहू, करडई ही पिके घेतली जातात. जनावरांच्या चाऱ्यासाठी मका, गाजर गवत, ऊस आदी पिकेही घेतली जातात. दरवर्षी ३५ एकर सोयाबीन अधिक तूर, पंचवीस एकर कापूस व इतर दहा एकरमध्ये उडीद, मूग व चारापिके घेतली जातात.

३५ एकरमध्ये दरवर्षी पाचशे क्विंटल सोयाबीन निघते, तर २५ एकर कपाशीपासून अडीचशे क्विंटल कपाशी उत्पादन होते. यासोबतच रब्बीमध्ये पाच एकर गहू, सहा एकर हरभरा, दोन एकर करडई, पाच एकर दगडी ज्वारी व दोन एकर संकरित ज्वारी ही पिके घेतली जातात. यापासून दरवर्षी त्यांना पन्नास लाख रुपयांचे उत्पादन निघते. एकूण सर्व व्यवस्थापनाचा वीस लाखांचा खर्च वजा केल्यास तीस लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे चंदनसिंग सांगतात.

शेती उत्पादनातून मुलांचे शिक्षण

चंदनसिंग यांच्या कुटूंबात वडील हरिसिंग, आई निलाबाई, पत्नी मीराबाई यांचा समावेश आहे. मोठा मुलगा अक्षय शिक्षण पूर्ण करून वडिलांना शेतीकामात मदत करतो. सुमीत हा पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. शुभम हा रशियात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. सर्वात लहान अभिषेक हा नांदेडमध्ये राहून बारावीनंतर वैद्यकीय पूर्वपरीक्षेची तयारी करत आहे. या सर्वांच्या उत्तम पालनपोषणासह शिक्षणाचा मोठा खर्च केवळ शेतीच्या माध्यमातून करणे शक्य झाल्याचे ते सांगतात.

शेतात दोन मजली घर तर लोह्यात बांधकाम सुरू

वडील हरिसिंग यांनी २००९ मध्ये ५५ लाख रुपये खर्चून चार हजार चौरस फुटाचे दोन मजली घर बांधले आहे. या मोठ्या घरामध्ये शेतीमाल साठवणूक, वाळला व हिरवा चारा साठवणूकही करता येते. सोबतच त्यांच्याकडील पाच सालगड्यांची कुटुंबेही राहतात. सध्या लोहा शहरात तीन हजार वर्गफूट आकाराच्या घराचे बांधकाम सुरू केले आहे.

- चंदनसिंग हरिसिंग ठाकूर,

९८८१०६९७५५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com