
डॉ. प्रवीण बनकर
विदर्भामध्ये आर्वी, गौळगणी, गौळणी अशा विविध नावांनी परिचित गवळाऊ गोवंश हा दूध उत्पादन आणि शेतीकामासाठी लोकप्रिय आहे. महाराष्ट्रातील वर्धा हे गवळाऊ गोवंशाचे माहेरघर असून नागपूर, अमरावती, यवतमाळ या लगतच्या जिल्ह्यांसह मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा, दुर्ग, राजनांदगाव या प्रदेशात गवळाऊ गोवंश मोठ्या संख्येने दिसतो.
विदर्भातील वर्धा जिल्ह्यात गरमासूरच्या पठारी प्रदेशात गुंडमुंड हा परिसर गवळाऊ गोवंशाचे उगमस्थान असल्याचे स्थानिक गोपालक आणि अभ्यासक सांगतात.
अठराव्या शतकात मराठा सैन्याला युद्ध साहित्य, दारूगोळा इत्यादीच्या वाहतुकीसाठी हलक्या, चपळ पशुधनाची निकड भासू लागली. वाहतुकीच्या गरजेतून डोंगरीभागात स्थानिक गवळाऊ गोवंशाचा उपयोग करण्यात आला.
ब्रिटिशकालीन गॅझेटियर्स (१९०६) नोंदीनुसार, वर्धा जिल्ह्यात वऱ्हाडी (बेरार), माहुरपट्टी, तेलंगपट्टी या गोवंशापेक्षा आकाराने लहान आणि गवळाऊ नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोवंशाची उत्तम जात असल्याचे निर्देशित आहे. नागपूर जिल्ह्यात विशेषत: कापूस क्षेत्रामध्ये गवळाऊ गोवंशाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. सामान्यतः गवळाऊ गोवंश हा आर्वी (वर्धा) आणि सौसरमधील खामरपाणी येथून आणल्याची नोंद आहे.
‘नंद गवळी’ हे गवळाऊ गोवंशाचे प्रमुख पारंपरिक गोपालक आहेत. गवळाऊचे संवर्धन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. सध्या शुद्ध गवळाऊ गोवंशाची संख्या रोडावली असून संवर्धन करण्याची गरज आहे. एकोणिसाव्या (२०१२) पशुगणनेत १,४५,७७९ एवढी असणारी संख्या विसाव्या (२०१९) पशुगणनेत ५०,९३६ इतकी प्रचंड रोडावली असल्याचे दिसून आले आहे. हे लक्षात घेऊन बहुगुणी गवळाऊ गोवंशाच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत आहेत.
महाराष्ट्र शासनातर्फे पोहरा (जि. अमरावती) आणि हेटीकुंडी (जि. वर्धा) येथील प्रक्षेत्रावर गवळाऊ गोवंशाचे संवर्धन केले जाते. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने नागपूर येथे गवळाऊ प्रक्षेत्र आहे. गोवंशातील दुधाचे गुणधर्म आणि उत्पादन क्षमतेबाबत संशोधन आणि लोकप्रबोधन करण्यात येत आहे. विविध स्थानिक संघटना आणि गवळाऊ गोवंश ब्रीड सोसायटीच्या माध्यमातून पशुपालकांमध्ये जनजागृतीचे काम सुरू आहे.
गोवंशाची ओळख
ढवळ्या रंगावरून गवळाऊ जरी देवणी, उमरडा किंवा खिल्लार यांच्याशी साधर्म्य दर्शवीत असली तरी शरीर वैशिष्ट्यात गवळाऊ आंध्र प्रदेशातील ‘ओंगोल’ या गोवंशाशी अधिक जवळीकता दर्शविते. ओंगोल गोवंशातील आकारमानाने लहान, वजनाला हलके आणि कामाला चपळ अशा गोवंशाच्या निरंतर निवड प्रक्रियेतून गवळाऊ गोवंश विकसित होत गेला.
आकारमानाने या जातीची जनावरे मध्यम बांध्याची, पांढऱ्या आणि क्वचित राखाडी रंगाची असतात. पांढऱ्याशुभ्र रंगाने गोपालक गवळाऊला ‘पांढरं सोनं’ संबोधतात.
डोके लांब व निमुळते, फुगीर (रोमन) नाकमाथा, काळेभोर बदामी डोळे, शरीरसमांतर व मध्यम आकाराचे कान, मागे वळलेली शिंगे, मानेची सैलसर लोंबती पोळी, रुबाबदार वशिंड, खुरापर्यंत पोहोचणारी लांबलचक शेपटी ही गोवंशाची वैशिष्ट्ये आहेत.
नवजात वासरांमध्ये कपाळावर लालसर तांबूस रंगाचा केसपुंजका दिसून येतो जो कालांतराने विलुप्त होतो.
जन्मतः वजनाला साधारण २० किलो भरणारी वासरे वयस्क अवस्थेत हा गोवंश ३५० ते ४५० किलो वजनाने पोहोचतो.
प्रतिवेत दूध सरासरी ६०० किलोग्रॅम असते. नियमित वेत देणारी गाय निकृष्ट चारा, झाडझाडोरा खाऊन देखील चविष्ट दूध देते. म्हणून दूध, शेणखत आणि शेतीकाम अशा हेतूसाठी गोपालक गवळाऊ गोवंश पाळतात.
दिवसभरात सुमारे ७ ते ८ तास नांगरणीचे काम गवळाऊ बैलजोड्या करताना दिसतात. हा गोवंश चपळ असला तरी बैल कामाला शांत असल्याचे दिसून येते. मात्र शंकरपटात गवळाऊ खोंड जलद वेगाने धावताना दिसतात.
स्थानिक उष्ण वातावरणात तग धरण्याची आणि काम करण्याची विलक्षण क्षमता गवळाऊ मध्ये दिसून येते. त्यामुळे गेल्या दोन दशकांपासून गवळाऊ गोपालकांनी दूध उत्पादनापेक्षा भारवाहू गुणासाठी निवड पैदास केली असल्याचे दिसून येते.
- डॉ प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९,
(सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.