
Pune News: उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन स्थापन करावी लागेल असं वक्तव्य केल आहे. चाकण चौक, पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होत असतो.
महानगरपालिकेमुळे केंद्र सरकार आणि जागतिक बँकेचा निधी मिळवून विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चाकणसह हिंजवडी, उरळी देवाची, मांजरी आणि फुरसुंगी येथेही नव्या महानगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांना स्वतः वाहतूक कोंडीचा अनुभव आल्याने त्यांनी पोलिसांना वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याचे निर्देश दिले.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिकेची गरज असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "महानगरपालिका केल्याशिवाय या भागाला पुरेसा निधी आणि सोयी-सुविधा मिळणार नाहीत. महानगरपालिकेला केंद्र सरकारचा निधी तसेच जागतिक बँकेची आर्थिक मदत मिळू शकते. काहींना हा निर्णय आवडणार नाही, पण काळानुसार आणि विकासासाठी असा निर्णय घ्यावा लागेल."
यावेळी त्यांनी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि उल्हासनगर महानगरपालिकांचं उदाहरण दिलं. या भागात महानगरपालिका स्थापन झाल्यामुळे विकासाला गती मिळाली. त्याचप्रमाणे चाकण आणि हिंजवडीसह उरळी देवाची, मांजरी आणि फुरसुंगी या भागांसाठीही नवीन महानगरपालिका स्थापन कराव्या लागतील, असं त्यांनी सांगितलं. महानगरपालिका स्थापनेसाठी किमान ५ लाख लोकसंख्येची आवश्यकता असते आणि चाकण परिसरातील लोकसंख्या ही गरज पूर्ण करते, असंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवार यांनी सांगितलं की, चाकणसाठी प्रस्तावित योजना तयार आहे. याबाबत मंजुरीसाठी ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत घेतील. त्यामुळे पुणे जिल्ह्यात लवकरच नव्या महानगरपालिका स्थापन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवार यांना स्वतः वाहतूक कोंडीचा अनुभव आला. चाकण चौकात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखल्याने काही काळ ट्रॅफिक जाम झाला. यावर नाराजी व्यक्त करताना अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना विचारणा केली, "वाहनं का थांबवली? यामुळे कोंडी होत आहे?" त्यांनी यावेळी स्थानिक पोलिसांना वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याचे निर्देश दिले.
ते पुढे म्हणाले, "मी सकाळपासून दौरा करतोय, एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतात. मग दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करता येते." यामुळे चाकणच्या वाहतूक समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि इतर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र महानगरपालिकेचा प्रस्ताव हा मोठा पाऊल ठरणार आहे. यामुळे येत्या काळात चाकण आणि आजूबाजूच्या भागात विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.