
Pune News : हवामान बदलामुळे भारतीय शेतीपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला तोंड देण्यासाठी निसर्गाशी जुळवून घेणारी शेतीपद्धती अंगीकारण्याची गरज आहे. आजवर हरितक्रांती झाली, धवल क्रांती झाली, आता ‘हवामान क्रांती’ची गरज आहे, असा सूर पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘हवामान बदल जाणून घेताना’ या कार्यशाळेत उमटला.
भवताल फाउंडेशन, आयसर-पुणेचा अर्थ अॅण्ड क्लायमेट सायन्सेस विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक हवामान संशोधन प्रोग्रॅम (डब्लूसीआरपी) यांनी संयुक्तपणे आयसर (पुणे) येथे १८ व १९ जानेवारी रोजी ही कार्यशाळा आयोजित केली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल,
आयसर-पुणे येथील प्रा. डॉ. जॉय मॉन्टेरो, प्रा. छावी माथूर, प्रा. बीजॉय थॉमस, ‘आयआयटीएम’मधील संशोधक आदिती मोदी, ‘अग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव, राज्य सरकारच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक उदय देशमुख, पर्यावरण अभ्यासक आणि ‘भवताल फाउंडेशन’चे संस्थापक अभिजित घोरपडे, ‘भवताल फाउंडेशन’चे समन्वयक वैभव जगताप या वेळी उपस्थित होते.
रमेश जाधव म्हणाले, की भविष्यात वातावरण बदलामुळे नगदी पिकांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. मात्र भरडधान्यांचे उत्पादन वाढेल. हे बदल आपण टाळू शकत नाही. त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी ‘क्लायमेट फ्रेंडली’ शेती हीच पुढची दिशा असायला हवी. हवामानातील बदलाला सामोरे जाण्यासाठी पिकांचे नवीन वाण विकसित करण्याबरोबरच केवळ पीकपद्धतीतच नव्हे तर एकंदर शेतीपद्धतीतच बदल करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
उदय देशमुख म्हणाले, की साधारणपणे ३० वर्षांपूर्वी आम्ही धूळपेरणीनंतर पिकाच्या उत्पादनात वाढ होते, असे छातीठोकपणे सांगत होतो. आता किमान १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करावे लागते. हवामान बदलाचे हे दृश्य परिणाम आहेत. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी शासन पातळीवर सुरू असलेले प्रयत्न आणि एकंदरीत सरकारी योजनांबाबत देशमुख यांनी सविस्तर माहिती देली.
डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल म्हणाले, की जागतिक तापमान वाढ तसेच हवामानातील बदल डेंगीच्या डासांसाठी पोषक ठरत आहे. डेंगीविषयी पूर्वअंदाज देण्याची प्रणाली आम्ही विकसित केली आहे. त्यामुळे डेंगीची साथ नियंत्रणात आणणे शक्य होईल.
प्रा. जॉय मोंटेरो यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याची उपलब्धता आणि बेसुमार वापर याबद्दल चिंता व्यक्त केली. सामुदायिक कृती आराखडा विकसित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. प्रा. बीजॉय थॉमस यांनी औद्योगिक क्रांतीनंतर जगाचे वाढलेले सरासरी तापमान आणि त्याचा मानवी शरीर आणि वनस्पती, पिकांवर होणारा परिणाम या विषयावर भाष्य केले. प्रा. छावी माथूर यांनी जल व्यवस्थापनाच्या सुयोग्य पद्धती सांगितल्या. आदिती मोदी यांनी महाराष्ट्रातील बदलत्या हवामानामुळे निर्माण झालेल्या आव्हानांबाबत चर्चा केली. त्रिलोक खैरनार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.