

Dhananjay Munde : राज्यात उशिरा पाऊस सुरू झाला असला तरी मंगळवारपासून (ता. १८) सुरू झालेल्या पावसामुळे ३१ जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण होतील. तरीही काही ठिकाणी पेरण्या लांबल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. अशी वेळ आली तर सरकार या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील. तसेच शेतीच्या कुंपणासाठी कृषी विभाग नवीन योजना आणेल, अशी ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना दिली.
भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेत दाखल केलेल्या लक्षवेधी सूचनेद्वारे मराठवाडा आणि राज्यातील अन्य भागांत पाऊस लांबल्याने पेरण्या लांबल्याचे आणि काही ठिकाणी झालेल्या पेरणीत उगवण क्षमता कमी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्याला मुंडे उत्तर देत होते. राज्यात पावसाची सरासरी ७७ टक्के असून मराठवाड्यात सरासरी ४१ टक्के पाऊस झाला आहे. राज्याचे पेरणी क्षेत्र १४२ हेक्टर असून त्यापैकी १८ जुलैपर्यंत राज्यात १०४ लाख हेक्टरवर म्हणजेच ७४ टक्के पेरणी झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत पाऊस असेल असा अंदाज आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना अडचण येणार नाही, असे मुंडे यांनी या वेळी सांगितले. त्याचबरोबर कमी पावसात टिकणारे आणि कमी पाणी लागणाऱ्या बियाण्यांसाठी संशोधन करण्याचे निर्देश कृषी विद्यापिठांना दिल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
या लक्षवेधीवर काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी पश्चिम वाहिन्या नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणले पाहिजे, कोकणातून ते समुद्रात वाहून चालले आहे. ते मराठवाड्यातील तुटीच्या खोऱ्यात आणले पाहिजे, अशी मागणी केली. मागील सरकारचा मराठवाडा वॉटर ग्रीडला विरोध नव्हता, तर आधी तुटीचे प्रकल्प पाण्याने भरा अन्यथा मराठवाड्यातील जिल्ह्याजिल्ह्यात वाद सुरू होतील, असा इशारा चव्हाण यांनी या वेळी दिला.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पूर्ण वेगळा आहे आणि जायकवाडीचा तुटीचे खोरे भरून काढण्याचा विषय वेगळा आहे. आधी तूट भरून काढायची की वॉटर ग्रीड प्रकल्प करायचा हे राज्य मंत्रिमंडळ लवकरच ठरवेल, असे उत्तर देताना मुंडे म्हणाले. या चर्चेत नारायण कुचे, राजेश टोपे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी सहभाग घेतला.
अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी वेगळ्या उपाययोजनांची गरज. या मागील अर्थसंकल्पात जलयुक्त शिवार टप्पा दोन मंजूर केला आहे, अशी माहिती मुंडे यांनी दिली. पाच हजार गावे जलयुक्तमध्ये घेण्यात येणार आहेत. अवर्षण प्रवण क्षेत्रात गावे घेतली जातील. मराठवाड्यातील १६२ टीएमसी तुटीचे खोरे पाणी आणण्याबाबत मागणी केली आहे. जास्तीत जास्त ही तूट भरून निघेल. १०० टीएमसी पाणी मिळेल, असेही ते म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.