
मुंबई : विद्यार्थ्यांना पर्यावरणीय सुरक्षा शिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेने (Mumbai municipality) ‘वाघोबा’ प्रकल्प (Waghoba Project) विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय विभागाने ‘वाघोबा’ नावाचा वर्षभराचा अभ्यासक्रम तयार करून शिक्षण विभागाला दिला आहे; मात्र राज्यातील सरकार बदलल्याने हा प्रकल्प गेल्या चार महिन्यांपासून अडगळीत पडला आहे.
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २०२२ च्या मे महिन्यात बैठक घेऊन हा प्रकल्प राबवण्याचे निर्देश दिले होते. पर्यावरण अभ्यास हा विषय न राहता, जीवनशैलीचा एक भाग म्हणून शिकवण्याचा प्रयत्न होता. जैवविविधता आणि प्राणी जगत यांची सांगड घालून विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल माहिती देण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार होता.
यासाठी विशेष अभ्यासक्रम बनवण्याची जबाबदारी राणी बाग प्रशासनाला देण्यात आली होती. त्यांनीही सात महिन्यांचा ‘वाघोबा’ अभ्यासक्रम तयार करून पालिकेच्या शिक्षण विभागाकडे जून महिन्यातच सादर केला. ‘वाघोबा’ची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात येणार होती. १ जुलै ते ३१ जानेवारी २०२२ दरम्यान अभ्यासक्रम तयार करण्यात आला.
मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात सत्तांतर घडले. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाले. याचा फटका या प्रकल्पाला बसल्याने हा प्रस्ताव अडगळीत पडला आहे.
पर्यावरणपूरक जीवन पद्धती
प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक जीवन पद्धतीची ओळख करून दिली जाणार आहे. जंगल सफरीच्या माध्यमातून प्रत्यक्षात प्राण्यांच्या संपर्कात नेणे, खारफुटीच्या विश्वाची ओळख करून देणे, वृक्षारोपण उपक्रम राबवले जाणार आहेत. शाळांमध्ये सौरऊर्जा, कंपोस्टिंग, वॉटर हार्वेस्टिंग आणि कचऱ्याचा पुनर्वापर असे प्रकल्प उभारले जाणार आहेत. प्रात्यक्षिकांतून यांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांना पर्यावरणीय सुरक्षा शिकवली जाणार आहे.
नेदरलँड्सच्या धर्तीवर प्रकल्प
नेदरलँड्स देशामधील शाळांच्या संकल्पनेवर आधारित ‘वाघोबा’ हा प्रकल्प तयार करण्यात आला. या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये पर्यावरण अभ्यास हा केवळ एक विषय म्हणून न शिकवता विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यावर भर दिला आहे.
विद्यार्थ्यांना पर्यावरणातील घटकांच्या थेट संपर्कात आणून संस्कार करण्याचा प्रयत्न होता. खोके सरकारला पर्यावरणाचे महत्त्व अजून समजले नाही. त्यांच्या दबावात प्रशासन काम करत आहे. आरे जंगलाचा प्रश्न ही जटिल बनला आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
- आदित्य ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री
वाघोबा’ प्रकल्प रद्द केलेला नाही. प्रकल्प प्रत्यक्षात राबवण्याचे नियोजन सुरू असून, त्याला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल. सरकार बदलल्याचा याच्याशी काहीही संबंध नाही.
- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.