
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये (Sugarcane Producer) चिंतेचे वातावरण आहे. करूळ घाटमार्गाच्या नादुरुस्तीमुळे ऊस वाहतूक (Sugarcane Transport) करूळ ऐवजी भुईबावडा घाटरस्त्याने करावी लागत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश ऊस असळज (ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर) येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला जातो. ही सर्व वाहतुक तळेरे-कोल्हापूर मार्गावरील करूळ घाटमार्गेच होते. परंतु हा घाटमार्ग खड्डेमय बनल्यामुळे या मार्गाने ऊस वाहतूक करण्यास ट्रकचालकांनी असहमती दर्शविली आहे.
त्यामुळे २० ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू झाला असला, तरी सिंधुदुर्गात अवघ्या दहा ते पंधरा तोडणी टोळ्यांचा समूह कार्यरत आहे. त्याचा परिणाम आतापर्यंत अवघा पाच हजार टन ऊसतोडणी झाली आहे. जिल्ह्यात साधारणपणे ६० ते ७० हजार टन ऊस उत्पादित होतो. अडीच महिन्यांत पाच हजार टन उसाची तोडणी झाल्यामुळे उर्वरित उसाची तोडणी होणार कधी, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकांना करूळ मार्गे वाहतुकीची रक्कम दिली जाते. भुईबावडा घाटमार्गे वाहतूक करायची झाल्यास दहा ते बारा किलोमीटर अंतर वाढते. ट्रकमालक इतके नुकसान करून वाहतूक करण्यास तयार नाहीत. काही शेतकरी ट्रकचालकांना ही रक्कम देऊन तोडणी करून घेत आहेत. शिल्लक उसाची तोडणी होण्यास एप्रिल उजाडेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.