
पुणे ः डिजिटल क्रांतीचा (Digital Revolution) लाभ शेतकरी कसा उठवत आहेत, याचा उत्तम प्रत्यय राज्य शासनाला आला. पंतप्रधान पीकविमा योजनेत (Crop Insurance Scheme) सरकारी सुटीत ४८ तासांत तब्बल १८ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही जास्त अर्ज विम्यासाठी प्राप्त झाले आहेत. (Online Rush To Pay Crop Insurance )
केंद्र शासनाने घोषित केल्यामुळे विमा हप्ता भरण्याची मुदत रविवारपर्यंत (ता. ३१) होती. मात्र, त्यादिवशी सरकारी सुटी आल्यामुळे एक दिवस वाढवून सोमवारी (ता. १) रात्री बारावाजेपर्यंत अर्ज भरले गेले. ‘‘पीकविम्यात अर्ज भरण्याची सर्व कामे ऑनलाइन होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी गावात किंवा घरात बसून शनिवार व रविवार या दोन दिवसांत १८ लाखांपेक्षा जास्त अर्ज भरले. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार विमाधारक शेतकऱ्यांची संख्या ८८ लाखांच्या पुढे गेली,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे म्हणाले की, ‘‘डिजिटल क्रांतीच्या सुविधेमुळे शेतकऱ्यांचा विमा योजनेत सहज सहभाग घेता आला. सातबारा, आठ अ उतारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. विमा, भूमिअभिलेख आणि आधार या तीन प्रणाली एकमेकांशी जोडण्यात आल्यामुळे आणि त्यांची संकेतस्थळे उत्तमरीत्या कार्यरत राहिल्यामुळे शेतकऱ्यांना कोणाच्याही मदतीविना विमा योजनेत सहभाग घेता येत आहे.’’
विमा योजनेत बीड पॅटर्न स्वीकारल्यानंतर हा पहिलाच खरीप हंगाम आहे. योजना जाहीर होताच सुरुवातीला ५-६ लाख अर्ज आले. त्यानंतर अर्ज येण्याचे प्रमाण संथ झाले होते. चांगला मॉन्सून यंदा बरसणार असल्यामुळे निर्धात असलेल्या शेतकऱ्यांना नंतरच्या टप्प्यात अतिवृष्टीने चिंताक्रांत केले. परिणामी विमा काढण्याकडे कल वाढला. देशात आतापर्यंत चालू हंगामात पाच कोटी शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. त्यात राज्यातील शेतकऱ्यांचा वाटा १८ टक्के आहे.
‘‘विम्याची नुकसान भरपाई आधी बॅंकांच्या ताब्यात दिली जात होती. बॅंका ही रक्कम महिनो महिने स्वतःकडेच दाबून ठेवत होत्या. मात्र, आता बॅंकांऐवजी थेट विमाधारकाच्या खात्या भरपाई रकमा जमा करण्याचे आदेश केंद्राने दिले. त्यामुळे बॅंकांनी विमा योजनेच्या प्रचारप्रसारात पूर्वी दाखविलेला उत्साह आता मावळला आहे. मात्र, डिजिटल सुविधेमुळे गावातील सार्वजनिक सुविधा केंद्राची मदत मोलाची ठरली आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.
बीडची आघाडी कायम
पीक विमा योजनेतील ‘बीड पॅटर्न’ला नावारूपाला आणणाऱ्या शेतकऱ्यांनी या पॅटर्नच्या पहिल्या अंमलबजावणीलाही सर्वाधिक प्रतिसाद दिला आहे. बीडमधील १६ लाखांहून जास्त शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १) सकाळपर्यंत सहभाग नोंदविला होता. गेल्या हंगामात ही संख्या ११.६८ लाखांच्या आसपास होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.