
लातूर ः लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात एक लाख बांबू वृक्ष लागवड (Bamboo Cultivation) केली जाणार आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जयंती व शेतकरी नेते शरद जोशी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सोमवारी (ता. १२) या मोहिमेचा आमदार रमेश कराड व बांबू चळवळीचे प्रणेते माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांच्या उपस्थितीत रामवाडी (ता. रेणापूर) येथे करण्यात आला.
या कार्यक्रमाला बांबू वृक्ष लागवड राष्ट्रीय तज्ज्ञ संजय करपे, भाजपचे नेते राजेश कराड, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, विजय काळे, वसंत करमुडे, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, लातूर तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, रेणापूर पंचायत समितीच्या माजी सभापती बायनाबाई साळवे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण जाधव, शीला आचार्य, महेंद्र गोडभरले, सरपंच पांडुरंग कलुरे आदी उपस्थित होते.
निसर्गाचा समतोल बिघडला असून येणारा काळ हा सर्वांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून आणि पुढच्या पिढीच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून लोकनेते गोपीनाथ मुंडे आणि शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करावा, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांनी या वेळी व्यक्त केले.
ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावांत एक लाख बांबू लागवडीचा संकल्प केला असून त्याची सुरुवात आज केली आहे. भारतरत्न, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच २५ डिसेंबरपर्यंत हा उपक्रम चालेल. बांबू लागवड करून शेतीचे नुकसान टाळले जावू शकते. बांबू शेती फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन कराड यांनी केले.
बांबू लागवड अधिक लाभदायी आहे. प्रत्येक व्यक्तीला २८० किलो ऑक्सिजन लागतो आणि १ झाड ३२० किलो ऑक्सिजन देते. इतर झाडापेक्षा ३० टक्के अधिक ऑक्सिजन देणारे बांबू हे झाड आहे, असे सांगून पाशा पटेल म्हणाले, सागवान, चंदन, आंबा आणि ऊस शेतीपेक्षा बांबू वृक्ष लागवड शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याची आहे. बांबू बहुउद्देशीय आहे. बांबूपासून पेट्रोल, डिझेल, कपडे, घर, फर्निचर यासह अठराशे वस्तू तयार होतात. बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने तीन वर्षांत हेक्टरी ६ लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे. सोयाबीन, उसाऐवजी शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.