Indian Farmer : कष्टाळू शेतकरी देशाचा हिरो

कष्टाळू शेतकरी देशाचा हिरो
Ajinkya Rahane
Ajinkya RahaneAgrowon

पुणे ः ‘‘माझ्या आजीने मला शेतीचा (Agriculture) लळा लावला आणि शेतकऱ्यांचं जगणं (Farmer Live Hood) समजावून सांगितलं. खरं तर मी लहानपणी पहिली बॅट देखील शेतातच धरली. शेतातच खेळलो. कष्टाळू शेतकरी या देशाचा खरा हिरो आहे. कष्टातून कधीही निवृत्त न होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही तरी केलं पाहिजे असं मला सतत वाटत होते. त्यामुळेच मी अॅग्रिटेक स्टार्टअपच्या (Agritech Startup) मदतीसाठी पुढे आलो आहे,’’ असा मनमोकळा संवाद भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद सांभाळलेले क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी साधला.

Ajinkya Rahane
Agriculture Education : ग्राममंगल मुक्तशाळेतून मिळतेय कृषीचे शिक्षण

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चरमध्ये (एमसीसीआयए) आयोजिलेल्या ‘अॅग्रिटेक स्टार्टअप’ उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘एमसीसीआयए’चे अध्यक्ष दीपक करंदीकर व महासंचालक प्रशांत गिरबाने, तसेच क्रीडा समितीचे प्रमुख विक्रम साठे, कृषी समितीचे प्रमुख व नाबार्डचे माजी अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी या वेळी उपस्थित होते.

क्रिकेटच्या मैदानावर महान कामगिरी बजावणारा हा मराठमोळा क्रिकेटपटू आता शेतकऱ्यांच्या ‘क्षेत्र’रक्षणासाठी पुढे आला आहे. त्यांनी ‘अजिंक्य रहाणे अॅण्ड असोसिएट्‍स’ असा उपक्रम चालू केला आहे. त्याद्वारे राज्यातील काही अॅग्रिटेक स्टार्टअपला स्वतः बीजभांडवल पुरवण्याचे जाहीर करीत त्यांनी उपस्थितांना आश्‍चर्याचा धक्का दिला. टाळ्यांच्या प्रचंड गजरात स्टार्टअप प्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले.

Ajinkya Rahane
Agriculture : शेतीचे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले

नगरच्या आश्‍वी खुर्द गावात जन्म झालेल्या अजिंक्यचे आई-वडील संगमनेरच्या चंदनापुरी गावाचे आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे, असे ते सतत मित्रांना बोलून दाखवत असत. श्री. साठे यांनी या वेळी त्यांची छोटेखानी मुलाखत घेतली. ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांसाठी स्टार्टअपला मदत करणारा उपक्रम आज मी सुरू करतोय. फलंदाजीला जातांना मी काहीसा नर्व्हस (खिन्न) असतो, तसेच आजही आहे.

कारण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना हा नर्व्हसनेस माझ्याबरोबर असतो. क्रिकेट असो की शेतीमधील सहभाग; मी सारख्याच मानसिक अवस्थेतून जात आहे. माझा शेती क्षेत्रातील प्रवासदेखील छान होणार आहे. लहाणपणापासून मी शेतकरी आजी-आजोबांकडे जात असे. गावाला गेलो की शेतात जात असे. मी माझ्या आजी आणि काकाची शेतातील मेहनत पाहिली. कठीण दिवस व खूप श्रम असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. शेतीत कितीही संकट आले तरी ते पुन्हा शून्यापासून सुरुवात करतात हे मी पाहिले. नेमके तेच तत्त्व मी क्रिकेटशी जोडले आहे.’’

शेतकऱ्यांना मदतीसाठी वडील सांगायचे

‘‘देश असो की गरजवंत असो की शेतकरी असो; प्रत्येकासाठी तुला जे जे शक्य आहे ते करीत जा, असा सल्ला वडिलांचा मला होता. वडिलांच्या संवादातून मला शेतीची सतत गोडी लागली. श्रीलंका दौऱ्यावर असताना मला शेतकरी आत्महत्यांचे वृत्त समजले होते. त्या वेळी मी वडिलांशी संपर्क साधून शेतकऱ्यांबाबत काही तरी करण्याचा संकल्प बोलून दाखवला होता.

अॅग्रिटेक स्टार्टअपमध्ये मी गुंतवणूक करीत असलो, तरी त्यातून मला वेगळी अपेक्षा अजिबात नाही. मदतीचा वापर शेतकऱ्यांसाठी या स्टार्टअपकडून नेमक्या किती जिद्दीने होतो आणि त्याचा किती अनुकूल परिणाम शेतकऱ्यांवर होतो, हेच मी पाहीन. शेतकऱ्यांचा लाभ होण्यात मला खरे समाधान आहे.’’ असे अजिंक्य रहाणे यांनी बोलून दाखवताच सभागृहात पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com