पालघर (Palghar) जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील जंगल भागातील वारली, कातकरी, मल्हारकोळी अशा आदिवासींची वस्ती असलेली दाभोण, ऐना, रणकोळ ही गावे. चाळीस वर्षांपूर्वी, थोर समाजसेविका अनुताई वाघ (Anutai Wagh) या गावांत आल्या. तिथे त्यांनी लहान मुलांसाठी बालवाड्या सुरू केल्या. येथे शिक्षण आणि ग्राम विकासाच्या (Rural Development) कामासाठी 'ग्राममंगल` (Grammangal) ही संस्था सुरू केली. या संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पट्यात शिक्षण, ग्राम विकास तसेच सामाजिक बदल चांगल्या प्रकारे दिसू लागले आहेत.
मुलांमध्ये शिक्षणाची उपजतच आवड असते. शाळा भरपूर कल्पक उपक्रम देणारी असेल तर मुलांना नक्कीच शाळेत जावेसे वाटते. शाळांमध्ये कृतिशील अनुभवांची रेलचेल असेल तर सर्वच मुले-मुली आनंदाने येऊन चांगल्या पद्धतीने शिकतात. हे ग्राममंगल संस्थेच्या शाळेतील चित्र आहे. विक्रमगड येथे ग्राममंगल संस्थेचे 'अनुताई वाघ शिक्षण केंद्र' आणि शाळा देखील आहे. तसेच डहाणू तालुक्यातील ऐना गावात 'मुक्त शाळा' कार्यरत आहे. जवळपास चार एकरावर ही शाळा कार्यान्वित आहे. इमारतीवर वारलीचे नक्षीदार रंगकाम येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेते. या ठिकाणी स्वयं शिक्षणाच्या संधी, आनंदमय वातावरण, व्यक्तिगत शिक्षणाची रचना, अभ्यासाचा भाग म्हणून छोटी बौद्धिक आव्हाने स्वीकारण्याची संधी मुलांना उपलब्ध आहे. नवशिक्षणाविषयीच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे महाराष्ट्रात ठिकठिकाणी सुरू आहे. चार दशकांपूर्वी अनुताई वाघ, प्रा. रमेश पानसे आदींनी स्थापन केलेल्या या संस्थेने आनंददायी शिक्षण पद्धतीचा एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.
आनंददायी शिक्षण ः
‘ग्राममंगल’च्या सर्व शाळांमध्ये मुला-मुलींना कुणीही शिकवत नाहीत. त्यांची ती अनुभवाने प्रयत्नपूर्वक शिकतात. शिक्षक फक्त त्यांना या प्रक्रियेत मदत करतात. सकाळी दहा वाजता शाळा सुरू होते. मुले-मुली परिसराची स्वच्छता करतात. मग शाळेत नियमित अभ्यास सुरू होतो. प्रत्येकी ४० मिनिटांची तासिका असते, मात्र येथे विषयानुरूप केवळ शिक्षक बदलत नाहीत, तर मुलांनाही दुसऱ्या वर्गात जावे लागते. कारण येथे विषयानुरूप वर्ग खोल्या, शास्त्रालय असून तिथे गटागटाने मुले विशिष्ट विषयाचा अभ्यास करतात. प्रत्येक गोष्ट आणि गृहीतक हे व्यवहाराच्या कसोटीवर पारखून पाहण्याची सवय त्यांना लागते. ग्राममंगल संस्थेने ५०० हून अधिक शैक्षणिक साधने तयार केली आहेत. या शैक्षणिक साधनांच्या आधारे मुले संख्याबोध, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे व्यावहारिक गणित शिकतात. शाळेत समृद्ध ग्रंथालय आहे.
भूगोलाचा तास निसर्गाच्या सान्निध्यात झाडाखाली भरलेला दिसतो. तिथे पृथ्वीचा गोल हातात घेऊन मुले त्यावरील खंड, देश आणि महासागरांचे निरीक्षण करतात. गणिताच्या तासाला मुले व्यावहारिक हिशेब करून भागाकार, बेरीज-वजाबाकीचे तंत्र समजून घेतात. दुपारी भोजनगृहात एकत्र जेवतात. त्यानंतर दुपारचे सत्र सुरू होऊन पाच वाजता शाळा सुटते. आनंददायी शिक्षणाचा ग्राममंगलचा प्रयोग आता केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिला नसून पुणे, सातारा, बीड अशा ठिकाणच्या शाळांमधून रचनात्मक पद्धतीने शिक्षण दिले जाते. ग्राममंगल संस्थेला शैक्षणिक उपक्रमांसाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. निरनिराळ्या व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या मदतीवर ‘ग्राममंगल’चे कामकाज चालते. संस्था विद्यार्थी दत्तक योजना राबवते.
‘लावण्य’ प्रकल्प ः
या नावीन्यपूर्ण कार्यशाळेत परिसरातील कारागीर विविध कलाकृती आणि कलावस्तू तयार करतो. संस्थेत येणारे पाहुणे, पर्यटक त्या वस्तू पाहतात, विकत घेतात. शाळेच्या भिंतींवर अभ्यासक्रमास पूरक माहितीचे तक्ते, आकृत्या, चित्रे, गणिताची सूत्रे, कविता, सामान्यज्ञानाची माहिती असते. विद्यार्थ्यांनी केलेल्या कलाकृती, केलेल्या कविता, लिहिलेले लेखही भिंतीवर आकर्षकपणे मांडलेले असतात.
स्वयं शिक्षण पद्धत :
येथील शाळेत मुले प्रकल्प पद्धतीने खूप काही शिकतात. एकदा धनगर कुटुंबीय आपल्या शेकडो मेंढ्या घेऊन ग्राममंगल संस्थेच्या परिसरात लांबून आले होते. त्यांनी ग्राममंगलच्या शेतात एक रात्र मुक्काम केला होता. तेव्हा या शाळेतील मुलांनी एकत्र जमून, परस्परांशी विचार-विनिमय केला. भराभर प्रश्न काढले. आपापसांत वाटले आणि चक्क तास-दीड तास त्यांनी धनगर कुटुंबांची मुलाखत घेतली. मुलाखत घेताना, मिळालेल्या माहितीच्या नोंदी घेतल्या. आणि मग या मुलाखतीवर आधारित मुलांनी स्वतः लिहिलेले धनगरांच्या जीवनावरचे पुस्तकच तयार झाले. शाळेतील मुलांनी सर्व बारकाव्यांसह ऐने गावाचा नकाशा तयार केला आहे.
शाळेमध्ये शेती विषय ः
पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शेती, शेतीपूरक व्यवसाय, शेती अवजारांची तोंडओळख व्हावी यासाठी शाळेच्या परिसरात शेती करण्याची संधी दिली जाते. विद्यार्थ्यांचे वर्गानुसार गट तयार करून त्यांना जमीन वितरित करून तेथे पीक प्रात्यक्षिके घेतली जातात. आदिवासी भागातील बियाणांचे विद्यार्थी संकलन करतात. त्यांची नावे, वैशिष्ट्ये आणि उपयोगाबद्दलची माहिती शाळेत उपलब्ध करून दिली जाते. परिसरातील झाडांचे सर्व्हेक्षण करून या माहितीचे संकलन करून आलेख स्वरूपात सादरीकरण केले जाते.
प्रत्येक शाळेत वेध शाळा ः
शालेय विद्यार्थ्यांना हवामानासंबंधीची माहिती, नोंदणी, हवामानातील बदलाबाबत प्रत्यक्ष अनुभव देण्याच्या उद्देशाने विज्ञान भारती, पुणे यांच्याद्वारे 'प्रत्येक शाळेत वेधशाळा' ही योजना हाती घेण्यात आली आहे. त्याअंतर्गत पालघरमधील ग्राममंगल संस्थेच्या ऐना गावातील मुक्तशाळेत स्वयंचलित हवामान केंद्र सुरू झाले. विलास रबडे यांची संकल्पना आणि लोकसहभागातून साकार झालेल्या 'प्रत्येक शाळेत वेधशाळा' योजनेचा शुभारंभ गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२१ रोजी झाला. हे हवामान केंद्र स्वनियंत्रित, सौर ऊर्जेवर चालणारे आणि इंटरनेटने जोडलेले आहे. साधारण दर दहा सेकंदांनी त्याची माहिती अद्ययावत होते. ही माहिती सांकेतिक स्थळावरून मोबाईल फोनमध्ये पाहता येते.
ग्राममंगल मुक्तशाळेचे प्रमुख डॉ. रमेश पानसे म्हणाले की, आदिवासी भागात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. शेतकऱ्यांना अगोदरच हवामानाची माहिती मिळाली, तर होणारे नुकसान टाळता येणार आहे. या केंद्रातून विविध बाबींची माहिती मिळणार असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल. ही माहिती रोज मिळणार असल्याने हवामानात काय बदल होतात, याची माहिती विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी हे हवामान केंद्र सर्वांसाठी खुले राहील."
संपर्क ः रमेश पानसे, ७५०७८०१९९९
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.