Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना दुप्पट मदतीचा शासनादेश रद्द

वन व महसूल विभागाकडून ‘एनडीआरएफ’च्या जुन्या दरात किंचित वाढ
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon
Published on
Updated on

कृष्णा जोमेगावकर : ॲग्रोवन वृत्तसेवा
नांदेड : राज्य शासनाने मागील खरिपात अतिवृष्टीमुळे (Heavy Rainfall) पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्यानंतर एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना भरपाई दिली होती.

परंतु शासनाच्या वन व महसूल विभागाने २७ मार्च रोजी नव्याने शासन आदेश काढून दुप्पट मदतीचा जीआर रद्द केला आहे.

यापुढे एनडीआरएफच्या जुन्या निकषात किंचित वाढ करून पुढील तीन वर्षांसाठी मदतीचे दर निश्‍चित केले आहेत.

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपद्ग्रस्त व्यक्तींना २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये देण्यात येणारी मदत निश्‍चित केली आहे.

यात राज्य शासनाने २७ मार्च रोजी शासन आदेश निर्गमित करून नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतीपिकांसाठी दर निश्‍चित केले आहेत.

एनडीआरएफच्या जुन्या निकषानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८००, बागायतीसाठी १३५०० तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० अशी प्रति हेक्टरी मदत निश्‍चित केली होती.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना आता दुप्पट मदत नाही

यात शासनाने आपत्तीची गांभिर्यता पाहून यात वेळोवेळी वाढ करत शेतकऱ्यांना मदत दिली होती. मागील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टर जमिनी खरडून गेल्या होत्या.

तसेच अनेकांना यात जीवही गमवावा लागला होता. यावेळी नुकसानीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्याची मागणी सर्वच स्तरातून झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या जुन्या दरात दुपट्टीने वाढ करण्याची घोषणा केली होती.

Crop Damage Compensation
Crop Damage : नुकसानग्रस्तांना सरसकट मदत देण्याची मागणी

यानुसार जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ६८०० वरून १३६००, बागायतीसाठी १३५०० वरून २७००० तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १८००० वरून ३६००० असा दर वाढून मदत दिली होती.

अशीच मदत नुकत्याच गारपीट होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा व्यक्त होत असताना शासनाने याला कात्री लावली आहे. सरकारच्या वन व महसूल विभागाने २७ मार्च रोजी नव्याने शासन आदेश जारी केला.

यात दुप्पट मदतीचा जीआर रद्द केला आहे. यापुढे एनडीआरएफच्या जुन्या निकषात किंचित वाढ करून पुढील तीन वर्षासाठी मदतीचे दर निश्‍चित केले आहेत.

यात जिरायतीसाठी प्रतिहेक्टर ८५००, बागायतीसाठी १७००० तर बहुवार्षिक फळपिकांसाठी २२५०० दर निश्‍चित केला आहे. शासनाने मदतीचे दर कमी केल्यामुळे नुकसानग्रस्तांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.


एनडीआरएफ अंतर्गत सुधारित मदत (प्रतिहेक्टर/रुपये)
पिकाचा प्रकार---प्रचलित दर---दुप्पट दर---नव्याने निश्‍चित दर
जिरायती पिके---६८००---१३६००---८५००
बागायती पिके---१३५००---२७०००---१७०००
बहुवार्षिक पिके---१८०००---३६०००---२२५००



मागील महिन्यात झालेल्या वादळी वारे व गारपिटीमुळे बागायती पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. अशावेळी नुकसानग्रस्तांना भरघोस मदत देण्याऐवजी मागील हंगामातील मदतीच्या दरात कपात करून शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
- अर्जुन व्यवहारे, डोंगरगाव, ता. मुदखेड, जि. नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com