
अमरावती : अतिवृष्टिग्रस्त (Wet Drought) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Crop Damages Compensation) जाहीर झाली असून, ती थेट बँकेत जमा होणार आहे. यातील बहुतांश शेतकऱ्यांकडे पीककर्ज (Crop Loan) असल्याने त्यांच्या कर्जाची रक्कम बँकांकडून परस्पर वसूल करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती नेमकी किती नुकसानभरपाई लागेल, हा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
राज्य सरकारकडून या शक्यतेसंदर्भात कोणतीच स्पष्टता नाही. जुलै महिन्यातील अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३ लाख ८ हजार २९२ हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. २ लाख ९९ हजार ९०१ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी ५४२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नुकसानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
याच खात्यांवर बँकांनी कर्जाचा बोजा चढवला आहे. त्यामुळे नुकसानाची रक्कम जमा होताच बँका कर्जाची रक्कम ऑटो डेबिट पद्धतीने वसूल करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः राष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांकडून ही शक्यता अधिक आहे.
तत्कालीन ठाकरे सरकारच्या काळात कर्जमाफी दिल्यानंतर शेतकऱ्यांचे कर्जखाते जवळपास निरंक झाले आहे. काही शेतकऱ्यांकडे अधिक कर्ज शिल्लक राहिल्याने व नवीन कर्ज असल्याने थकीत वाढल्याचा युक्तिवाद बँकांचा आहे.
वसुलीसंदर्भात स्पष्टता नाही शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीककर्जाची वसुली नुकसानभरपाईपोटी मिळणाऱ्या रकमेतून करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या पातळीवरून काहीच निर्देश नाहीत. त्यासंदर्भात स्पष्टता नसल्याने काहीच सांगता येत नाही, असे जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.