
अमरावती : राज्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव वाढता आहे. त्या पार्श्वभूमीवर यासाठीचे लसीकरण मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही लसीकरणासाठी प्रत्येकी शंभर रुपये पशुपालकांकडून( Animal Husbandry) घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या विषयी तक्रारी झाल्यानंतर प्रकरणातील दोषी पशुधन पर्यवेक्षक सविता खनखने यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यात सद्यःस्थितीत ‘लम्पी स्कीन’मुळे जनावरे बाधित झाली आहेत. अनेक भागांत जनावरांचा मृत्यूदेखील झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लम्पी’च्या नियंत्रणासाठी लसीकरणावर (Lumpy Skin Vaccination) शासनाकडून भर दिला गेला आहे.
हे लसीकरण निःशुल्क करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतर देखील दुर्गम मेळघाटात पशुपालकांकडून लसीकरणासाठी प्रत्येकी शंभर रुपये वसूल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिखलदरा पंचायत समितीअंतर्गत असलेल्या टेंबूसोंडा भागात लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पशुधन पर्यवेक्षक सविता खनखने यांनी जनावरांना लसीकरण करण्यासाठी सुरुवात केली. मात्र त्यासाठी प्रत्येकी शंभर रुपये आकारले जात होते.
या संदर्भात पशुपालकांनी तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले.
एकाच आठवड्यात दोघांचे निलंबन
तीन दिवसांपूर्वीच सहायक पशुसंवर्धन अधिकारी सदाशिव सातव यांनी लम्पी ऐवजी भलतीच लस जनावरांना दिली होती. तब्बल दीडशे जनावरांना ही लस दिली गेली. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर आता लसीसाठी पैसे घेतल्यामुळे पशुधन पर्यवेक्षकाचे निलंबन करण्यात आल्याने पशुसंवर्धन खात्याच्या कारभाराविषयी चर्चा रंगल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.