‘लम्पी स्कीन’ कशामुळे होतो?
गोवंश आणि म्हैस वर्गात दिसणारा ‘लम्पी स्कीन’ हा विषाणूजन्य आजार (Lumpy Skin Disease) आहे. हा विषाणू देवी गटातील ‘कॅप्री पोक्स’ या प्रवर्गातील असून, शेळ्या-मेंढ्यांतील देवी रोगाच्या (Goat Pox Virus) विषाणूशी साधर्म्य आढळते. आपल्या देशात प्रामुख्याने गोवंशात हा आजार दिसतो. या पूर्वीच्या संशोधनात आजाराचा प्रादुर्भाव देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरांमध्ये अधिक असतो असे नमूद आहे. मात्र आपल्या देशात हा आजार मोठ्या प्रमाणावर देशी गोवंशात दिसून येत आहे. हा आजार सर्व वयोगटांच्या नर-मादीमध्ये होत असला तरी लहान वासरात तीव्रता अधिक असते.
शेळी- मेंढीत हा आजार होतो का?
‘लम्पी स्कीन’ विषाणूचे शेळ्या-मेंढ्यांतील देवी आजाराच्या विषाणूशी साम्य आढळत असले, तरी हा आजार शेळ्या-मेंढ्यांना अजिबात होत नाही.
आजाराचा प्रसार कसा होतो?
प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्या (स्टोमोक्सिस, टॅबॅनस, हिमॅटोबिया, क्युलीकॉइड्स), डास (एडीस), गोचीड या कीटकांमुळे होतो. निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने किंवा लाळ, नाकातील स्रावाने दूषित झालेला चारा आणि पाण्याद्वारे प्रसार होवू शकतो.
प्रादुर्भाव कोणत्या हवामानात
अधिक प्रमाणात दिसतो?
उष्ण व दमट हवामान कीटक वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे आपल्या देशात, राज्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कीटकांचे प्रमाण कमी झाल्यामुळे हिवाळ्यात आजाराचे प्रमाण कमी होते.
आजाराची गुंतागुंतीची धोकादायक लक्षणे कोणती?
सतत ताप येतो. छाती, पोळी आणि पायांवर सूज येऊन जनावर लंगडते, नाकातून स्राव येतो, श्वासास त्रास होणे आदी फुफ्फुसदाह आजाराची लक्षणे दिसतात. डोळ्यांतील व्रणामुळे चिपडे येऊन दृष्टी बाधित होते, नाकात व्रण निर्माण होतात. तोंडात व्रण निर्माण होऊन चारा खाण्यास त्रास होतो.
दोन वर्षांपेक्षा या वर्षी मृत्युदर कशामुळे वाढला?
यापूर्वी जगात या आजाराचा दर २ ते ४५ टक्के (सर्व सामान्यपणे १० ते २० टक्के) आणि मृत्युदर १ ते ५ टक्यांपर्यंत आढळून आला आहे. मागील दोन वर्षांत भारतात मृत्युदर अतिशय नगण्य होता. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत साधारणत: ३.०८ लाख बधित जनावरांमध्ये फक्त १८ जनावरांचा मृत्यू झाला. हा मृत्युदर ०.००६ टक्का एवढा होता. मात्र या वर्षी कदाचित विषाणू अधिक घातक बनल्यामुळे तीव्रता वाढली असावी.
मागील साथीच्या काळात क्वचित शरीराच्या आतील अवयवात गाठी दिसून येत होत्या. मात्र या वर्षीच्या साथीत श्वासनलिका, फुफ्फुसे, यकृत आदी अवयवांतही गाठी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आजार धोकादायक झाला आहे.
देशातील इतर राज्यांत मरतुक पाच टक्क्यांच्या आसपास असली तरी महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागाच्या नियोजनपूर्वक प्रयत्नांमुळे सद्यःस्थितीत १.९ टक्का आहे.
बऱ्याच वेळा थायलोरिओसिस, बॅबेसिओसिस, अॅनाप्लाझमोसिस, न्यूमोनिया, कावीळ, गर्भाशयदाह इत्यादी आजारामुळे जनावरांचा मृत्यू दिसून आला आहे.
लम्पी सदृश लक्षणे आढळल्यास काय करावे?
लम्पी सदृश लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांशी संपर्क साधावा. आजारी जनावरास तातडीने निरोगी जनावरांपासून विलगीकरण करून विनाविलंब उपचार सुरू करावे.
आजाराची साथ पसरू नये
म्हणून काय करावे?
साथीच्या काळात गाव, परिसरातून एकमेकांच्या गोठ्यास भेटी देणे बंद करावे.
प्रादुर्भावग्रस्त भागातून जनावरांची ने-आण आणि चारा वाहतूक बंद करावी.
साथीच्या काळात गाई-म्हशींचे खरेदी-विक्री बाजार बंद ठेवावेत.
गावांमध्ये बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
आजारी जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेह उघड्यावर कुठेही न टाकता आठ फूट खोल खड्ड्यात पुरावा.
आजारी गाई-म्हशींचे दूध प्यायल्यास किंवा सान्निध्यात आल्याने मनुष्यास आजार होतो का?
अजिबात नाही, गेल्या ९३ वर्षांच्या इतिहासात हा आजार जनावरांपासून माणसास झाल्याची कुठेही नोंद नाही. परंतु शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणाने धुऊन घ्यावेत किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्यावेत. शास्त्रीयदृष्ट्या नेहमीच सर्वांनी दूध उकळून प्यावे.
वराह, कोंबडी, शेळी-मेंढीमध्ये हा आजार होतो का? यांचे मांस खाण्याने मानवाला आजार होतो का?
अजिबात नाही, या प्राण्यात आजपावेतो लम्पी स्कीन आजार झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे मांस खाण्यामुळे आजार होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शास्त्रीयदृष्ट्या नेहमीच सर्वांनी मांस शिजवून खावे.
आजारी गायीचे दूध वासरांना पाजावे का?
आजारी गायीच्या दुधात ‘लम्पी’चे विषाणू असतात. त्यामुळे वासरांना प्रादुर्भाव होऊ शकतो. शक्यतो, वासरांना प्रत्यक्ष गाईचे दूध न पाजता त्याऐवजी दूध उकळून (१ ते ३ मिनिटे, ७० अंश सेल्सिअसपर्यंत उकळवावे) थंड करून पाजावे. असे केल्याने ‘लम्पी’चे विषाणू असक्रिय होतात.
आजाराचा प्रसार करणाऱ्या कीटकांचे नियंत्रण कसे करावे?
गोठा आणि परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा. डासांचा त्रास कमी करण्यासाठी परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी.
गोचीड, त्यांची अंडी आणि त्यांच्या मधल्या अवस्थांचा नायनाट करण्यासाठी गोठ्याचा पृष्ठभाग (गव्हाण, भिंतीतील खाचखळगे) फ्लेमगने जाळून घ्यावा.
माश्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी गोठ्यातील शेणाची लवकर विल्हेवाट लावावी. शेण खड्ड्यामध्ये टाकावे. उकिरड्यावर शेण टाकल्यानंतर पॉलिथिन कागद, ताडपत्रीने आच्छादित करावे.
गाई, म्हशीस प्रखर सूर्यप्रकाशामध्ये चरावयास (सकाळी १० ते संध्या. ४ पर्यंत) सोडू नये. जेणेकरून चावणाऱ्या माश्यांचा प्रादुर्भाव कमी होईल.
कीटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गाई-म्हशींच्या अंगावर, तसेच गोठ्यात वनस्पतिजन्य किंवा जनावरांसाठी शिफारशीत रासायनिक गोचीडनाशकांची फवारणी करावी.
वनस्पतिजन्य कीटकनाशक, जसे की नीम तेल (१० मिलि), करंज तेल (१० मिलि) आणि निलगिरी तेल (१० मिलि) आणि साबण
चुरा २ ग्रॅम एक लिटर पाण्यात मिसळून गाई-म्हशींच्या अंगावर आणि गोठ्यात फवारणी करावी.
आजाराचा प्रतिबंध करण्याकरिता कोणती लस द्यावी?
आजाराच्या नियंत्रणासाठी भारतीय बनावटीची ‘लम्पी प्रोवॅक इंड’ ही लस भारतीय पशुवैद्यक संस्था, इज्जतनगर आणि राष्ट्रीय अश्व संशोधन संस्था, हिस्सार यांनी प्रायोगिक तत्त्वावर नुकतीच विकसित केली आहे. नजीकच्या काळात ती सार्वत्रिकपणे उपलब्ध होणार आहे.
सध्याच्या काळात पर्यायी लस म्हणून ‘गोट पॉक्स’ (शेळ्यातील देवी) वापरण्यात येत आहे. ही लस नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
चार महिन्यांवरील सर्व गोवंशामध्ये लसीकरण करावे.
साधारणपणे दोन ते तीन आठवड्यांत पुरेशी रोगप्रतिकारक शक्ती तयार होते आणि ती एक वर्षापर्यंत टिकते.
आजारावर लसीकरण कसे करावे?
प्रादुर्भावग्रस्त भागापासून ५ किमी त्रिज्येत येणाऱ्या सर्व गावांतील गोवंशाचे लसीकरण करावे.
लसीची साठवण ४ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात करावी. लस बर्फावर न्यावी. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी वेगळी सुई वापरावी.
लसीची वापरातील बाटली ६ तासांच्या आत संपवावी. उर्वरित लस जनावरांना न देता तिची योग्य विल्हेवाट लावावी.
आजारी जनावरांना लस अजिबात देऊ नये. बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या जनावरांना लस देऊ नये.
लसीकरण केल्यानंतर आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता किती? लसीकरण करूनही जर लम्पी आलाच तर उपचाराने बरा होतो का?
जर जनावराच्या शरीरात सुप्त अवस्थेत विषाणू असल्यास लसीकरण केल्यानंतर १५ ते २० दिवसांपर्यंत प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. लसीकरण करूनही जर ‘लम्पी’ आला, तरीही योग्य उपचाराने बरा होऊ शकतो.
मागील वर्षी ज्या गाईला ‘लम्पी’ आजार झाला असेल, तर या वर्षी परत होईल का?
शक्यता कमी आहे, परंतु जनावराची रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रकृती स्थिती कशी आहे यावर अवलंबून आहे. परंतु झाल्यास सौम्य स्वरूपाचा राहू शकतो.
गाभण गाईला
लस देता येते का?
गाभण गाईला लस देता येऊ शकते.
चारा वाहतूक केल्यावर ‘लम्पी’ आजाराचा प्रसार होतो का?
बाधित क्षेत्रातून दूषित चारा वाहतूक केल्यास आजाराचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
गोठ्यात नवीन व्यक्ती आल्यास किंवा डॉक्टर आल्यास आजाराचा प्रसार होतो का?
बाधित क्षेत्रातून योग्यप्रकारे निर्जंतुकीकरण न करता नवीन व्यक्ती आल्यास किंवा डॉक्टर आल्यास आजार होण्याची शक्यता आहे.
ऊसतोडणी कामगारांसोबत बैल आदी जनावरांचे स्थलांतर होते. त्या दृष्टीने या जनावरांच्या लसीकरणाची काय खबरदारी घेतली पाहिजे?
सदर बैलांचे कमीत कमी २८ दिवस अगोदर लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
- डॉ. अनिल भिकाने,
९४२०२१४४५३
(संचालक, विस्तार शिक्षण,
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.