
औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मोसंबीच्या झाडाचा ताण (Mosambi Sress) तुटून नवती फुटून येण्याची शक्यता आहे; मात्र ताण टिकून ठेवण्यासाठी ४.५ मिली लिहोसिन प्रति पंप या प्रमाणात फवारणी घेण्याचा सल्ला मोसंबी संशोधन केंद्र बदनापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादद्वारे मोसंबीतील आंबे बहार व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम एकतुनी येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी डॉ. पाटील बोलत होते. कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ उद्यान विद्या डॉ. संजूला भावर, पैठण तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट, कृषी पर्यवेक्षक जी. बी. मिर्झा आदी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. पाटील यांनी बहार तोडताना घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने ६०० ग्रॅम युरिया, १५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, ६०० ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश व २०० ग्रॅम सूक्ष्म अन्नद्रव्य प्रती झाड द्यावे, अशी सूचना केली.
डॉ. झाडे यांनी सद्यःस्थितीत गहू, तूर, हरभरा व उन्हाळी पिकामध्ये भुईमूग, तीळ या पिकांचा अवलंब करावा, असे सांगितले. डॉ. भावर म्हणाले, वर्षातून किमान दोन वेळा मोसंबी बागेला बोर्डोपेस्ट लावणे गरजेचे आहे. बोर्डोपेस्ट लावताना बाजारात मिळणारी तयार पेस्ट लावण्याऐवजी १ किलो कळीचा चुना पाच लिटर पाण्यामध्ये रात्रभर प्लॅस्टिकच्या अथवा मातीच्या भांड्यात भिजवावा.
याच प्रमाणात दुसऱ्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये एक किलो मोरचूद रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी दोन्ही द्रावणे तिसऱ्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये एकत्र मिसळून त्याचे तत्काळ एक मीटर उंचीपर्यंत खोडाला पेस्टिंग करावे. श्री. शिरसाठ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांसंबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाला गावचे सरपंच कल्याण वाव्हळ, उपसरपंच संदीप गोरे, अमोल गोरे, धीरज गोरे, चक्रधर गोरे, शरद गोरे, भगवान गोरे व गावचे गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.