
परभणी : ‘‘ऑनलाइन शैक्षणिक व्यवस्थापन (Online Education Management) प्रणालीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येईल. विविध शैक्षणिक प्रक्रिया स्वयंचलित होतील. कार्यप्रणालीत पारदर्शकता येईल. वेळ, श्रमाची बचत होईल. यात अभ्यासक्रम व्यवस्थापन, विद्यार्थी व्यवस्थापन, विद्याशाखा व्यवस्थापन, ई लर्निंग आणि ऑनलाइन शुल्क संकलनाचा समावेश आहे. या प्रणालीमुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम राबविण्यास मोठा हातभार लागेल,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी (Dr. Indra Mani) यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ऑनलाइन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली डॉ. मणी यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ७) कार्यान्वित करण्यात आली. या वेळी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल, भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेतील संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, आयटी सल्लागार डॉ. आर. सी. गोयल आदी उपस्थित होते.
डॉ. अग्रवाल म्हणाले, ‘‘या प्रणालीची व्याप्ती वाढविण्यात येईल. देशातील कृषी शिक्षणाचे डिजिटलायझेशन करण्यात येईल.’’ डॉ. मारवाह म्हणाले, ‘‘परभणी कृषी विद्यापीठाने शैक्षणिक व्यवस्थापन प्रणालीत लागणारी माहिती कमी वेळेत अत्यंत अचूकपणे भरली.’’ डॉ. गोयल म्हणाले, ‘‘ही प्रणाली योग्यरीत्या राबविण्याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे.’’
एकाच ठिकाणी मिळणार शैक्षणिक माहिती
ऑनलाइन शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेमधील ‘नाहेप’ प्रकल्पाद्वारे देशातील सर्व कृषी विद्यापीठात राबविण्यात येईल. विद्यापीठांच्या विविध शैक्षणिक प्रक्रियांचे स्वयंचलितकरण होईल. यामुळे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या वेळेची आणि श्रमाची बचत होऊन प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
विद्यार्थ्यांनाही योग्य पद्धतीने विविध सेवा पुरविण्यास विद्यापीठास हातभार लागेल. या प्रणालीद्वारे विविध राज्यांतील कृषी विद्यापीठांतील शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी मिळेल. यामुळे विविध शैक्षणिक धोरण व योजना राबविण्यासही मदत होईल. विद्यापीठांतर्गत एकूण १२ घटक महाविद्यालयाचा समावेश केला आहे. सर्व पदवी अभ्यासक्रम, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची माहिती यात अद्यायवत करण्यात आली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.