माणगाव : लांबलेल्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान (Crop Damage) केले. त्यामुळे शेतीचे पूर्ण चक्र बदलले असून ऋतूनुसार होणारी शेती अवकाळी पावसाच्या (Untimely Rain) संकटात सापडली आहे. थंडीच्या मोसमात होणारी कडधान्याची शेतीही (Pulses Farming) संकटात आहे. नोव्हेंबर महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी कडधान्य पेरणी (Pulses Sowing) केली. हीच शेती बहरास येत आहे.
जिल्ह्यात ऑक्टोबरअखेर अनेक शेतकरी भातशेतीची कापणी करून कडधान्याच्या शेतीस सुरुवात करतात. जमिनीच्या ओलसरपणाचा फायदा घेऊन अनेक शेतकरी वाल, मटकी, मूग, हरभरे इत्यादी कडधान्याची पिके घेतात. ऑक्टोबरमध्ये सुरुवातीस थांबलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी कडधान्य पेरली होती; मात्र अवकाळी पावसामुळे ती वाया गेली. सतत लांबणाऱ्या पावसाने कडधान्य शेतीवरही संकट आले होते.
नोव्हेंबर मध्यात पूर्णतः थांबलेल्या पावसानंतर अनेकांनी पुन्हा कडधान्य पेरली आणि योग्य हवामान सुरू झाल्याने कडधान्य बहरू लागले. असेच योग्य हवामान राहिल्यास कडधान्य शेतीतून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत. तालुक्यात जवळ-जवळ ४५० ते ५०० हेक्टर शेतीवर कडधान्य शेती केली जाते. अनेक शेतकरी या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवतात. गावाकडील शेतीतील कडधान्य म्हणून या कडधान्यांना शहरातही चांगली मागणी आहे.
रसायनी परिसरात बहुतेक शेतकऱ्यांची कडधान्यांच्या पेरणीची कामे झाली आहे. मागील महिन्यापासून पेरणीची कामेही सुरू झाली. तेव्हापासून वातावरण कोरडे, त्यानंतर आता गुलाबी थंडीचे अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे रोप उगवून वाढ चांगली होत आहे. दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. सायंकाळी आकाशात ढग येतात, थंडीचे प्रमाण कमी झाले आहे, तसेच काहीसा उकाडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. तर कडधान्यांच्या पिकावर परिणाम होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परिसरातील वडगाव, आपटे, चावणे, मोहोपाडा पंचक्रोशीतील शेतकरी खरिपाच्या हंगामातील भातपिकानंतर दुबार जास्त करून वालाचे याशिवाय मूग, चवळी, हरभरा, मटकी आदी प्रकारच्या कडधान्याचे पीक घेत आहेत. यंदा भाताच्या हंगामानंतर अनेक शेतकऱ्यांनी अनुकूल वातावरण तयार झाल्याने ऑक्टोबर शेवटच्या आठवड्यापासून कडधान्यांची पेरणी सुरू केली.
त्यानंतर कोरडे वातावरण, गुलाबी थंडी अशा अनुकूल वातावरणामुळे उगवलेल्या रोपांची वाढ चांगली झाली आहे. मात्र, दोन-तीन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. खराब हवामान लवकर निवळले, तर कडधान्यांना धोका होणार नाही. मात्र, जास्त काळ हवामान खराब राहिले, तर कडधान्यांच्या पिकाला धोका होण्याची शक्यता आहे, असे कृषीमित्र सुदाम कडपे यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.