Crop Damage : पावसामुळे ३६ लाख हेक्टर पिके मातीमोल

खरीप हंगाम धोक्यात; ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा हिरमुसला
Crop Damage
Crop DamageAgrowon

पुणे ः अतिपावसामुळे राज्यातील यंदाचा खरीप हंगाम (Kharip Season) धोक्यात आला आहे. आतापर्यंत ३६ लाख हेक्टरवरील पिके नष्ट (Crop Damage) झाली असून, पाऊस आणि त्यापाठोपाठ पीक पंचनामे असे सुरू झालेले दुष्टचक्र थांबता थांबत नाही. यामुळे कापूस, सोयाबीन ही नगदी पिके (Soybean Crop) मातीमोल होत असल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजा हिरमुसला आहे.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीने पिके कोलमडली

उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरिपाच्या पहिल्या महिन्यापासून म्हणजे जूनपासूनच राज्याच्या विविध भागांत पावसामुळे पिकांची हानी सुरू झालेली आहे. राज्यात खरिपाचा सरासरी पेरा १४० लाख हेक्टरवर होतो. शेतकऱ्यांनी कष्टाने यंदा पेरा वाढवत १४६ लाख हेक्टरच्या पुढे नेला होता.

Crop Damage
Paddy Crop Damage : लांजा तालुक्यात भातशेतीचे नुकसान

त्यातील ३६ लाख हेक्टरवरील पिके होत्याची नव्हती झाली आहेत. ‘‘सप्टेंबरअखेरपर्यंत अतिपावसाने ३४ लाख हेक्टरवरील पिके नष्ट केली होती. आता गेल्या दोन आठवड्यांत अजून सव्वा लाख हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. ऐन दिवाळीत हे घडत असून शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात सापडला आहे,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

अतिवृष्टी व वादळवाऱ्यामुळे एक ते १७ ऑक्टोबरपर्यंत १६ जिल्ह्यांमधील खरिपाचे नुकसान झालेले आहे. पांढरे सोने असलेला कापूस अनेक जिल्ह्यांत काळवंडला आहे. काही भागांमध्ये कपाशी बोंडावर आहे तर काही काही भागांमध्ये बोंडे फुटलेली आहेत. पावसाच्या पाणी बोंडात घुसल्याने कपाशीची गुणवत्ता घसरणार आहे. त्यामुळे अशा मालाला भाव मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. सोयाबीनदेखील अनेक भागांत काळे पडलेले आहे. परतीच्या पावसाचा हाहाकार सुरू असताना नुकसानभरपाईचे वाटप संथगतीने होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केलेली आहे.

‘‘दिवाळीतील सुट्टीच्या माहोलमध्ये सरकारी कर्मचारी आहेत. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत कार्यालयीन कामाची वेळ असली तरी अनेक भागात कृषी, तलाठी कार्यालये ओस पडलेली आहेत. ग्रामसेवकदेखील अनेक गावांमध्ये फिरकत नाहीत. त्यामुळे पीक पंचनाम्याची कामे उरकत नसून, झालेल्या पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना भरपाईच्या रकमाही आलेल्या नाहीत.

कडक शब्दांत बोलण्याचा प्रयत्न केल्यास क्षेत्रिय कर्मचारी आंदोलनाची धमकी देतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत. या गोंधळात शेतकऱ्यांची दिवाळी चिंतेत जाणार आहे,’’ असे वास्तव मराठवाड्यातील एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने बोलून दाखवले.

कृषी आयुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की राज्यात पाऊस सर्वत्र होतो आहे. त्यामुळे खरिपाचे नुकसान यापुढे होणार नाही याची खात्री देता येत नाही. कापणीला आलेली पिके वाया जात असल्यामुळे नेमकी हानी किती होते आहे याचा अंदाज आलेला नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या रकमा वेळेत देणे तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देणे असे दोनच पर्याय सरकारी यंत्रणेच्या हाती आहेत. मात्र दोन्ही पर्यायांवर दिवाळीच्या सुट्टीचे सावट आहे.’’

राज्यात अतिपावसामुळे नेमके काय घडत गेले

- जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत अतिवृष्टी व पुराचा ३२ जिल्ह्यांना तडाखा बसला. त्यामुळे २६ लाख हेक्टरवरील पिके नष्ट झाली.

- जुलै व ऑगस्टमध्ये सतत पावसामुळे ९ जिल्ह्यांमधील साडेपाच लाख हेक्टरवरील पिके वाया गेली.

- पावसाचा कहर चालू असतानाच सोयाबीनवर गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे चार जिल्ह्यांमधील ७३ हजार हेक्टरवरील सोयाबीन वाया गेले.

- सप्टेंबरमध्ये पुन्हा वादळी पावसाचा तडाखा १२ जिल्ह्यांना बसला. त्यामुळे खरिपाच्या मध्यावर असलेली अडीच लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली.

- ऑक्टोबरच्या दोन आठवड्यांत १६ जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला. यात सव्वा लाख हेक्टरवरील उभी पिके नष्ट झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com