Organic Fertilizer : जिवाणू खतांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास हवा...

जमिनीत सर्व प्रकारचे जिवाणू असतातच. त्यांचे काम व्यवस्थित होत नसेल तर त्यामागील कारण शोधून त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. त्या जागी त्यांचेच जातीकुळीचे आणखी लाखो जिवाणू जमिनीत टाकले तर ते योग्य काम कसे करतील? परिस्थितीतील त्रुटी दूर करणे हा योग्य इलाज आहे असे मला वाटते. याबाबत अधिक अभ्यास होणे आवश्यक झाले आहे.
Organic Fertilizer
Organic FertilizerAgrowon

द्विदल कडधान्यवर्गीय पिकाच्या (Pulses Crop) मुळावर गाठी असतात. या गाठीमध्ये जिवाणूंचे वास्तव्य असते. हे जिवाणू गाठीत राहून नत्र स्थिरीकरणाचे काम करून पिकाला नत्राचा पुरवठा (Nitrogen Supply) करतात. यामुळे द्विदल कडधान्यवर्गीय पिकांना नत्र खताचा (Fertilizer) हप्ता देण्याची शिफारस नाही. या जिवाणूंना स्थिरीकरणाच्या कामात लागणारी ऊर्जा व अन्य अन्नघटक पिकाकडून पुरविले जातात.

यामुळे पिकाला स्वतःची वाढ व उत्पादनासाठी अन्नघटक कमी उपलब्ध होत असावे. यामुळे धान्याचे तुलनेत कडधान्याचे उत्पादन नेहमीच कमी असते. या कडधान्याकडून जास्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. यामुळे आपल्या जेवणात धान्याच्या तुलनेत कडधान्याचा वापर कमी केला जातो. प्रथिने ही शरीराची गरज कडधान्यातून भागविली जाते.

कडधान्ये आपल्या गरजेपेक्षा जास्त नत्राचे स्थिरीकरण करीत असावेत. यामुळे पीक कापणीनंतर जमिनीत काही प्रमाणात नत्र शिल्लक राहतो. यामुळे कडधान्यानंतर अगर धान्य पिकात कडधान्याचे पीक मिश्र पीक म्हणून घेतले तर धान्य पिकाचे उत्पादन चांगले मिळते. ही गोष्ट अनादी काळापासून मानवाला ज्ञात होती. त्यामागील विज्ञान कदाचित ज्ञात नसेल. परंतु या कारणामुळे कडधान्याचा बेवड चांगला हे तत्त्व समाजात रूढ झाले. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण भरपूर आहे तेथे उत्पादन जास्त चांगले मिळते.

याचा अर्थ हे गाठीतील रायझोबियम जिवाणू झाडाकडून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांबरोबर जमिनीतील सेंद्रिय कर्बाचाही वापर नत्र स्थिरीकरणासाठी करू शकतात अगर नत्र स्थिरीकरणाव्यतिरिक्त इतर अन्नद्रव्य उपलब्धता आणि शरीर क्रियेत या सेंद्रिय कर्बाचा वापर केल्यामुळे उत्पादन चांगले मिळते हे ज्ञात होत नाही. रायझोबियम जिवाणू थेट झाडांना नत्र उपलब्ध करून देतात, की धान्य पिकाप्रमाणे फक्त पहिल्या पायरीचे काम करून धान्याप्रमाणेच पुढील तीन पायऱ्या पार पडल्यानंतर पिकाला नत्र उपलब्ध होतो या संबंधीचे संदर्भ पुस्तकात नाहीत.

रायझोबियम जिवाणू खताचा वापर ः

वेगवेगळ्या कडधान्य पिकासाठी वेगवेगळे जिवाणू नत्र स्थिरीकरणाचे काम करतात. अशा गटाबाबत व त्यांच्या विवक्षित जिवाणूबाबत पुस्तकात संदर्भ मिळतात. अशा वेगवेगळ्या जिवाणूंची खते बाजारात उपलब्ध आहेत. रायझोबियम जिवाणू खत बीज प्रक्रिया करून लावावे तसेच अशा बीज प्रक्रियेपेक्षा पीक उगवून आल्यानंतर सेंद्रिय खतात मिसळून वरून दिल्यास जास्त उपयुक्त असल्याचे संदर्भ भेटतात.

असे सांगितले जाते, की एखाद्या जमिनीत पूर्वी कडधान्याचे कधीच पीक घेतले नसेल तर अशा परिस्थितीत जिवाणू खताचा अवश्‍य वापर केला पाहिजे. याबाबत माझा अनुभव थोडा वेगळा आहे. ज्या जमिनीत गेले ५० ते ६० वर्षांच्या काळात कडधान्य पीक घेतलेले नाही अशा शेतात कडधान्य अगर भुईमुगासारखे पीक घेतल्यास रायझोबियम जिवाणू खत न वापरताही मुळावर गाठी भरपूर प्रमाणात दिसून आल्या व उत्पादनही चांगले मिळाले.

मग मुळावरील गाठीत रायझोबियम व्यतिरिक्त अन्य जिवाणू वाढतात, की अशा जमिनीतही रायझोबियम जिवाणू असतात हे ज्ञात होत नाही. इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जिवाणू सर्व पिकात सारखेच आहेत का पिकाप्रमाणे त्यांच्याही प्रजाती बदलत जातात? या संबंधीही संदर्भ मिळत नाहीत. जिवाणू शास्त्राच्या पुस्तकात असे संदर्भ मिळतात, की एकूण जिवाणूसृष्टीतील फार थोड्या जिवाणूंचे कार्य मानवाला ज्ञात झाले आहे. अजून बराच भाग आजही अंधारात आहे.

Organic Fertilizer
Organic Fertilizer : सेंद्रिय खतांना प्रोत्साहनाचे स्वागत, पण...

स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणू (पीएसबी) ः

शास्त्रीय जगतात जमिनीत स्फुरद टाकल्यानंतर तो लगेच स्थिर होतो, पिकाला उपलब्ध होत नाही असे सांगितले जाते. यासाठी स्फूरदयुक्त खते पिकाच्या मुळापाशी टाकावीत. चळी काढून, भोके पाडू टाकावीत. मातीशी कमीत कमी संपर्क येईल अशा पद्धतीने टाकावीत अशी शिफारस केली जाते.

Organic Fertilizer
Organic Fertilizer : जमिनीच्या जिवंतपणासाठी सेंद्रिय खतांचा वापर

मी गेले ५२ वर्षे शेती करीत आहे. माझा अनुभव असा आहे, की वरील शिफारशीप्रमाणे स्फुरदयुक्त खते कधीच टाकता आली नाहीत. यामागे आळस हे कारण नसून कामाची गडबड आणि मनुष्यबळ टंचाई हे कारण आहे. याचा अर्थ माझ्या जमिनीत पिकाला स्फुरदाचे योग्य पोषण मिळाले नाही का? पिकाचे निरीक्षण केल्यास असे कधीच जाणवले नाही.

मी स्फुरद उपलब्ध करून देणारे जिवाणू खत कधीच वापरलेले नाही. या सर्वांमागे शास्त्रीय जगताचे म्हणणे आहे, की जमिनीत दिल्यानंतर स्फूरदाचे स्थिरीकरण झाले नाही पाहिजे. आता या स्थिरीकरणासंबंधी भू-सूक्ष्मजीवशास्त्राचे म्हणणे या मालिकेत मी सुरुवातीला सविस्तर मांडले आहे. शास्त्रीय जगताचे म्हणणे असे आहे, की स्फुरद दिल्यानंतर स्फुरदाचे स्थिरीकरण न होण्यासाठी वरील शिफारसी आहेत. अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध अवस्थेत राहातात.

Organic Fertilizer
Organic Fertilizer : अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जिवाणू खते महत्त्वाची...

पिके त्यांच्या गरजेप्रमाणे शोषण करतात. जिवाणूशास्त्र म्हणते, की उपलब्ध अन्नद्रव्ये सर्वांत नाशिवंत आहेत. म्हणजेच ती पाण्यात विरघळण्याच्या अवस्थेत असतात. जादा पाण्याने ती जमिनीबाहेर अगर मुळाच्या कक्षेच्या खाली जाऊ शकतात. यामुळे स्थिरीकरण गरजेचे आहे, ते होऊ नये असे उपाय करणे गरजेचे नाही.

जमिनीत सर्व प्रकारचे जिवाणू असतात. त्यांचे काम व्यवस्थित होत नसेल तर त्यामागील कारण शोधून त्रुटी दूर करणे गरजेचे आहे. त्या जागी त्यांचेच जातीकुळीचे आणखी लाखो जिवाणू जमिनीत मिसळले तर ते योग्य काम कसे करतील? परिस्थितीतील त्रुटी दूर करणे हा योग्य इलाज आहे, असे मला वाटते. यातही सर्वांत प्रमुख म्हणजे सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणात राखणे हाच मुख्य इलाज आहे. जमिनीत आज नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर काही दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंची पाकिटे उपलब्ध आहेत.

Organic Fertilizer
Organic Fertilizer : निर्माल्यातून करणार सेंद्रिय खताची निर्मिती

प्रत्येक अन्नद्रव्यासाठी कित्येक जाती प्रजाती काम करीत असता काही ४ ते ५ प्रकारची जिवाणू खते जमिनीत दिल्यानंतर पिकाचे पोषण व्यवस्थित होईल असे गृहित कसे धरता येईल? सर्व अन्नद्रव्यांची जिवाणू खते वापरणे केवळ अशक्‍य आहे. यासाठी मी म्हणतो की जिवाणू की जिवाणूंचे खाद्य? जिवाणूंचे खाद्य योग्य प्रमाणात उपलब्ध करा बाकी सारे निसर्गावर सोपवावे.

जिवाणू नेमके कसे काम करतात?

स्फुरद उपलब्ध करणारे जिवाणू नेमके कसे काम करतात? यावर शेतकऱ्यांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. या संबंधी जिवाणूशास्त्र सांगते, हे जिवाणू कार्यरत होण्यासाठी पिकाच्या मुळातून स्राव सोडले जातात. हे स्राव म्हणजे कोणी काम करावयाचे त्यांचे अन्न असते. या स्रावातून त्यांना संदेश प्राप्त झाला पाहिजे. मगच हे जिवाणू कार्यरत होतील. सुरुवातीला ते सेंद्रिय आम्लांची निर्मिती करतात. अशा आम्लात पाण्यात न विरघळणारा स्फुरद विरघळतो.

पुढे हे आम्लाचे द्रावण पाण्यात विरघळते, पिकाला स्फुरद उपलब्ध होतो. या संदर्भातून असे लक्षात येते, की सेंद्रिय आम्ल तयार करणे जिवाणूंचे शरीरक्रिया आणि प्रजोत्पादनासाठी जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय कर्बाची गरज असते. एकदा सेंद्रिय कर्ब उपलब्ध झाल्यास पिकाच्या गरजेप्रमाणे सर्वच अन्नद्रव्ये उपलब्ध करणाऱ्या जिवाणूंना खाद्य मिळेल.

पिकाला पोषण या व्यतिरिक्त शास्त्रीय संदर्भ असे भेटतात, की एखादे अन्नद्रव्याचे स्थिरीकरण झाले तर ते पुन्हा कधीच पिकाला उपलब्ध होत नाही अगर होणार नाही का? असे होत नाही. पूर्वी केव्हातरी स्थिर झालेली अन्नद्रव्ये आज उपलब्ध होतील आणि आज स्थिर झालेली अन्नद्रव्ये पुढे केव्हातरी उपलब्ध होतील. यामुळे स्फुरदाचे स्थिरीकरणाला घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

एका देश पातळीवर शास्त्रीय संशोधनाचे काम केलेल्या शास्त्रज्ञाला मी असा प्रश्‍न केला, की १९७० ते ९० अशी २० वर्षे मला जमिनीतून उत्तम पिकाचे उत्पादन मिळाले. याचा अर्थ स्फुरदाचे त्या काळात योग्य पोषण मिळाले असले पाहिजे. त्या काळात कोणतीही जिवाणू खते वापरली जात नव्हती. मग आजही तसेच उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके काय केले पाहिजे याचे प्रबोधन करावे.

केवळ पीएसबी जमिनीत मिसळून पूर्ववत उत्पादन पातळी मिळेल का? त्यांना समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. भरपूर शेणखत, अगर पिकाचे जमिनीवरील अवशेष कुजवून त्रुटी भरून निघाली नाही. शेवटी जमिनीखालचे अवशेष जागेला विना नांगरणीत कुजविल्यानंतर उत्पादन पातळी पूर्ववत झाली. (संवर्धित शेती)

पीएसबी वापराबाबतचा एक संदर्भ ः

भारतीय कृषी संशोधन परिषदेमध्ये डॉ. सुब्बाराव यांनी संशोधन केले आहे ते लिहितात की, धान्याच्या तुलनेत भाजीपाला पिके पीएसबीच्या वापराला जास्त चांगला प्रतिसाद देतात. अशा जिवाणूंचा वापर सर्वप्रथम रशियात केला गेला. या जिवाणू खताच्या वापराला उपयुक्ततेच्या तुलनेत जास्तच महत्त्व दिल्यासारखे वाटते. वरील संस्थेत गहू, बरसीम, मका, हरभरा आणि भात अशा पिकात वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत भरपूर प्रयोग घेतले गेले आहेत. अशा एकूण ३८ प्रयोगांपैकी केवळ १३ प्रयोगांत उत्पादनात वाढ दिसून आली. तेव्हा अशा खताच्या वापरातून उत्पादनात नेहमीच वाढ मिळेल असे नाही.

संपर्क ः प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com