Ajit Pawar : अजित पवार यांचे बंड

Ajit Pawar Latest News : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिले आहे.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले असून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान दिले आहे. अजित पवार यांनी बंड करत तब्बल ३५ आमदार सोबत असल्याचा दावा करत रविवारी (ता. २) दुपारी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे- पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

राजभवनावर झालेल्या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांनी आमदारांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवारांच्या बंडावर शरद पवारांची भूमिका काय?

दरम्यान, आमच्या सत्तेतील प्रवेशाला सर्वच नेत्यांचा आशीर्वाद आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाबतचा उल्लेख टाळला. अजित पवार यांच्याबरोबर शपथ घेतलेले बहुतांश नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणवले जात होते. दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ या नेत्यांनीही शपथ घेतल्याने एकच खळबळ उडाली.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र रविवारी पवार यांनी पक्षातील बहुतांश आमदारांना सोबत घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

रविवारी सकाळी पवार यांनी देवगिरी या आपल्या शासकीय निवासस्थानी आमदारांना निमंत्रित केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाऐवजी पक्षसंघटनेत काम द्या, अशी थेट मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी तयारी सुरू केल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांच्या या मागणीकडे पवार यांनी लक्ष न दिल्याने अजित पवार यांनी बंडाची तयारी केली.

पहाटेच्या शपथविधीवेळी पवार यांचे बंड फसल्यानंतर या वेळी योग्य दक्षता घेऊन प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. पवार यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिल्यानंतर त्याचाच एक भाग म्हणून रविवारच्या बैठकीकडे बघितले जात होतो. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होती. पवार यांचे समर्थक आमदार अचानक देवगिरी बंगल्यावर दाखल होऊनही त्यांच्या बंडाची साधी कुणकुणही कोणालाच लागू दिली नाही.

Ajit Pawar
Sharad Pawar Live : शरद पवार नव्या जोमाने मैदानात उतरणार; अजित पवारांची भूमिका अमान्य

यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक सुरू होती. तसेच देवगिरी येथे सुरू असलेल्या घडामोडींचा आढावाही घेतला जात होता. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सागर या शासकीय निवासस्थानी बसून होते. त्या वेळी भाजपचे वरिष्ठ नेते येथे उपस्थित होते.

दुपारी एक वाजता राष्ट्रवादीचे बहुतांश नेते राजभवनाकडे दाखल व्हायला सुरुवात झाल्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी होत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. पवार यांच्यासह केवळ छगन भुजबळ शपथ घेतील असे सांगितले जात होते, मात्र काही वेळातच नऊ मंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली.

राजभवनावर शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली होती. या वेळी शिंदे गटाचे मंत्री दाखल झाले. तसेच भाजपचे सर्व वरिष्ठ नेतेही उपस्थित होते. राज्यपाल रमेश बैस यांनी राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना शपथ दिली. अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ या घोषणेने राजभवनातील दरबार हॉल दुमदुमला. शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आणि अन्य १० ते १२ आमदार वगळता सर्व आमदार उपस्थित होते.

Ajit Pawar
Ajit Pawar Latest News : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; राज्याच्या राजकारणात भूकंप

चौथा शपथविधी

२०१९ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद न मिटल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी अस्तित्वात येत होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचे निश्‍चित केले असताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.

हा पहाटेचा शपथविधी फार काळ टिकला नाही. ७२ तासांत या दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. या मंत्रिमंडळातही अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले.

अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि सरकार कोसळले. त्यानंतर अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले होते. त्यानंतर भाजपने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर करत अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.

Ajit Pawar
Ajit Pawar News : आता डबल इंजिन नाही ट्रिपल इंजिन सरकार; आता बुलेट ट्रेनच्या वेगाने सरकार धावेल

जितेंद्र आव्हाड आक्रमक

शपथविधी सोहळ्यानंतर बलार्ड इस्टेट येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाजवळ लावण्यात आलेल्या पक्षांच्या नेत्यांच्या फोटोला काही कार्यकर्त्यांनी काळे फासले. या वेळी जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत होते.

मुख्यमंत्री शिंदे अस्वस्थ

शपथविधी सोहळ्यानंतर सर्व नेते एकमेकांचे अभिनंदन करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक तेथून बाहेर पडले. शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे मंत्रीही बाहेर पडले. अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेते एकमेकांसोबत बोलत असताना मुख्यमंत्री बाहेर पडल्याने चर्चेला तोंड फुटले.

आदिती तटकरे यांना बढती

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात पर्यटन राज्यमंत्री असलेल्या आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री म्हणून त्यांना स्थान मिळाले आहे. तटकरे यांच्या समावेशामुळे शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. गोगावले आणि तटकरे हे पारंपरिक विरोधक मानले जात आहेत. यात तटकरे यांनी बाजी मारल्याचे बोलले जात आहे.

समजूत काढणारे सोबत

पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार यांची समजूत काढण्याची जबाबदारी दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे यांच्यावर शरद पवार यांनी सोपविली होती. या मंत्रिमंडळात वळसे पाटील, मुश्रीफ आणि तटकरे यांच्या कन्या आदिती यांच्या समावेशामुळे समजूत काढणारे या शपथविधीवेळी सोबत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com