Ajit Pawar Oath Ceremony : अजित पवार नाराज आहेत.... ते लवकरच भाजपच्या वळचणीला जाणार... दिल्लीत अजित पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली... गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या चर्चांना अखेर पूर्णविराम देत अजित पवार यांनी आठ आमदारांसह भाजप-शिवसेना सरकारबरोबर पाट मांडला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे. अजित पवार यांना नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अजून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भवितव्य काय राहील, राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडली आहे की पूर्ण विधिमंडळ राष्ट्रवादी पक्षच सत्ताधाऱ्यांना सामील झाला आहे, हे त्यानंतरच कळू शकेल.
भाजपने ज्या पध्दतीने शिवसेना फोडली तीच रणिनीती राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पाडण्यासाठी अवलंबण्यात आली का, हे त्यावरून स्पष्ट होईल.
अजित पवार यांनी केलेले हे बंड राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का आहे की, त्यांच्या आशीर्वादानेच हा खेळ मांडण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार हे थोड्याच वेळात पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि भाजप यांच्यात राजकीय लढाईला नव्याने तोंड फुटले होते. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे बंड झाले आहे. राज्याच्या राजकारणात त्यामुळे नवीन समीकरणे आकाराला आली आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे सुध्दा शपथविधी समारंभाला उपस्थित होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील हे सुध्दा बंडात सामील झाल्याने हा पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी पक्षात फुट पडल्याचे ट्विट केले आहे. परंतु राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाने सरकारला पाठिंबा दिला आहे, असे पक्ष प्रतोदांनी म्हटले आहे. भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील झाल्याचा दावा केला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.