Banana Industry Success Story : आखाती देशांपर्यंत नावाजलेला केळी उद्योगातील ‘स्टार’

Article by Mandar Mundle : केळीतील आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे निकष लक्षात घेऊन किरण डोके (कंदर, जि. सोलापूर) यांनीलागवडीपासून ते काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, निर्यातीपर्यंत सर्व सुविधा निर्माण केल्या. स्वतःच्या केळींबरोबर जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी परदेशी बाजारपेठ तयार केली.
Banana Industry
Banana IndustryAgrowon

Banana Industry : आहे. या यशस्वी कामगिरीमागे अनेक शिलेदार आहेत. कंदर (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील अवघ्या ४४ वर्षे वयाचे किरण नवनाथ डोके त्यापैकीच एक. केळी उद्योगातील ‘स्टार’ अशी बिरुदावली त्यांना दिली तर अतिशयोक्ती नको. त्यांची ३५ एकर शेती आहे.

बारावीचे शिक्षण झाल्यानंतर ते शेतीतच उतरले. सन २००६ - ०७ चा हा काळ. त्या वेळी भागात ऊस हेच मुख्य पीक होते. मात्र दूरदृष्टी व अभ्यासातून किरण यांनी व्यावसायिक आश्‍वासक पीक म्हणून चार- पाच एकरांत केळी लागवडीचे धाडस केले. पण उत्तम गुणवत्ता पिकवूनही मनासारखे पैसे होत नाहीत. खरा फायदा व्यापारीच घेऊन जातात ही गोष्ट लक्षात आली. त्यातून स्वतःच विक्री व्यवस्थेत उतरायचे नक्की केले.

‘स्टार बनानाज’ ब्रॅण्डद्वारे निर्यातीत प्रवेश

सन २००८- ०९ च्या दरम्यान किरण यांनी प्रसिद्ध कंपनीच्या फळे- भाजीपाला विभागाला
केळी पिकवून (रायपनिंग) पुरवठा सुरू केला. स्वतःच्या बागेसह परिसरातील शेतकऱ्यांकडील असा दहा टनांपर्यंत मालाचा दिल्ली, हरियानाच्या कंपन्यांना पुरवठा होऊ लागला. विक्री व्यवस्थेत हातखंडा तयार होत असल्याचा आत्मविश्‍वास आल्यानंतर २००९- १० मध्ये पॅकहाउस बांधले. शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन ‘हार्वेस्टिंग’ व काढणी पश्‍चात प्रक्रिया करून सात व १३ किलो बॉक्स पॅकिंगमधून कंपन्यांना पुरवठा सुरू केला.

सन २०१४ च्या सुमारास केळीसाठी कोल्ड स्टोअरेज (शीतगृह) हा कंदर भागासाठी नवा विषय होता. पण किरण यांनी दूरदृष्टीने या काळात तीनशे टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज उभारले. किरण बागायतदार होतेच. पण केळीच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे निकष अभ्यासून व तशी गुणवत्ता साध्य करून त्यांनी निर्यातदार म्हणून स्वबळावर दुबई मार्केटमध्ये पाऊल टाकले.
तयार झालेल्या कुशल अनुभवातून किरण डोके (केडी) एक्स्पोर्ट कंपनी तर ‘स्टार बनानाज’ हा केळीचा स्वतःचा ब्रॅण्ड तयार केला. सुरुवातीला ३० ते ३५ कंटेनर्स निर्यात होऊ लागले. निर्यात दुबईपुरती मर्यादित होती. मग ओमान, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, कतार असे एकेक देश व्यापण्यास सुरुवात केली.

आजची निर्यात, उलाढाल

आजमितीला दरवर्षी ८०० ते एकहजार कंटेनर्स केळींची आखाती देशांना निर्यात.

यात स्वतःच्या स्टार बनानाज ब्रॅण्ड केळीचे ३०० ते ३५० कंटेनर्स. तर अन्य कंपन्यांसाठीही
किरण काम करीत असल्याने बाकी संख्या त्या कंटेनर्सची.

सुरुवातीच्या काळात वार्षिक उलाढाल ७० ते ८० लाखांपर्यंत. मध्यंतरी २५ ते ३० कोटींपर्यंत व आजमितीला तब्बल ५५ ते ६०
कोटींपर्यंत पोहोचली आहे.

कंपनीत २०० ते २५० कामगार व १५ पर्यवेक्षक.

आखाती देशांची बाजारपेठ काबीज केल्यानंतर किरण यांनी युरोपीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. अन्य देशांसोबत स्पर्धा करून ही बाजारपेठ मिळवायची तर त्या गुणवत्तेचे उत्पादन घ्यावे लागेल असे किरण सांगतात.

उद्योगाच्या सुरुवातीला दीड कोटीपर्यंत गुंतवणूक. आता शासनाच्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पाचे ५० ते ६० टक्के अनुदान व प्रोत्साहन. त्याद्वारे २४०० टन क्षमतेची नवी कोल्ड स्टोअरेज यंत्रणा (पॅकहाउस, प्री कूलिंग व कोल्ड स्टोअरेज) अपेडाच्या निकषांनुसार नुकतीच उभारली आहे.

त्यासाठी सात कोटींची गुंतवणूक व ‘स्टेट ऑफ बॅंके’चे कर्ज.

Banana Industry
Agriculture Success Story : सर्जेराव जेधे यांची शेतीतील विविधता अन् प्रयोगशीलता

निर्यातीतील ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ केले विकसित

लागवड ते निर्यात अशी संपूर्ण पायाभूत यंत्रणा (इन्फ्रास्ट्रक्चर) किरण यांनी उभारली आहे. त्यातून शेतकऱ्यांसाठी मजबूत विक्री व्यवस्था उभी राहिली. वर्षभर निर्यात सुरू ठेवणे शक्य झाले.

...अशी आहे ही यंत्रणा

५० ते ६० किलोमीटर कार्यक्षेत्रात कार्य. सुमारे १५०० शेतकऱ्यांसोबत ‘केडी एक्स्पोर्ट’चे काम.

संबंधित शेतकऱ्याच्या बागेत जाऊन कंपनीच्या ‘टीम’कडून निर्यातक्षम प्लॉटची निवड. केळीच्या गुणवत्तेची तपासणी.

निवडलेल्या प्लॉटमध्ये केळीचे हार्वेस्टिंग, पाण्याच्या टॅंकमध्ये धुणे.

युरोपीय निकषांनुसार पॅकहाउसमध्ये ‘हायजेनिक’ पद्धतीने ग्रेडिंग- पॅकिंग.

पॅकहाउसमधून ३० ते ३२ अंश सेल्सिअस तापमान असलेला माल प्री कूलिंगमध्ये येतो. त्याचे तापमान १३ अंशांपर्यंत खाली आणले जाते. ही सहा तासांची ‘सायकल’.

त्यानंतर १३ अंश से. तापमानालाच माल ‘कोल्ड स्टोअरेज’ला ठेवला जातो.

त्यानंतर रेफर व्हॅन (कंटेनर)मधून केळीचे बॉक्स मुंबई- न्हावाशेवा बंदर व तेथून जहाजातून आखाती देशांना रवाना होतात. तेथे मालाच्या गुणवत्तेची पुन्हा तपासणी होते. आपणही त्या तपासणीसाठी एजन्सी नेमू शकतो. त्यातून आपल्या गुणवत्तेचा अहवाल समजतो. पारदर्शकता तयार होते. आखाती देशातील आघाडीच्या कंपन्या, सुपरमार्केट्‍स यांच्यापर्यंत हा माल पोहोचतो.

किरण सांगतात, की आखाती देशांना भेट देतो त्या वेळी स्वतःच्या ब्रॅण्डचे बॉक्स जेव्हा दृष्टीस पडतात, त्या वेळी होणाऱ्या आनंदाचे शब्दांत वर्णन करता येत नाही.

पहिल्या स्थानावर संधी

किरण सांगतात, की एकरी उत्पादन वाढ व निर्यातक्षम गुणवत्ता या बाबी साध्य केल्यास निव्वळ नफा वाढून केळी बागायतदार आर्थिक समृद्धी मिळवू शकतात. अनेक शेतकऱ्यांनी एकरी ३० ते ३५ टन उत्पादन साध्य केले आहे. केळीचे देशांतर्गत दर किलोला १५ ते १७ रुपये आहेत. त्या तुलनेत मागील तीन वर्षांत निर्यातीसाठीच्या केळीला २० रुपयांच्या पुढे व कमाल २८ ते ३०, ३२ रुपयांपर्यंत दर मिळाले आहेत.

निर्यातीच्या मार्केटची हमी तयार झाल्याने सोलापूर जिल्ह्यात केळीचे क्षेत्र १५ हजार हेक्टरहून अधिक झाले असावे. जिल्ह्यात वर्षभरातील तीनही हंगामात हे पीक घेणे शक्य आहे. त्यामुळे परदेशात वर्षभर पुरवठा शक्य आहे. भारतीय निर्यातीत आज द्राक्षे आघाडीवर आहेत. येत्या तीन- चार वर्षांत हा क्रमांक केळी घेऊ शकेल एवढी त्याची जागतिक बाजारपेठ व क्षमता आहे. आज आखाती देशांच्या मागणीच्या ५० टक्केच केळी आपण पुरवत आहोत.

कोरोना काळात पटकावली संधी

किरण सांगतात, की कोरोना काळात जग थांबले होते. त्या वेळी अपेडा, कृषी विभाग, बागायतदार व एकूणच केळी उद्योगाने मोठे कष्ट करून निर्यात सुरू ठेवली. आम्ही ‘केडी एक्स्पोर्ट’च्या माध्यमातून एका महिन्यात ५० कंटेनर्स केळी आखाती देशात निर्यात करण्यात यश मिळवले इक्वेडोर, फिलिपिन्सकडून केळी घेणाऱ्या व्यापाऱ्यांना भारतीय केळीची चव व गुणवत्ता पटली.

त्यांनी आपलेही कंटेनर्स घेण्यास सुरुवात केली. सन २०२२- २३ मध्ये भारताने १७६ दशलक्ष अमेरिकी डॉलर किंमतीची केळी निर्यात केली. पुढील तीन वर्षांत हा आकडा एक अब्ज डॉलर पर्यंत पोचेल अशी आशा अपेडाने व्यक्त केली आहे. अशा रीतीने भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन देण्यामध्ये केळी उद्योगाचा महत्त्वाचा वाटा आहे.

Banana Industry
Agriculture Success Story : प्रयोगशीलता जपत शेतीतून साधली प्रगती

भीती काय आहे?

किरण म्हणतात, सोलापूर जिल्ह्यात एकूण २५ ते ३० हजार मे. टन एवढ्या मोठ्या प्रमाणात शीतगृह क्षमता तयार झाली आहे. भविष्यात भीती आहे की केळीचे क्षेत्र वाढतेय. पण हवामान बदल, किडी-रोग, जुने वाण आदी कारणांमुळे एकरी उत्पादकता घटत चालली तर निर्यातीची मागणी पूर्ण करण्यात अडचणी येतील. आज आम्ही आंध्र प्रदेश, गुजरातमध्ये जाऊन तेथील केळी उत्पादकांसोबतही काम करू लागलो आहे.

निर्यातीचा अभ्यास

दुबईत प्रत्यक्ष जाऊन इक्वेडोर, फिलिपिन्स देशांतील केळीची गुणवत्ता तपासली. आपल्या देशापेक्षा त्यांना दुबईचे मार्केट दूर आहे. तरीही तिथे बहुतांश माल त्याच देशांचा असतो. त्यातून आपल्याला कशा प्रकारची गुणवत्ता द्यायला हवी ते समजले. तशा गुणवत्तेत सातत्य ठेवल्याने खरेदीदारांकडून मागणी सुरू राहिली आहे. आजही सौदी, दुबई, ओमान या देशांत ये-जा सुरूच असते. कृषी क्षेत्रात ‘आउटस्टॅंडिग’ हा महत्त्वाचा विषय आहे. पण निर्यातीत जोखीम घेतल्याशिवाय तुम्ही मोठ्या ताकदीने काम करू शकत नाही, असे किरण म्हणतात.

किरण यांनी व्यक्त केल्या अपेक्षा

पॅकहाउस, कोल्ड स्टोअरेज या सुविधा गरजेच्या. पण शेतकरी स्तरावर (ग्राउंड लेव्हल) खूप कामाची गरज. खते, पाणी व्यवस्थापन, ‘फ्रूट केअर’, काढणी पश्‍चात, ‘पॅकिंग या बाबी महत्त्वाच्या.

बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण हवे.

परदेशात शेतकऱ्यांसोबत बसून एकाच पिकावर ‘फोकस’ करून त्याचा आराखडा तयार करतात. तसे प्रशिक्षण देतात. तसे आपल्याकडे व्हायला हवे.

केळीचे क्लस्टर पाहता कंदर भागात केळी संशोधन केंद्राची गरज.

निविष्ठांमध्ये भेसळीची मोठी समस्या. त्यांच्या गुणवत्तेवर कडक नियंत्रणाची गरज.

तालुका निहाय शेतकरी कंपन्यांनी पाणी, माती व पान- देठ परीक्षण केंद्र सुरू करावे. आपल्याकडील खताचे परीक्षण करावे असे शेतकऱ्याला वाटल्यास तिथे ही सुविधा मिळायला हवी.

केळी ‘हार्वेस्टिंग’ करणाऱ्या कामगारांनाही हवे प्रशिक्षण. अधिकाधिक कामगार शेतीकडे आकर्षक कसे होतील याकडे लक्ष हवे.

नवे वाण

किरण सांगतात, त्रिचीला राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र आहे. तेथे तीनदिवसीय परिषदेत
ग्रॅंड नैन व निर्यात याविषयी काहीच चर्चा न घडल्याचा अनुभव आला. तमिळनाडूत नरेंद्रम, रेड केळी आदी वाणांवर ‘फोकस’ आहे.

पण महाराष्ट्रात १९९४ पासून ग्रॅंड नैन वाणावरच आपण थांबलो आहोत. इतक्या वर्षांपासून एकच वाण असल्याने ते कमजोर वाटत आहे. त्यावर विषाणूजन्य, अन्य रोग-किडींच्या समस्या वाढल्या आहेत. नवे सक्षम वाण येणे खूप गरजेचे आहे.

साधलेली प्रगती

किरण यांची २० एकर केळी व १० एकर ऊस आहे. दोन्हींची फेरपालट करतात. जमिनीच्या सुपीकतेबरोबर पिकांची एकरी उत्पादकता वाढवली आहे. कष्ट, अभ्यास, दूरदृष्टीतून उल्लेखनीय यश, आर्थिक व सामाजिक समृद्धी मिळवली आहे. उद्यानपंडित, वसंतराव नाईक स्मृती सन्मान त्याचबरोबर अनेक मानाचे पुरस्कार किरण यांना मिळाले आहेत.

आई शकुंतला, वडील नवनाथ, पत्नी उषा, मोठा भाऊ कल्याण, भावजय ज्योती अशा कुटुंबातील सर्व सदस्यांची मोलाची साथ आहे. किरण यांचा एक मुलगा यश कोल्हापूर येथे तर दुसरा रोहित बारामती येथे शिक्षण आहे. एकेकाळी वडिलोपार्जित काही शेती विकून भांडवल उभारावे लागले होते. आज ती शेती पुन्हा खरेदी केली आहे.

बॅंकेत मोठी पत तयार झाली आहे. नव्या शीतगृह जागेशेजारीच स्वयंचलित व ‘हायजेनिक’ पद्धतीचे गूळनिर्मिती युनिट उभारले आहे. चोवीस तासांत १०० टन ऊस गाळप अशी क्षमता आहे. सर्व आव्हाने झेलून शक्य तेवढी गूळ, पावडर व क्यूब्ज यांचे उत्पादन सुरू आहे. कृषी विभागाचे सहकार्य लाभले आहे.

किरण यांच्यातील गुणवैशिष्ट्ये

किरण सांगतात, शेती उद्योगाची व्याप्ती पाहता तुमचे विश्‍व तयार करण्याची संधी आहे. त्या दृष्टीने संपूर्ण ‘फोकस’ पूर्ण क्षमतेने आणि संघर्ष काळात पंधरा- पंधरा तास कष्ट केले.

कामांत पारदर्शकता, चिकाटी.

महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गुजरातपर्यंत जाऊन शेतकऱ्यांसोबत ‘कनेक्टिव्हिटी व विश्‍वासार्हता निर्माण केली.

जेऊर येथील आनंद कोठडिया यांचे मार्गदर्शन. मोठ्या कंपन्यांच्या भेटी घेऊन त्यांचे ‘व्हिजन’ अभ्यासले. त्यातून जगाचा आवाका आला.

संपर्क : किरण डोके, ९०४९१२५१३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com