Farmer Success Story : चेकनट बोरांनी केले अर्थकारण गोड

Article by Sudarshan Sutar : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ येथील पांडुरंग व सुवर्णा या चव्हाण दांपत्याने मजूर, पाणी, गुंतवणूक व देखभाल या बाबी कमी लागणाऱ्या बोराची शेती यशस्वी केली आहे.
Pandurang and Suvarna Chavhan
Pandurang and Suvarna ChavhanAgrowon
Published on
Updated on

सुदर्शन सुतार

Success Story of Ber Farming : सोलापूर जिल्ह्यात मोहोळ-पंढरपूर मार्गावर मोहोळ येथील प्रसिद्ध चंद्रमौळी गणपती मंदिराच्या मागीलबाजूस सव्वा किलोमीटरवर पांडुरंग व सुवर्णा या चव्हाण दांपत्याची साडेनऊ एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यात साडेचार एकर ऊस, दीड एकर मका, एक एकर कडवळ, अर्धा एकर बोरे आहेत. एक विहीर व बोअर आहे. पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे.

चेकनट बोराची लागवड

मोहोळ तालुक्यात मोहोळसह, अनगर, पापरी, खंडाळी, मोडनिंब आणि परिसरातील अनेक गावे बोरांसाठी प्रसिद्ध आहेत. चेकनट, चमेली, उमराण आदी विविध वाणांची विविधता असून सुमारे दोनशे एकरांपर्यंत बोराचे क्षेत्र विस्तारले असावे. पांडुरंग यांचे वडील भारतही पूर्वी बोरशेती करायचे. सन २००८ पासून उमराण वाणाची सुमारे दोनशे झाडे होती.

पांडुरंग यांनीही बारावी शिक्षणानंतर शेतीला सुरुवात केली. त्यांनीही बोरपिकावर लक्ष केंद्रित केले. आज पत्नी सौ. सुवर्णा यांच्यासह ते शेतीत राबतात. मुलगी नम्रता व मुलगा कृष्णा अशी त्यांना अपत्ये आहेत. बारकाईने या पिकाचा अभ्यास करताना पांडुरंग यांच्या लक्षात आले, की उमराणी बोरांना दर कमी मिळतो.

अनेक वेळा किलोला दोन रुपये दरावरही समाधान मानावे लागते. भुरीसारख्या रोगाचीही समस्या आहे. अशातच त्यांना चेकनेट या स्वादिष्ट व गोड बोरांविषयी व त्यांना मिळत असलेल्या चांगल्या दरांविषयी समजले. पूर्ण विचारांती २०१९ च्या सुमारास केवळ अर्धा एकर क्षेत्र व ९० झाडे ठेवली. या झाडांना चेकनट वाणाचे कलम केले. झाडांचे चांगल्या प्रकारे संगोपन केले. आज ही बाग चव्हाण यांना कष्टाचे गोड फळ देत आहे.

Pandurang and Suvarna Chavhan
Ber Market : बाजारात संकरित बोरांची चलती

व्यवस्थापन- ठळक बाबी

पांडुरंग सांगतात, की विद्राव्य खतांचा वापर विशेषतः फळधारणेपासून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आकार व चकाकी वाढते. फळधारणेच्या काळातच कीटकनाशक व बुरशीनाशकांची फवारणी करतो.

अन्य पिकांच्या तुलनेत निविष्ठा खर्च फार नाही.

झाडांचे वय जसे वाढेल त्यानुसार शेणखताचा डोस वाढविण्यात येतो. यंदा प्रति झाड १५ किलो वापर.

पाणीही मोजके लागते. फळ धरू लागल्यानंतर दररोज तीन तास ठिबकद्वारे पाणी.

पांडुरंग चव्हाण ९७३०८५८५७१

शेती शाश्‍वत करण्याचा प्रयत्न

पांडुरंग सांगतात, की आम्ही शेती शाश्‍वत करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. बोराची अर्ध्या एकरापेक्षा जास्त बाग वाढवली नाही. कारण क्षेत्र वाढवले तर मजुरांची गरज व त्यावरील खर्च वाढतो. वेचणीला मजुरांची संख्या जास्त लागते. आम्ही पती-पत्नी मिळूनच सगळी शेती करतो. मजुरांची शक्यतो मदत घेत नाही.

सध्या कमी खर्चात, कमी गुंतवणुकीत, कमी कष्टात व कमी पाण्यात चांगले उत्पादन व उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे आम्ही वळलो आहे. त्यादृष्टीने बोरपीक फायदेशीर ठरले आहे. उर्वरित शेतीतील बहुतांश खर्च त्यातूनच कमी झाला आहे. शिवाय जोड व्यवसाय म्हणून चार जर्सी गाई पाळल्या आहेत. या दुग्ध व्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. अशा नियोजनातूनचशेतीचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली आहे.

Pandurang and Suvarna Chavhan
Ber Fruit Rate : संक्रांतीमुळे बोरांच्या दरात क्‍विंटलमागे ५०० रुपयांनी वाढ

छाटणीच्या नियोजनातून दरांचा फायदा

पांडुरंग सांगतात, की संपूर्ण हंगामाचा विचार करता एकूण क्षेत्रातून पाच ते सहा टन उत्पादन मिळते. सोलापूर भागातील बोर उत्पादक मार्चच्या दरम्यान छाटणी करतात. त्याचे उत्पादन पावसाळ्याच्या सुमारास सुरू होते. त्या काळात मजुरांचीही समस्या असते. आम्ही मात्र मेच्या काळात छाटणी करतो.

त्याचे उत्पादन ऑक्टोबर- नोव्हेंबरला सुरू होऊन मार्चपर्यंत चालते. त्या वेळी मागणी व दरही असतात. चेकनट बोरे नारिंगी- पिवळसर रंगाची, स्वादिष्ट, गोड व आकारालाही चांगली असून, किलोला त्यांना ५० ते ५५ रुपये दर मिळतो. दर ३५ रुपयांपर्यंत खालीही घसरतो. पण शक्यतो त्याखाली जात नाही. उत्पादन खर्च ७० हजार रुपयांपर्यंत असतो.

बाजारपेठ मागणी

हैदराबाद- येथे ५० ते ५५ किलो बारदान्यातून बोरे पाठवता येतात. व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात.

पुणे- येथे एक किलो प्लॅस्टिक जाळीतून बोरे पाठवावी लागतात.

ॲपलबेरलाही मागणी

मोहोळ तालुक्यात ॲपलबेरचे क्षेत्रही वाढते आहे. आकाराने मोठी, हिरवीजर्द आणि गर जास्त असलेली ही बोरे चांगलीच लोकप्रिय झाली आहेत. मोहोळ येथील राजू चव्हाण दहा वर्षांपासून बोराची शेती करतात. त्यांच्याकडे एक एकर ॲपलबेर व अर्धा एकर चेकनट बोर आहे. ॲपलबेरचे एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन तर प्रति किलो २५ ते ३० रुपये दर मिळतो. पाऊस आणि वातावरणाचा थोडा-फार फरक पडतो. पण योग्य व्यवस्थापनातून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने बोरशेती फायदेशीर ठरते असे राजू अनुभवातून सांगतात.

राजू चव्हाण ९७६६४९२८४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com