Sale Exhibition
Sale ExhibitionAgrowon

Women Self-Help Group : महिला बचत गटांची ‘सरस’ वाटचाल

Sale Exhibition : रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक महिलांनी स्वयंरोजगाराचे पाऊल उचलले. बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानातर्फे (उमेद) गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे ‘सरस’ विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

Processed Items Produced by Women in Rural Self-Help Groups : ग्रामीण भागातील स्वयंसाह्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि विविध प्रक्रिया पदार्थांची विक्री आणि प्रदर्शन गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) येथे २५ ते २९ डिसेंबर या कालावधीमध्ये झाले. विविध गावांतील ७५ महिला बचत गटांचे स्टॉल सरस प्रदर्शनात होते. यामध्ये परजिल्ह्यात १८ स्टॉलचा समावेश होता.

या प्रदर्शनाचे उद्‍घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती एन. बी. घाणेकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक अय्याज पिरजादे यांच्या मार्फत प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले होते.

कोरोना काळातील परिस्थितीवर मात करत महिला बचत गटांना पुन्हा उभारी देण्यासाठी सरस प्रदर्शन फायदेशीर ठरले आहे. २०२१ मध्ये ५१ लाख, २०२२ मध्ये ३५ लाख आणि यंदाच्या वर्षी महिला गटांनी सुमारे ५० लाखांपर्यंत उलाढालीचा टप्पा गाठला आहे.

रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार म्हणाले, की गणपतीपुळे हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे वर्षाला काही लाख पर्यटक येतात. सध्या ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे गणपतीपुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात आले आहेत.

हे लक्षात घेऊन ग्राहकांना खरेदीसाठी सरस प्रदर्शनाकडे वळविण्यासाठी ‘उमेद’ने गणपतीपुळेची निवड केली. नियमित येणारा पर्यटक ‘सरस’मध्ये येऊन खरेदी करेल आणि आपसूकच बचत गटांना आर्थिक फायदा होईल असा उद्देश ठेवण्यात आला होता.

मसाला विक्रीतून एक लाखांची उलाढाल :

तिखट, कोकम, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित हळद पावडर विक्रीमधून साडवली येथील सावित्रीबाई फुले महिला स्वयंसाह्यता समूहाने या प्रदर्शनात एक लाख १० हजारांची उलाढाल केली. ‘उमेद'च्या माध्यमातून कुक्कुटपालन आणि पशुखाद्य विक्रीस सुरुवात करणाऱ्या या गटाच्या अध्यक्षा ज्योती जाधव यांनी पुढील टप्यांत विविध मसाले बनवून विक्री करण्यास सुरुवात केली.

आकर्षक पॅकिंग आणि ग्राहकांना उत्पादन किती दर्जेदार आहे, हे पटवून देण्याची क्षमता या जोरावर जाधव यांनी सरस प्रदर्शनात चांगली विक्री केली. सरस प्रदर्शनातील अन्य स्टॉलवरील हळद २०० रुपये किलोने विकली जात होती, मात्र जाधव यांच्या स्टॉलवरील हळद ३०० रुपये किलो दराने विकली गेली. सुमारे पन्नास किलोहून अधिक तिखट आणि मसाल्याची त्यांनी विक्री केली. तसेच विविध भागांतील ग्राहकांकडून मागणी नोंदवून घेतली.

Sale Exhibition
Agriculture Exhibition : आधुनिक कृषी तंत्रज्ञानासाठी कृषी प्रदर्शनाचे व्यासपीठ उपयुक्त

प्रक्रियायुक्त काजूला ग्राहकांची पसंती

देव्हारे- गणेशकोंड (ता. मंडणगड) गावातील उन्नती महिला उत्पादक गटाने २००४ मध्ये काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. सुरुवातीला दिवसाला ३०० किलो काजू फोडून तो प्रक्रिया करून विक्री सुरू झाली. त्यानंतर मागणी वाढत गेली. पुढे दर दिवसाला ६०० किलो काजू फोडण्यास या गटाने सुरुवात केली.

गटाच्या सीआरपी विमल मांजरेकर म्हणाल्या, की गटामध्ये दहा महिला सदस्या आहेत. आम्ही तयार काजू गर नालासोपारा, विरार, महाड, श्रीवर्धन येथे विक्रीस पाठवितो. नियमित काजूगराबरोबरच विविध प्रकारचे १९ स्वादांतील काजूगर तयार केले आहेत.

यामध्ये पिझ्झा काजू, लिंबू मिरची, मॅगी, मेथी मटर मलाई, कच्ची कैरी, तंदुरी, लेमन पुदिना, शेजवान, व्हेज कोल्हापुरी, ग्रीन चिली, चीज, चॉकलेट, मंचुरीयन, पेरीपेरी, लसूण, पाणीपुरी, शाहीपनीर, नमकीन, मिक्स मसाला, मसाला या काजूगरांना चांगली मागणी आहे. गटाने
‘सरस’मध्ये विक्रीसाठी ५० किलो काजूगर आणले होते. यामधून सुमारे ३२ हजारांची उलाढाल झाली.

सुरणाला ग्राहकांची पसंती

पावसाळ्यामध्ये कोकणात अनेक प्रकारचे कंद रुजून येतात. त्याची भाजी तसेच विविध पदार्थ रुचकर आणि औषधी असतात. प्रदर्शनात ग्राहकांकडून सुरण कंदाला चांगली मागणी होती. निवेली (ता. राजापूर) येथील गोपाळ कृष्ण स्वयंसाह्यता गटातील सुजाता तांबे यांनी प्रदर्शनात सुरणाच्या विक्रीतून दोन हजार रुपयांची उलाढाल केली.

सरस प्रदर्शनात प्रति किलोला २० रुपये असा चढा दर मिळाला. पाच गुंठ्यांमध्ये सुरणाची लागवड करणाऱ्या तांबे दरवर्षी गावामध्ये १०० किलोची विक्री करतात. सुरणाबरोबरच नारळ आणि सुके खोबऱ्यास देखील ग्राहकांकडून चांगली मागणी होती.

मसाला रोपांना पर्यटकांकडून मागणी

रावारी (ता. लांजा) येथील समृद्धी महिला उत्पादक गटाने वर्षभरापूर्वी भाजीपाला आणि मसाला पिकांची रोपवाटिका तयार केली. शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन गटातर्फे काळी मिरी, सुपारी, झेंडू, मिरची, वांगी, दालचिनी, लवंग आदी रोपे तयार केली जातात. गटाच्या सदस्या सुवर्णा आग्रे म्हणाल्या, की आम्ही प्रदर्शनात ४०० रोपे विक्रीसाठी आणली होती.

यातून २७ हजार रुपयांची उलाढाल झाली. मुंबई, पुण्यातील पर्यटकांकडून मसाले पिकांच्या रोपांना चांगली मागणी होती.‘उमेद’चे लांजा तालुका अभियान व्यवस्थापक किशोर पवार म्हणाले, की या गटाला आम्ही एकात्मिक शेती प्रकल्पामधून रोपवाटिकेसाठी तरतूद केली होती. प्रथमच केलेल्या रोपवाटिका प्रयोगाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Sale Exhibition
Women Self Help Group : महिला बचत गटांना चार कोटींचे कर्ज

कोकणी मेव्यासह एक हजारांहून अधिक उत्पादने

सरस प्रदर्शनातील ७५ स्टॉलवर सुमारे एक हजारांहून अधिक उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. विविध कडधान्ये, फास्ट फूड पदार्थ, रोपवाटिका (मसाला पिके, शोभिवंत झाडे, भाजीची रोपे, फळझाडे आदी), शोभेची ज्वेलरी, मसाले, प्रक्रियायुक्त काजू, खाद्यतेल, कोकणी मेवा (आंबा, काजू, करवंद, कोकम, नारळाचे पदार्थ),

सुरण, फरसाण, बांबूच्या कलात्मक वस्तू, सेंद्रिय गूळ, बेदाणे, कोल्हापुरी चप्पल, मातीची भांडी, कापडी आणि चामडी बॅग, वारली पेंटिंग, सुपारीच्या सालीपासून बनवलेल्या वस्तू, गावठी हळद, तूप, विविध प्रकारच्या चटण्या, विविध प्रकारची पिठे, पापड, लाकडी खेळणी, सरबत, रेडिमेड कपडे, विविध प्रकारचे ज्यूस आणि खाद्यपदार्थांची प्रदर्शनात रेलचेल होती.

कॅशलेस पेमेंटवर भर

प्रदर्शनात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पर्यटकांनी कॅशलेस व्यवहारांवर भर दिला होता. प्रत्येक बचत गटाकडे तशी सुविधा उपलब्ध होती. त्याचा फायदा पर्यटकांना झाला. कोकण मेव्यांपासून ते अगदी बांबूच्या वस्तू बनविणाऱ्या गटांनी कॅशलेस व्यवहार केले. मोबाईल रेंजचा अडथळा असला तरीही विश्‍वासू ग्राहकांना गटातील सदस्यांनी पेंडॉलच्या बाहेर जाऊन ऑनलाइन पेमेंट करण्याची मुभा दिली होती. या विश्‍वासार्हतेमुळे ग्राहकही समाधानी झाल्याचे आयोजकांनी आवर्जून सांगितले.

‘‘गणपतीपुळे हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळे ‘सरस’ प्रदर्शन आम्ही या गावात भरविले. गटातील महिला घरगुती पद्धतीने विविध उत्पादने तयार करत असल्याने पर्यटकांनी चांगली खरेदी केली. यातून कायम स्वरूपी बाजारपेठ बचत गटांना मिळाली आहे.’’
श्रीमती एन. बी. घाणेकर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
‘‘कोकणी मेवा, मसाल्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. यातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याने गटांतील महिलांचा आत्मविश्‍वास वाढला आहे.
अमोल काटकर, ९७६७३४६३५२उमेद, जिल्हा व्यवस्थापक (विपणन)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com