Pune News : बचत गटांद्वारे ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पुणे जिल्हा बॅंकेने पुढाकार घेतला आहे. बॅंकेच्या विविध शाखांमधून महिला स्वयंसहायता गटांना बचतीच्या प्रमाणात थेट व विनातारण अल्प मुदतीचा कर्जपुरवठा करण्यात येत आहे. चालू वर्षी एप्रिल ते मे या तीन महिन्यांत बॅंकेने २३७ गटांना ४ कोटी १८ लाख ८० हजार रुपयांचे कर्ज दिले असल्याची माहिती बॅंकेच्या सूत्रांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील महिलांना एकत्र करून बचत गट स्थापन करण्याची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या गटांनी विविध पूरक व्यवसाय सुरू करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा, असा उद्देश त्यामागे आहे. जिल्ह्यात ४० हजार २०१ गट स्थापन केले आहेत. त्यापैकी २४ हजार ५१३ बचत गट कार्यरत आहेत.
या गटांना मार्गदर्शन करण्यासाठी बॅंकेत २००० पासून महिला विकास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. एका गटात सुमारे १० ते २० महिलांचा सहभाग नोंदवून त्यांना दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.
‘एनआरएलएम’ योजनेअंतर्गत पंचायत समितीशी जोडल्या गेलेल्या बचत गटांना प्रथम कर्ज किमान एक लाख रुपयांपर्यंत आठ टक्के दराने दिले जाते.
त्यातच गटाने कर्ज हप्ते व व्याजाची नियमित आणि वेळेत परतफेड केल्यास महिला बचत गटांना बॅंकेकडून चार टक्के व्याज परतावा पुन्हा देण्यात येतो. जिल्ह्यात यापूर्वी दिलेल्या कर्जापैकी १९१५ गटांकडून २३ कोटी १ लाख दोन हजार रुपयांचे कर्ज रक्कम येणे बाकी आहे.
यामध्ये अल्प मुदतीचे १८५४ गटांकडे २२ कोटी ५६ लाख १२ हजार रुपये, मध्य मुदतीचे ६१ गटाकडे ४५ लाख ८ हजार रुपये येणे बाकी आहे. तर २५६ गटांकडे १ कोटी ४८ लाख ७२ लाख रुपयांची थकबाकी असून त्याचे प्रमाण ६.४६ टक्के आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.