Sericulture Farming : ‘जो करेल तंत्राने रेशीम शेती, तो पिकवेल मातीतून मोती’

Sericulture Production : उन्हाळ्यातील दोन महिन्यांसह वर्षभर दर्जेदार रेशीम कोष उत्पादनातून अर्थकारण उंचावून उद्योगाचे स्वरूप बदलवणे त्यांना शक्य झाले आहे. ‘जो करेल तंत्राने रेशीम शेती, तो पिकवेल मातीतून मोती’ या उक्तीचा अनुभव हे शेतकरी घेत आहेत.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon

संतोष मुंढे

Sericulture Industry : मराठवाड्यात रेशीम उद्योग वाढीस लागला आहे. आज या विभागात रेशीम उत्पादकांची संख्याआठ हजारांवर पोहोचली आहे. या यशामागे विविघ घटक कारणीभूत आहेत. रेशीम विभागाची साथ आहेच. शिवाय तुती लागवडीपासून ते कोषनिर्मितीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांनीही त्याचा अंगीकार केला आहे.

सुधारित तंत्रज्ञानाचा अंगीकार

तुती वाण बदल

सन २००० पर्यंत तुतीच्या एम पाच वाणाची लागवड होती. त्याच्या पाल्याचे एकरी उत्पादन १४ टनांपर्यंत होते. प्रति १०० अंडीपुंजांसाठी सुमारे २८८६ किलो तुती पाला लागतो. त्यामुळे जास्त बॅचेस घेण्यावर मर्यादा होत्या. सन २००१-०२ च्या दरम्यान सुधारित व्ही-१ जातीची लागवड सुरू झाली. त्यापासून एकरी २८ ते ३० टन पाला उत्पादन मिळणे शक्य झाल्याने वर्षभर मुबलक पाला मिळू लागला. बॅचेसच्या संख्येत वाढ झाली.

रोपांद्वारे लागवड व फांदी पद्धत

सन २०१६ पासून काडीऐवजी रोपांद्वारे तुतीची लागवड केली जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या सहा महिने कालावधीपेक्षा तीन महिन्यांतच बाग संगोपनास येते. पूर्वी ३० टक्क्यांपेक्षा अधिक तुटाळी पडायची. आता ही समस्या दूर झाली आहे. पूर्वी अळ्यांना पाल्याचे एकेक पान तोडून टाकण्याची पद्धत होती. यात श्रम, वेळ आणि मजुरांची संख्या अधिक लागायची. त्यावर मात करण्यासाठी शेतकरी आणि रेशीम विभागाच्या मंथनातून फांदी पद्धतीने अळ्यांना पाला उपलब्ध करून देण्याची पद्धत आली. ती पुढे कायम रूढ झाली. त्यामुळे मजूरखर्चात ४० ते ४५ टक्के बचत शक्य झाली.

बायव्होल्टाइन कीटकाचा वापर

पूर्वी कीटकांच्या ज्या जाती होत्या त्यापासून प्रति १०० अंडीपुंजांना २५ किलोपर्यंत कोष उत्पादन मिळायचे. पुढे कोलार गोल्ड जातीचे कीटक आले. त्यांच्यापासून हेच उत्पादन ४५ किलोपर्यंत मिळू लागले. सन २००२ च्या सुमारास बायव्होल्टाइन सिंगल हायब्रीड कीटकाची जात उपलब्ध झाली. त्यापासून ५० ते ६० किलो उत्पादन मिळू लागले. दोन- तीन वर्षांत बदल होऊन बायव्होल्टाइनच्या डबल हायब्रीड जातीच्या अळ्या उपलब्ध झाल्या. त्यापासून ८० ते ९० किलोपर्यंत उत्पादन मिळू लागले. जे आजगयत घेण्यात येत आहे.

Sericulture Farming
Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी

शेडची रचना

पूर्वी घरी, झोपड्यात किंवा काही शेतकरी डेरेदार झाडांखाली कीटक संगोपन करायचे. त्यात अनेक अडचणी यायच्या. धोके होते. आता ४० ते ५० बाय २० फूटाचे शेड, त्यात बांबूच्या साह्याने रॅकनिर्मिती केली जाते. बांबू रॅकऐवजी लोखंडी रॅक वापरण्याचीही संकल्पना पुढे आली. छतावर टीन पत्रा, जमिनीवर सिमेंटचा कोबा, त्यावर फरशी, चहूबाजूनी तीन फूट उंचीची भिंत, त्यावर पुढे जाळी, आवश्यकतेनुसार नेट आणि बारदान्याचा वापर असे आदर्श शेड उभे राहू लागले. जे पारंपारिक राज्यांतील शेडपेक्षा चार ते पाच पट कमी खर्चात तयार होतात.

चाॅकी कीटक संगोपन केंद्र

पूर्वी चॉकी निर्मिती (सुरुवातीच्या दोन बाल्यावस्था) करताना रेशीम उत्पादकांना तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवणे कठीण जायचे. काही वेळा या अळीअवस्था वेळेवर ओळखता येत नसत. आता म्हैसूर येथे तीन महिन्यांच्या प्रशिक्षण सुविधेमुळे रेशीम उत्पादक तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाले. आजमितीला राज्यातील ९० टक्के चाॅकीचा पुरवठा त्यांच्यामार्फंत होतो. त्यातून शेतकऱ्यांना ३१ दिवसांची बॅच २१ दिवसांवर आणणे शक्य होऊन वेळ व श्रमांची बचत करता आली.

Sericulture Farming
Sericulture Farming : रेशीम शेतीतून रोजगारनिर्मिती

उन्हाळ्यातही उत्पादन

जालान जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते सांगतात की मराठवाड्यात एप्रिल- मेमध्ये ४० अंशांच्या पुढे तापमान जाते. पूर्वी या काळात बॅच घेणे शक्य होत नसे. अलीकडील वर्षांत मात्र शेतकऱ्यांनी आपल्या बुद्धिकौशल्यातून एप्रिल- मे काळात कोष उत्पादन शक्य करून दाखविले आहे.

शेडच्या बाजूला नेट, बारदान लावणे, त्यावर ठिबक नळीद्वारे पाणी सोडणे, शेडच्या चहूबाजूला वेलवर्गीय किंवा वृक्षांची लागवड, फॉगर्स, शेडच्या छतावर पाचट आच्छादन करून त्यावर पाणी सोडणे अशा उपायांमधून शेडमधील तापमान २८ अंशांपर्यंत आणण्यात शेतकरी यशस्वी झाले. या काळात भारनियमनात विजेचा खंड पडू नये यासाठी काहींनी सोलर पॅनेल उभारले आहेत.

उंचावले अर्थकारण

बदलते तंत्रज्ञान, सुधारित व्यवस्थापन व लाभलेल्या बाजारपेठा यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण रेशीम शेतीतून उंचावले आहे. प्रति १०० अंडीपुंजांमागे ८० ते ९० किलो व कमाल १०० किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते आहे. प्रति किलो ३५० ते ४०० रुपये वा त्याहून अधिक दर मिळत असल्याने हाती समाधनाकराक उत्पन्न पडत आहे.

शेडची विशिष्ट रचना केल्याने आतमध्ये हवा खेळती राहणे तापमान, आर्द्रता नियंत्रित ठेवणे शक्य झाले आहे. उझीमाशी नियंत्रणासाठी आम्ही नेटचा वापर करतो. अभ्यासातून तापमान वाढीवर उपाय शोधल्याने एप्रिल- मेमध्येही कोष उत्पादन घेणे शक्य केले आहे.
शहादेव ढाकणे, ९४०४५ ५०२५७, देवगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर
सन २०११ पासून आम्ही रेशीम उद्योगात आहोत ‘जो करेल रेशीम शेती, तो पिकवेल मातीतून मोती’या उक्तीचा अनुभव घेत आहोत. आम्ही एक एकरातीत तुती लागवडीपासून सुरुवात केली. आज ११ आकार तुती लागवड आहे. प्रत्येक टप्प्यावर नवनवीन तंत्रज्ञान वापरत आम्ही प्रगती केली. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘सेंट्रल सिल्क बोर्ड’चा उत्कृष्ट चॉकी सेंटर पुरस्कार आम्हास प्राप्त झाला.
संतोष व मंगल वाघमारे, केकतजळगाव, ता पैठण, छत्रपती संभाजीनगर ८८८८५४४५९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com