Sericulture Farming : रेशीम शेतीतून रोजगारनिर्मिती

Sericulture Industry : रेशीम शेती उद्योगाला चालना देण्यासाठी तूती रोपवाटिका,व्यावसायिक चॉकी कीटक संगोपन केंद्र, कोष उत्पादन, रेशीम धागाकरण, ट्विस्टिंग व रेशीम धागा रंगकाम उद्योग सुरू होत आहेत. यासोबत रेशीम वस्त्राची निर्मितीला राज्यामध्ये चांगली संधी आहे.
Sericulture Farming
Sericulture FarmingAgrowon
Published on
Updated on

Employment Generation : रेशीम उत्पादनात ८० ते ८४ टक्के वाटा असलेल्या चीन या देशाचा जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक असून सध्या १४ टक्के वाट असलेल्या भारताचा दुसरा क्रमांक आहे. देश पातळीवरील रेशीम उत्पादनाचा विचार करता भारत हा असा एकमेव देश आहे की जेथे तुती रेशीम, टसर रेशीम, एरी रेशीम आणि मुगा रेशीम या चारही प्रकारच्या रेशमाचे उत्पादन होते.

रेशीम कीटकाच्या खाद्य प्रकारावरून रेशमाचे चार प्रकार पडलेले आहेत. तुती रेशीम प्रकारात रेशीम कीटकाचे खाद्य तुतीचा पाला, टसर रेशीम प्रकारात रेशीम कीटकाचे खाद्य ऐन /अर्जुन वृक्षाचा पाला, एरी रेशीम प्रकारात रेशीम कीटकांचे खाद्य एरंडाचा पाला आणि मुगा रेशीम प्रकारात रेशीम कीटकांचे खाद्य सोम /सोलू वृक्षाचा पाला आहे.

मुगा रेशीम उत्पादन फक्त भारतात होते. त्यामुळे यामध्ये भारताची मक्तेदारी आहे. भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये मूगा रेशीम उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम सोडून उर्वरित प्रकार वन्य रेशीम प्रकारात मोडले जातात. जागतिक स्तरावर तुती रेशमाला इतर प्रकारांच्या तुलनेत जास्त मागणी आहे.

देश, राज्यातील उत्पादन

भारतातील २६ प्रमुख राज्यांमध्ये रेशीम उत्पादन घेतले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून रेशीम उत्पादन घेत असलेल्या राज्यांना पारंपारिक रेशीम उत्पादन घेणारे राज्य असे संबोधले जाते. यामध्ये कर्नाटक, पश्चिम बंगाल,जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश, तमिळनाडू या राज्यांचा समावेश होतो तर उर्वरित राज्यांची अपारंपरिक राज्यांमध्ये गणना होते. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर रेशीम उत्पादनास सुरवात झाल्याने आपले राज्य अपारंपरिक रेशीम उत्पादक राज्य म्हणून गणले जाते.

देश पातळीवरील रेशीम उत्पादनाचा विचार करता स्वातंत्र्य काळापासून रेशीम उत्पादन घेत असलेल्या व सध्या एकूण रेशीम उत्पादनात ३२ टक्के वाटा असलेल्या कर्नाटकचा प्रथम क्रमांक असून त्यानंतर आंध्रप्रदेश ,आसाम, तमिळनाडू पश्चिम बंगाल यांचा क्रमांक लागतो. या राज्यांमध्ये पिढ्यान पिढ्या रेशीम उद्योग केला जात असल्याने या राज्यांमध्ये रेशीम शेती उद्योगाची घडी चांगल्यापैकी बसली आहे. देशपातळीवर रेशीम उत्पादनात कर्नाटक राज्य कायमच आघाडीवर राहिले आहे.

Sericulture Farming
Sericulture Farming Industry : रेशीम शेती उद्योगात अमर्याद संधी

महाराष्ट्रात तुती व टसर रेशमाचे उत्पादन घेतले जाते. गडचिरोली, चंद्रपूर ,गोंदिया, भंडारा, यवतमाळ, ठाणे जिल्ह्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात टसर रेशीम उत्पादन घेतले जाते.रेशीम उत्पादनात आपल्या राज्याचा देश पातळीवरील एकूण रेशीम उत्पादनात दोन टक्के वाटा आहे.

जगात बायव्होल्टाईन तुती रेशमाला प्रचंड मागणी आहे. हा प्रकार उच्च श्रेणीत मोडला जातो. महाराष्ट्रात एकूण रेशीम उत्पादनाच्या ९९ टक्के रेशीम उत्पादन हे फक्त बायव्होल्टाईन तुती रेशमाचे होते. ९९ टक्के बायव्होल्टाईन रेशीम उत्पादन घेणारे महाराष्ट्र आज भारतात एक नंबरचे राज्य आहे.

महाराष्ट्र राज्यात १९५६ साली वाई (जि.सातारा) जवळील भागात तुती रेशीम शेतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. विविध प्रयोगांती महाराष्ट्रातील वातावरण तुती आणि रेशीम कीटकांच्या वाढीसाठी अनुकूल असल्याचे सिद्ध झाल्याने तुती रेशीम शेती उद्योग शेतकरी स्तरावर राबविण्यास सुरवात झाली.

Sericulture Farming
Sericulture : प्रयोगशील शेतीत लाभतेय ‘ती’ ची रेशीम साथ...

रेशीम शेतीचा प्रसार

सुरवातीला उद्योग- ऊर्जा कामगार विभाग, खादी ग्रामोद्योग मंडळ, विदर्भ विकास महामंडळ मर्यादित तसेच बाएफ सारख्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये रेशीम विस्तार आणि विकासाचे कामकाज चालते. राज्यातील रेशीम शेती उद्योगाच्या विस्तार व विकासाच्या कामकाजामध्ये एकसूत्रीपणा येऊन राज्य रेशीम उत्पादनात आघाडीवर यावे,

राज्यातील शेतकरी, व्यापारी ,उद्योजक यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण व्हावी या हेतूने १ सप्टेंबर १९९७ पासून महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालय राज्यात अस्तित्वात आले. याचे मुख्यालय नागपूर येथे आहे. तेव्हापासून राज्यामध्ये एक सप्टेंबर हा दिवस ' रेशीम दिन ' म्हणून साजरा केला जातो.

देश पातळीवर महाराष्ट्राचा रेशीम उत्पादनात दोन टक्के वाटा आहे. आपल्याला रेशीम शेती उद्योगांमधील तुती आणि टसर खालील लागवड क्षेत्र वाढवणे, रोपवाटिका ,व्यावसायिक चॉकी कीटक संगोपन केंद्र, कोष उत्पादन,रेशीम धागाकरण, ट्विस्टिंग व रेशीम धागा रंगकाम तसेच तलम मुलायम रेशीम वस्त्राची निर्मिती

तसेच त्या आनुषंगिक विविध मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीस चांगला वाव आहे. प्रत्येक टप्प्यावर रोजगार आणि निर्यातीच्या चांगल्या संधी आहेत. त्यादृष्टीने राज्यात मनरेगा, सिल्क समग्र- दोन, पोकरा या रेशीम योजना राबविल्या जातात. विविध प्रगतिशील, विकासात्मक धोरणांची आखणी झालेली आहे.

संजय फुले, ९८२३०४८४४०

(गोरक्ष गाडीलकर हे रेशीम संचालनालय, नागपूर येथे संचालक आणि महेंद्र ढवळे हे उपसंचालक आहेत. संजय फुले हे जिल्हा रेशीम कार्यालय, पुणे येथे रेशीम विकास अधिकारी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com