Farmer Success Story : देशसेवेचे समाधान मिळतेय आता गावच्या मातीतही

Indian Agriculture : कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड येथील भरत पाटील यांनी अनेक वर्षे लष्करी सेवेत निष्ठेने आपले कर्तव्य बजावले. सेवानिवृत्तीनंतर गावी स्थायिक होऊन शेतीच करायचे असे त्यांनी ठरवले होते. त्यानुसार ते आता गावी शेतीत चांगले रमले देखील आहेत.
Bharat Patil
Bharat Patil Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्याच्या ठिकाणापासून पाच किलोमीटरवर अर्जुनवाड हे सहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथे भरत रघुनाथ पाटील हे सेवानिवृत्त जवान राहतात. बाहुबली येथे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी बोर्डिंग येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. सैनिक टाकळी येथील काही विद्यार्थीही त्यांच्यासमवेत शिकायचे. कोल्हापूरच्याच टेंबलाईवाडी येथे सैनिक प्रशिक्षणासाठी तयारी सुरू होती. या विद्यार्थ्यांबरोबर सहजच त्यांनी धावण्यासोबत अन्य चाचण्या दिल्या.

विज्ञान शाखेत शिक्षण सुरू असतानाच लष्करभरतीचे बोलावणे आले. त्यांची निवड तर झालीच. पण बरोबरच्या दहा मित्रांचीही निवड झाली. सन १९८६ मध्ये भरत लखनौ येथे प्रशिक्षणासगेले. त्यानंतर १९९२ मध्ये कोटा (राजस्थान) येथे लष्कराच्या ‘फिल्ड इस्पितळात’ शिपाई म्हणून त्यांची नियुक्ती झाली. लष्करात ज्या ठिकाणी एखादी तुकडी कार्यरत असते तिथे विशिष्ट अंतरावर अशी ‘फिल्ड इस्पितळे’ असतात. युद्धजन्य परिस्थिती उद्‍भविल्यास जखमी सैनिकांना येथे आणण्याचे काम या जवानांकडे असते. शिपाई पदापासून सुरू झालेला भरत यांचा प्रवास ‘नर्सिंग टेक्निशियन’,नायक, हवालदार, नायब सुभेदार असा सुरू राहात सुभेदार पदापर्यंत त्याची समाप्ती झाली. या काळात सुरतगड (राजस्थान), बिनागुडी (पश्‍चिम बंगाल), इटारसी, जबलपूर (मध्य प्रदेश) व पुणे येथील ‘कमांडो हॅास्पिटल’ येथेही भरत यांनी सेवा दिली.

लढणाऱ्या सैनिकांना दिले बळ

चाळीस सैनिकांची तुकडी असायची. हे सैनिक सीमेवर दिवस रात्र देशाची सुरक्षा करायचे. त्यांची सुरक्षा करण्याचे काम भरत यांच्याकडे असायचे. संवेदनशील सीमांच्या ठिकाणी मोठी जोखीम असायची. सीमेवर सातत्याने छोट्या- मोठ्या चकमकी सुरू असतात. शत्रूने पेरलेल्या भूसुरुंगांमुळे सैनिक जखमी होत असतात. अशावेळी स्वतःची कोणतीही पर्वा न करता त्या ठिकाणी जाणे, जखमी सैनिकाला भूमिगत ‘फिल्ड हॉस्पिटल’पर्यंत घेऊन येणे अशी जबाबदारी भरत तत्परतेने पार पाडत.

जखम कमी असेल तर प्राथमिक उपचारांनंतर सैनिकास पुढील उपचारासाठी पुढील दवाखान्यात हलविण्यात येते. परंतु जखमेचे स्वरूप मोठे असेल व खूप वेदना होत असतील, तर अशावेळी त्यास मोठा मानसिक आधार देण्याच्या दृष्टीने भरत जणू देवदूतासारखेच भासायचे. अशा अनेक जखमी सैनिकांच्या उपचारांचे कर्तव्य त्यांनी निष्ठेने पार पाडले. सैनिकांचे प्राण वाचविण्यासाठी ताकदीने प्रयत्न केले याचे त्यांना मोठे समाधान त्यांना आहे. संसदेवर हल्ला झाला त्या वेळी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. देशाच्या सर्व सीमांवर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली. कधीही युद्ध सुरू होण्याची भीती होती. या वेळी भरत यांनी चोवीस तास आपले कर्तव्य बजावले.

Bharat Patil
Success Story : ‘परिवर्तना’तून झालो सक्षम

शिस्तीबरोबर जपली भावनिकता

लष्करातील जवान म्हटले, की कडक शिस्त आणि कणखरपणा हे गुण असावेच लागतात. पहाटे उठणे,व्यायाम व वागण्यातील शिस्त त्यांनी जपली. पुणे येथे दोन वर्षे लष्करी इस्पितळात काम केले. या वेळी देखील मानसिक पातळीवर जवानांना आधार दिला. आस्थेने त्यांच्या घरगुती समस्या जाणून घेतल्या. लष्करी सेवेत या वेगळ्या स्तरावर त्यांनी काम केले. त्यामुळेच त्यांना वेळोवेळी पदोन्नती मिळत गेली.

Bharat Patil
Agriculture Success Story : नाईकनवरे बंधूंनी माळरान जमीन केली कसदार

ओढ गावाकडची, आवड शेतीची

भरत लष्करी सेवेत असेपर्यंत त्यांच्या वडिलांनी आपली सुमारे तीन एकर शेती सांभाळली. आता सेवानिवृत्तीनंतर मात्र भरत यांनी दोन- तीन वर्षांपासून ऊसशेतीला प्राधान्य दिले आहे. सध्या तीन एकरांपैकी दोन एकरांत उसाची लागवड केली आहे. लष्करातील कष्टाची सवय त्यांना शेतीतकामी आली. लागवडीपासून ते ऊस काढणीला येईपर्यंत बहुतांशी कामे ते स्वतः करतात. सकाळी लवकर उठून ते कामांना सुरुवात करतात.

आवश्‍यक त्या ठिकाणी मजुरांची मदत घेतली जाते. प्रत्येक वर्षी एकरी सुमारे पन्नास टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. शक्य तितका वेळ ते शेतीला देतात. येथून पुढील काळात शेतीत नवनवीन सुधारणा करण्याकडे त्यांचा कल आहे. लष्करी सेवेत असतानाच गावी स्थायिक होऊन शेती करायचे असे ठरविलेले होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना अन्य रुग्णालयाकडूनही नोकरीची संधी चालून आली होती. पण ती नाकारली. लष्करी सेवेत मिळणारे देशसेवेचे समाधान आता गावाकडच्या मातीतही त्यांना मिळत आहे.

पत्नीची खंबीर साथ

बहुतांशी सैनिकांना देशसेवेमुळे कौटुंबिक सुखापासून वंचित राहावे लागते. पत्नी, घरचे इतर सदस्य यांची महिनोनमहिने भेट होत नाही. कुटुंबाचा जवळपास त्यागच करावा लागतो. सैनिकांची ठिकाणेहीबदलत असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीचे आव्हान भरत यांच्या पत्नी रजनी यांनी पेलले.

अतिशय खडतर जीवन असतानाही त्या पतीसोबत केरळ, मिझोराम, उत्तर प्रदेश, मिझोराम, पुणे आदी ठिकाणी राहिल्या. कोणत्याही अडचणींचा बाऊ न करता हिमतीने स्थानिक परिस्थिती, संस्कृतीशी जुळवून घेतले. पाटील दांपत्याने मुलांनाही चांगले शिक्षण देण्यात काही कसूर ठेवली नाही. मोठी विवाहित मुलगी रचना ‘एम. फार्म.’ आहे. रुचिता गोंदिया येथे ‘एमबीबीएस’चे, तर मुलगा अथर्व बारावीचे शिक्षण घेत आहे.

भरत पाटील ९७६७१७७०४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com