Women Unity : सामूहिक शेतीतून महिलांचे एकीचे बळ

Article by Suryakant Netke : सावरगाव तळ (ता. संगमनेर,जि.नगर) येथील साईकृपा कृषी उत्पादक महिला महिला गटाने सामुहिक शेतीतून एकीचे बळ दाखवून दिले आहे. कांदा, मका पिकाच्या लागवडीतून त्यांनी शेतीमध्ये प्रयोगांना चालना दिली.
Women Equity
Women EquityAgrowon

सूर्यकांत नेटके

Women in Leadership : संगमनेर तालुक्यातील (जि. नगर) चंदनापुरीच्या डोंगराळ भागात सावरगाव तळ हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव. परिसरात फारसा पाऊस नसल्याने पाणीटंचाई कायम. त्यामुळे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून येथे चार वर्षांपूर्वी पाणलोटाचे काम सुरू झाले. पाणी फाउंडेशनचे काम सुरू असतानाच येथील शैला थिमटे, शैला फापाळे आणि माधुरी नेहे यांनी आदर्शगाव राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे शेतीविषयक विविध बाबीचे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर पाणी फाउंडेशनचे समन्वयक विक्रम फाटक यांच्या माध्यमातून माधुरी शिवाजी नेहे यांच्या अध्यक्षतेखाली तीन वर्षांपूर्वी साईकृपा कृषी उत्पादक महिला गटाची स्थापना केली. तालुका समन्वयक मोहन गावंडे, सविता पेटकर यांनी शेती उत्पादन वाढीसाठी गटाला मार्गदर्शन केले. गटाने पहिल्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या पीक उत्पादन स्पर्धेत सहभाग घेतला.

मात्र अपयश आले. त्यानंतर काही महिलांनी सहभाग सोडला. पुन्हा नव्याने महिला सहभागी होत दुसऱ्या वर्षी सहभाग घेतला. सध्या गटामध्ये माधुरी शिवाजी नेहे (अध्यक्ष), शैला मुकेश फापाळे (सचीव), शैला संदीप थिटमे, विद्या गणेश थिटमे, सुवर्णा माधव नेहे, अर्चना गणेश थिटमे, अंकिता प्रवीण थिटमे, अक्षदा संदीप थिटमे, इंदूबाई सोपान थिटमे, मनीषा भाऊसाहेब शिरतार, गीतांजली शिवाजी शिरतार, मीना पोपट थिटमे या शेतकरी महिला कार्यरत आहेत.

कांदा, मका लागवडीवर भर :

साईकृपा कृषी उत्पादक शेतकरी महिला गटाने सामूहिक शेती करत सावरगाव तळ परिसरात आदर्श निर्माण केला आहे. गटाने पाणी फाउंडेशनच्या पीक उत्पादन स्पर्धेत सहभागी होत दोन वर्षांपूर्वी पंधरा एकरावर एकत्रितपणे कांदा लागवड केली.

मात्र अवकाळी पावसाचा फटका बसला आणि पुरेसे उत्पादन आले नाही. पुन्हा नव्याने गटाची बांधणी केली. गेल्या वर्षी (२०२३) पुन्हा या स्पर्धेत सहभागी होत महिलांनी स्वतःच्या शेतीत एकत्रितपणे कांदा आणि मका लागवड केली.

गटाने मक्याची १५ एकरावर लागवड केली. या भागात शेतकरी मक्याची ट्रॅक्टरने पेरणी करतात. गटातील महिलांनी टोकण पद्धतीने दोन ओळींत पंधरा सेंटिमीटर आणि दोन रोपांत ५ सेंटिमीटर अंतर ठेवून लागवड केली. गटाला कृषी विभागाकडून बियाणे मिळाले होते.

टोकण पद्धतीमुळे एकरी सहा ते सात किलो बियाण्याची बचत झाली. गटाने मका पिकास स्लरी, शेणखतासह जैविक खते, जिवामृताचा वापर केला. गटाला पंधरा एकरांत ४२४ टन मका चाऱ्याचे उत्पादन मिळाले. साधारणपणे एकरी १५ ते १८ टनांपर्यत निघणारे उत्पादन एकरी २९ टनांवर गेले.

पाण्याची उपलब्धता पाहून खरिपामध्ये गटाने सोळा एकरावर कांदा लागवड केली. कांदा लागवडीला मजुरीची टंचाई भासते, मात्र गटातील महिला आणि त्यांचे कुटुंब एकत्र आल्याने मजूरटंचाईवर मात करत १६ एकरांवर कांद्याचे एकरी १० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. महिलांनी कांदा पिकासाठी स्लरी, शेणखतासह जैविक खते, जिवामृताचा वापर केल्याने उत्पादनात वाढ झाली आणि टिकवण क्षमताही वाढली.

Women Equity
Women Empowerment : महिलांची ग्लोबल भरारी

आर्थिक फायदा, पशुपालनाला मुरघास

साईकृपा कृषी उत्पादक महिला गटाने मका, कांदा लागवडीच्या वेगवेगळ्या प्रयोगातून उत्पादन वाढ केली. एकत्रीतपणामुळे बियाणे, निविष्ठा खरेदीतून जवळपास दीड लाखाची बचत झाली. प्रत्येक कुटुंबाकडे पशुपालन असल्याने मक्यापासून खात्रीशीर मुरघास मिळाला. गटाने सव्वाचारशे टन मुरघास तयार केला.

१६ एकरांतील कांद्यापासून ५१ लाख ६६ हजार रुपये मिळाले. खर्च वजा जाता ४४ लाखांचा नफा मिळाला. गटातील महिला आता दर महिन्याला दोनशे रुपयांची बचत करीत आहेत. विविध उपक्रमातून साईकृपा कृषी उत्पादक महिला बचत गटाने वेगळेपण तयार केले आहे.

दुग्ध व्यवसाय वाढीला मदत

दुग्ध व्यवसायाबाबत गोरक्ष नेहे पाटील म्हणाले, की आमच्या गावांत पंचायत समिती व अन्य माध्यमातून ५५ महिला गट कार्यरत आहेत. पाणीटंचाईशी सातत्याने सामना करणाऱ्या सावरगाव तळ येथे पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढीस लागला आहे. दररोज १५ हजार लिटर दुधाचे संकलन होते. पशुपालन व्यवसाय वाढीमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे.

Women Equity
Women Self Sufficient : नवा प्रयोग, नवी दिशा

गटशेतीचा झाला फायदा :

गटाच्या अध्यक्षा माधुरी नेहे म्हणाल्या, की गटामुळे आम्हाला सामाजिक उपक्रम, बॅंकेचे व्यवहार, खते-बियाणे खरेदी, माती परीक्षण, बीज प्रक्रिया, तसेच अन्य माहिती मिळाली. सुधारित शेती, सेंद्रिय शेतीची माहिती मिळाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन सुधारित तंत्राबाबत माहिती घेतली. एकाच्या बळातून आम्ही मजूरटंचाईवर मात करू शकलो.

संगमनेर तालुक्यातील काटवणवाडी गावातील पुरुष गटाला आम्ही सोयाबीन काढणीला मदत केली. त्या गटातील सदस्यांनी आम्हाला मका काढणीसाठी मदत केली. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी आमच्या गटाचा सन्मान केला आहे.

गटामुळे एकीचे महत्त्व समजले. एकमेकां साह्य करू ही भावनाही गावांत रुजत आहे. आता आम्ही महिला शेतकरी उत्पादक कंपनी तयार करत आहोत. त्यादृष्टीने विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांना भेटून माहिती घेत आहोत.

शेतीमधील प्रमुख बाबी :

उताराला आडवी मशागत करण्याला प्राधान्य.

सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर.

पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासणी.

माती तपासणी, बीजप्रक्रिया आणि टोकण पद्धतीने लागवडीवर भर.

माती परीक्षणानुसार सेंद्रिय, रासायनिक खतांचा वापर.

एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रणावर भर.

नीमअर्क, जिवामृत, दशपर्णी अर्काचा वापर.

कुट्टी करून पिकांचे अवशेष मातीआड करण्यावर भर.

संपर्क : माधुरी नेहे : ९६२३८९९१९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com