भगवान इंगोले
‘ॲग्रोवन’च्या दैनंदिन वाचनातून मला शेतीतील प्रयोग-संशोधन, शेतकऱ्यांचे अनुभव, सेंद्रिय निविष्ठांची शेतावरच निर्मिती, मार्केट यांसह शासनाच्या योजना अशी चौफेर माहिती मिळू लागली. वाचलेल्या ज्ञानाचा वापर शेतीमध्ये करू लागलो. त्यातूनच सेंद्रिय शेतीचा पाया रचला गेला. सोबत गावातील शेतकऱ्यांना घेऊन ‘ओम ऑर्गेनिक फार्मर’ गटाची स्थापना केली. या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी शाश्वत बाजारपेठ मिळविण्यातही आम्हांला यश मिळाले आहे.
माझा जन्म शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतीविषयी बालपणापासूनच जिव्हाळा होता. शिक्षण घेतल्यानंतर मी कंपनीत नोकरी मिळविण्याची धडपड केली. मात्र इंग्रजी फारशी येत नसल्याने तिथे माझा निभाव लागला नाही. अशातही खचून गेलो नाही. नोकरी करण्यापेक्षा स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू आई-वडील आणि कुटुंबीयांसोबत शेतीकामांत रुळत गेलो. ही गोष्ट २००२-०३ ची असेल. त्या वेळी मी साधारण वीस वर्षांचा असेल.
नांदेड जिल्ह्यातील मालेगाव (ता. अर्धापूर) हा आमचा भाग पूर्णा प्रकल्पामुळे सिंचनाखाली आलेला. त्यामुळे बागायती पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी रासायनिक निविष्ठांचा सर्रासपणे वापर करत होतो. उत्पादन चांगले येत होते. परंतु खर्च, उसनवारी घेतलेले पैसे आणि नफा यांचा काही मेळ बसायचा नाही. आपल्या पदरात काय पडते याचा विचार पुन्हा निराशावादाकडे न्यायचा. तीन-चार वर्षे मनात अनेक प्रश्न घेऊन शेती करत होतो. २००५-०६ च्या दरम्यान शेतीविषयक माहिती असलेले दैनिक ‘ॲग्रोवन’ गावात येण्यास सुरुवात झाली. वाचनातून त्याची हळूहळू गोडी वाटायला लागली. माझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे ॲग्रोवनमध्ये शोधायला लागलो.
दुसरी एक गोष्ट म्हणजे वडिलांमुळे ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या आध्यात्मिक विचारांचा प्रभाव होताच. त्यामुळे मानसिक तणाव कधी यायचा नाही. शेतीतील प्रश्नांचा उलगडा चांगल्याप्रकारे करण्याचा प्रयत्न करीत होतो. याच संस्थेच्या कृषी व ग्रामविकास यांच्या अंतर्गत शाश्वत योगिक सेंद्रिय प्रशिक्षणाला माउंट आबूला गेलो होतो. तेथे अनेक सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या.
सेंद्रिय शेतीस प्रारंभ
कमी उत्पादन, दुष्काळ आदी समस्यांमुळे शेतीमध्ये रासायनिक निविष्ठांचा वापर जास्त वाढला होता. असे म्हणता येईल, की पारंपरिक शेतीची जागा रासायनिक शेतीने घेतली होती. यातून आपण शेतजमीन आणि लोकांचे आरोग्य धोक्यात घातले आहे. या जाणिवेतून माझा शाश्वत सेंद्रिय शेतीकडे कल तयार झाला. त्याला योग-अध्यात्म विचारांची जोड देऊन सेंद्रिय शेतीचा प्रयोग मी करत गेलो.
आपण पूर्णपणे सेंद्रिय शेती करायची, हा विचार मनाशी पक्का केला होता. काही जणांकडून कौतुकाची थाप मिळत होती, तर काहींनी प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. आमच्या गावातील बालाजी सावंत, भानुदास पेंडकर, संदीप डाकुलगे, भीमराव इंगोले, एकनाथ पाटील असे काही शेतकरी याच मार्गाने जाणारे होते. त्या सर्वांचे सहकार्य, विचारांची देवाण-घेवाण यामुळे मनाला उभारी मिळाली.
शेतामधील रासायनिक खते, औषधांचा वापर पूर्ण बंद केला. शेणखत, गोमूत्र, गांडुळांचा वापर करून शेती करू लागलो. रासायनिक निविष्ठांवरील खर्च कमी झाल्याने शेतीमध्ये नफा मिळू लागला. उत्पादन व जमिनीचा कस वाढल्यामुळे उत्साह वाढीस लागला. साधारण ४ ते ५ वर्षे याच प्रकारे शेती सुरू होती. सेंद्रिय शेतीविषयी असलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांना जात होतो. ही प्रशिक्षण शासनाच्या कृषी विभाग, आत्मा नांदेड, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी, एनजीओ अशा वेगवेगळ्या प्रकारची होती. या सर्वांचा मला खूप फायदा होत गेला.
शेतकऱ्यांची प्रमुख आणि महत्त्वाची अडचण म्हणजे शेतीमालाला योग्य बाजारपेठ आणि भाव मिळणे. शेतकरी रक्ताचे पाणी करून मोठ्या कष्टाने शेतीतून दर्जेदार उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यापुढील शेतमाल उत्पादन विक्री आणि त्यास मिळणारा दर गोष्टी त्याच्या नियंत्रणात नसतात. त्यासाठी मार्केटची साखळी, विक्रीचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे. हीच बाब ध्यानात घेऊन मी शेती कसण्याबरोबरच व्यावहारिक बाजूकडेही लक्ष द्यायला शिकलो. या कामी ॲग्रोवन सोबतीला होताच.
बोंड अळी दाखवा, हजार रुपये मिळवा
काही वर्षांपूर्वी कपाशीचे पीक बोंड अळीमुळे धोक्यात आल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले होते. त्या काळात एका मंचावर मी जाऊन ‘‘माझ्या शेतात बोंड अळी दाखवा आणि हजार रुपये मिळवा’’, असे आवाहन केले. दुसऱ्याच दिवशी कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठातील तज्ज्ञ, गावातील लोक माझ्या शेतात आले. त्यांनी पिकाची बारकाईने पाहणी केली. त्यांनाही काही वर्षांपूर्वी कपाशीचे पीक बोंड अळीमुळे धोक्यात आल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले होते. त्या काळात एका मंचावर मी जाऊन ‘‘माझ्या शेतात बोंड अळी दाखवा आणि हजार रुपये मिळवा’’, असे आवाहन केले. दुसऱ्याच दिवशी कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठातील तज्ज्ञ, गावातील लोक माझ्या शेतात आले. त्यांनी पिकाची बारकाईने पाहणी केली. त्यांनाही माझ्या शेतात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला नसल्याचे पटले. कपाशीसाठी वापरलेल्या आणि आम्ही तयार केलेल्या सेंद्रिय निविष्ठा त्यांनी पाहिल्या. सेंद्रिय शेतीचा हा उपक्रम पाहून जिल्हा परिषद नांदेडचा कृषिनिष्ठ पुरस्कार मला मिळाला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.