Women Entrepreneurs : प्रशिक्षणातून घडताहेत महिला उद्योजिका

Women Empowerment : बदलत जाणारे वातावरण आणि त्यामुळे होत असलेल्या शेतीपद्धतीमधील बदलांमुळे शेतकरी कुटुंबांना शाश्‍वत उत्पन्नाच्या साधनाची नितांत आवश्यकता आहे. शाश्‍वत उत्पन्न, बदलाची गरज आणि ग्रामीण महिला आर्थिक उन्नतीसाठी सगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील कृषी विज्ञान केंद्राने कार्यक्षेत्रामध्ये महिला उद्योजक घडविण्यास सुरुवात केली आहे. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
Women Skill Development
Women Skill DevelopmentAgrowon
Published on
Updated on

डॉ. माधुरी रेवणवार

Agriculture Success Story : ग्रामीण महिलांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती. परंतु वातावरण अनिश्‍चितता तसेच यांत्रिकीकरण यासारख्या कारणांमुळे महिलांना शेतीमध्ये वर्षभर रोजगार उपलब्ध होत नाही. रोजगार न मिळाल्याने त्याचा परिणाम हा कुटुंबाच्या आर्थिक घडीवर निश्‍चितच होतो. हे लक्षात घेऊन संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्राने ग्रामीण भागात महिलांना लघू उद्योगासाठी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कृषी विज्ञान केंद्रातील प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांना बाजारपेठेच्या गरजेनुसार कोणता प्रक्रिया उद्योग निवडावा, कच्चा माल कोठून आणि कसा घ्यावा, यंत्रसामग्री काय असावी, प्रक्रिया, पॅकिंग, लेबलिंग, मार्केटिंग, प्रकल्प अहवाल याबाबत मार्गदर्शन केले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना गरजेनुसार तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते.

रेडिमेड गारमेंट उद्योगाला सुरुवात

मुखेड (जि.नांदेड) येथील माधुरी इंगोले यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून एक महिना रेडिमेड गारमेंट प्रशिक्षण पूर्ण केले. मुखेड येथे त्यांचे छोटेसे टेलरिंग युनिट होते. परंतु कौशल्य प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतःचे एसएस गोल्ड अॅण्ड फॅशन डिझायनर अॅन्ड ट्रेनिंग सेंटर सुरु केले. याबाबत त्या म्हणाल्या, की रेडिमेड गारमेंट उद्योग व्यवसायासाठी मला कृषी विज्ञान केंद्रातील उद्यमिता लर्निंग सेंटरमध्ये प्रशिक्षण मिळाले.

त्यानंतर मी स्वतःचे युनिट सुरू केले. मुखेड येथील माझ्या सेंटरमध्ये नियमित १५ ते २० महिला प्रशिक्षणास येतात. सोबत वेगवेगळ्या विभागातर्फे कपडे, बॅग इत्यादीची मागणी मी वेळेत पूर्ण करते. प्रशिक्षण प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात प्रशिक्षिका म्हणून काम केले. या लघू उद्योगातून मला दर महिना वीस हजारांचे उत्पन्न मिळते.

Women Skill Development
Women Entrepreneur : महिला उद्योजकांचे ‘आई’कडे दुर्लक्ष

निंबोळी प्रक्रियेमुळे शेतीला हातभार

स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेमार्फत सुरू झालेल्या लोहा (जि. नांदेड) येथील प्रेमासखी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला चालना मिळाली आहे. या कंपनीमध्ये ५५० हून अधिक सदस्या आहेत. या सर्व सदस्या प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादन घेतात. सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये कडूलिंबाचा महत्त्वाचा वाटा आहे. या कंपनीतर्फे निंबोळीपासून पावडर, तेल, पेंड निर्मिती केली जाते.

याबाबत उद्यमिता लर्निंग सेंटरच्या माध्यमातून उद्योगासाठी यंत्रणा तसेच कडूलिंबाच्या पानांपासून अर्क निर्मिती आणि त्यापासून साबण, शाम्पू, जेल निर्मितीबाबत महिलांना प्रशिक्षण मिळाले. कंपनीच्या सदस्या स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठांचा वापर करतात. तसेच येत्या काळात मोठ्या प्रमाणात सेंद्रिय निविष्ठांची निर्मिती करून बाजारपेठेत विक्री करणार आहेत.

करवंद प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी

इंजनगाव (ता. वसमत, जि. हिंगोली) येथील कु. शीतल आडकीने यांनी करवंद प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, की माझे वडील सदाशिव आडकीने यांनी शेतामध्ये करवंदाची लागवड केली आहे. मागील तीन वर्षांपासून गुलाबी करवंद आम्ही एका कंपनीला विकत होतो. परंतु कृषी विज्ञान केंद्रामध्ये मी आणि माझी आत्या वर्षा शंकर कदम यांनी करवंदापासून चविष्ट लोणचे, जॅम, स्वॅश निर्मितीबाबत प्रशिक्षण घेतले. तसेच प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीबाबत सविस्तर मार्गदर्शन घेऊन प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. आम्ही यंदाच्या हंगामात वीस टन करवंदावर प्रक्रिया केली आहे.

डाळ निर्मिती उद्योगातून प्रगती

रातोळी (ता. नायगाव, जि. नांदेड) सौ. छाया संतोष मठपती या शिवकृपा स्वयंसाह्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेऊन डाळ मिल उद्योगाला सुरुवात केली. याबाबत त्या म्हणाल्या, की, माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. लहानपणी माझे वडील वारले. गरीब परिस्थितीतही आईने बारावीपर्यंत माझे शिक्षण केले. २००८ मध्ये माझा विवाह संतोष मठपती यांच्यासोबत झाला.

Women Skill Development
Women Entrepreneurs : सौर वाळवण तंत्र वापरातून ३५ महिला झाल्या उद्योजिका

मला लघू उद्योगाची आवड असल्याने २०१४ मध्ये सात हजार रुपयांच्या भांडवलावर मी जनरल स्टोअर्स सुरू केले. २०१५ मध्ये झेरॉक्स आणि गिफ्ट सेंटर आणि २०१७ मध्ये कापड दुकान सुरू केले. या दरम्यान २०२३ मध्ये कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीच्या दृष्टीने मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये डाळ निर्मितीबाबत तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले.

यामध्ये मला डाळ मिलची संपूर्ण माहिती आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले. त्याचबरोबरीने गुणवत्तापूर्ण उत्पादन, पॅकिंग आणि विक्रीबाबत सविस्तर मार्गदर्शन घेतले. यानंतर जनरल स्टोअर्स, गिफ्ट सेंटर आणि कापड दुकानाच्यासोबत मी डाळ मिल प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. या प्रक्रिया उद्योगातून दर महिना मला पंचवीस हजारांचे उत्पन्न मिळते.

प्रशिक्षणाचे यश

कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘बीव्हीआयएल’ कौशल्य विकास कार्यक्रमात ३ दिवस, ७ दिवस व ३० दिवसांचे प्रशिक्षण उपलब्ध असते. मागील एका वर्षात २०० महिलांनी दहा विविध विषयातील प्रशिक्षणे घेतली. या प्रशिक्षित महिलांमधून २६ महिलांनी घरगुती स्तरावर उद्योग यशस्वीरीत्या सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये सहसा महिलांसाठी उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती किंवा शेत मजुरी हेच आहे.

परंतु या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले तर त्यांना नक्कीच आर्थिक उत्पन्नाचे पर्यायी मार्ग दिसतात. हे प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिसून आले. महिलांमध्ये उपजत व्यवसायासाठी आवश्यक गुण असतात. परंतु त्याला चालना देणे आणि योग्य प्रशिक्षणातून जाणीवपूर्वक पाठिंबा देणे गरजेचे आहे. मागील वर्षभरात या प्रकल्पातील प्रशिक्षित महिलांचे आर्थिक उत्पन्न सर्वसाधारणपणे २,५०० रुपयांपासून २५,००० रूपयांच्यापर्यंत वाढलेले दिसून आले आहे. यामध्ये उद्योगपरत्वे उत्पन्नात बदल दिसतो. यापुढे या सर्व महिलांना विपणन व्यवस्थेसाठी चांगली साखळी तयार करून देण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्राचा प्रयत्न आहे.

प्रकल्पामधील प्रशिक्षण

सोयाबीन मूल्यवर्धन

कोरफड मूल्यवर्धन

डाळ प्रक्रिया

फळ प्रक्रिया

मसाला प्रक्रिया

निंबोळी प्रक्रिया उद्योग

निर्जलीकरण

करवंद प्रक्रिया

लिंबू प्रक्रिया

आंबा प्रक्रिया

आवळा प्रक्रिया

सीताफळ प्रक्रिया

शिवणकाम

रेडिमेड गारमेंट निर्मिती

डॉ. माधुरी रेवणवार ९४०३९६२०१४

(वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com