Source of Income Poultry Management :
शेतकरी नियोजन
कुक्कुटपालन
शेतकरी :
आकाश दत्तात्रय काळंगे
गाव : फत्यापूर, ता. जि. सातारा
एकूण शेड : १
पक्षी क्षमता : ४२ हजार
सातारा जिल्ह्यातील फत्यापूर (ता. सातारा) येथील आकाश दत्तात्रय काळंगे हे तरुण पदवीधर शेतकरी आहेत. कुटुंबाची अकरा एकर बागायत शेती असून त्यात ऊस, आले यांसह हंगामी पिकांची लागवड केली जाते. शिक्षण घेत असतानाच आकाश यांनी शेतीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. पदवीधर झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीची पूर्ण जबाबदारी घेतली. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन करण्याचा सल्ला आकाश यांचे भाऊजी संतोष घाडगे यांनी दिला.
त्या वेळी फत्यापूर गावासह शेजारील कामेरी गावात करार पद्धतीने मांसासाठी कुक्कुटपालन व्यवसाय करणारे अनेक शेतकरी होते. त्यामुळे आकाश यांनी लेअर कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सांगली व विटा येथील ऑटोमेशन यंत्रणा असलेल्या कुक्कुटपालन युनिटला भेट देऊन पाहणी केली. हे युनिट खर्चिक असले, तरी कमी मनुष्यबळ आणि वेळेत बचत करणारे असल्याने या पद्धतीने कुक्कुटपालन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
युनिट निर्मिती
अत्याधुनिक युनिटसाठी आकाश यांनी बँकेचे कर्ज घेतले. २०१७ मध्ये २३० फूट लांब व ३३ फूट रुंदीचे पत्र्याचे शेड शेतामध्ये उभारणी केली. अशी सुमारे ४२ हजार पक्षी क्षमता असलेली तीन अत्याधुनिक युनिट बसविली. या युनिटमध्ये कोंबडीची विष्टा व अंडी स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून बाहेर टाकली जातात.
कोंबड्यांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी निप्पल यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे कोंबड्यांना आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध होते.
२०१८ मध्ये प्रत्यक्ष तीन महिने वयाच्या ४२ हजार पक्ष्यांची खरेदी करून कुक्कुटपालनास सुरुवात केली. त्यानंतर साधारण एक महिन्याने कोंबड्यांनी अंडी उत्पादन देण्यास सुरुवात केली.
दर्जेदार खाद्यासाठी फीड मिल
अंडी उत्पादनासाठी कोंबड्यांना दर्जेदार खाद्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे उत्तम दर्जाचे खाद्य पक्ष्यांना देण्याचा आकाश यांचा प्रयत्न असतो.
खाद्य आणि इतर व्यवस्थापनातील बाबींवर खर्च जास्त होत असल्याने शिल्लक कमी राहत होती. ही बाब लक्षात आल्यावर स्वतःची फीड मिल तयार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
फीडमिल उभारण्यासाठी युनिटच्या बाजूला ४० फूट लांब आणि ३० फूट रुंद आकाराचे शेड तयार केले. त्यामध्ये फीड मिल बसवून घेतली. त्यास सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च आला. खाद्य निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करून त्यापासून दर्जेदार खाद्य तयार केले जाते. त्यामुळे खाद्यावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चामध्ये बचत झाल्याचे आकाश सांगतात.
विक्री व्यवस्थापन
सुरुवातीच्या काळात अंडी उत्पादन कमी मिळते. मात्र हळूहळू उत्पादनात वाढ होत जाते. संपूर्ण शेडमधून दिवसाकाठी सरासरी २५ हजार अंडी उत्पादन मिळते.
अंड्याची विक्री जागेवरूनच केली जाते. सण, उत्सवाच्या काळात अंडी दर कमी होतात. अशावेळी कमी दराने अंडी विक्री करावी लागते.
वीज बिल, मजुरी, खाद्यासाठीचा कच्चा माल, कर्जाचे हप्ते, वाहतूक हा सर्व खर्च वजा करता साधारण १५ ते २० टक्के रक्कम शिल्लक राहते.
युनिटमधील कामासाठी एक जोडपे ठेवलेले आहे. यांत्रिकीकरणामुळे मनुष्यबळ कमी लागते.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
अंडी उत्पादनासाठी १२ आठवडे वयाच्या कोंबड्यांची खरेदी केली जाते. या कोंबड्यापासून साधारण दीड वर्ष अंडी उत्पादन मिळते. त्यानंतर या कोंबड्यांची विक्री करून नवीन लॉट आणला जातो.
युनिटमधील कामांना सकाळी चारपासून सुरुवात होते. प्रथम युनिट स्वच्छ केले जाते. शीट बेल्टद्वारे कोंबड्याच्या विष्टा बाहेर काढली जाते.
दुपारी तीन ते पाच या वेळेत यांत्रिक बेल्टद्वारे अंडी काढली जातात. त्यानंतर अंडी ट्रेमध्ये भरून विक्रीसाठी पाठवली जातात.
दर ४० दिवसांनी लासोटा, त्यानंतर चार दिवसांनी ट्रेसवेल, ॲन्टीटॉक्स ही औषधे दिली जातात.
फीड मिलमध्ये आठ दिवसांचे खाद्य तयार केले जाते. आगाऊ खाद्याची निर्मिती करून त्याचा साठा करून ठेवला जातो.
दिवसभर पोल्ट्री शेडमध्ये वीजपुरवठा अखंडित सुरू ठेवला जातो. वीजपुरवठा खंडित झाल्यास आवश्यकतेनुसार जनरेटरचा वापर केला जातो.
ऋतुनिहाय व्यवस्थापन
वर्षातील तीनही हंगामांत पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जाते. ऋतुनिहाय व्यवस्थापन पद्धतीत बदल केले जाते.
पावसाळ्याच्या दिवसांत पक्षी व खाद्य भिजणार नाही याची काळजी घेतली जाते.
थंडीच्या दिवसांत शेड पूर्णपणे बंदिस्त केले जाते. त्यासाठी आवश्यकतेनुसार पडद्यांचा वापर केला जातो. जेणेकरून पक्ष्यांचे थंड वाऱ्यांपासून संरक्षण होईल.
उन्हाळ्याच्या दिवसांत उष्ण हवामानाचा पक्ष्यांवर ताण येतो. त्यामुळे अंडी उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता असते. त्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांत युनिटमध्ये गारवा निर्मितीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. त्यामध्ये शेडच्या पत्र्यावर आच्छादन केले जाते. युनिटमध्ये ठिबक सिंचन व पंख्याच्या वापर केला जातो. जेणेकरून जेणेकरून युनिटमध्ये थंडावा निर्माण होईल.
आकाश काळंगे, ८१८०९९८७११ (शब्दांकन : विकास जाधव)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.