Beekeeping Trainer : मधमाशीपालनासह प्रशिक्षक म्हणूनही कमावले नाव

Beekeeping Business : परागीभवनासाठी मधपेट्या पुरवणे, त्यांची विक्री, मध विक्री या व्यवसायातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. सुमारे आठहजार व्यक्तींना प्रशिक्षण देऊन उत्तम प्रशिक्षक म्हणूनही नाव कमावले आहे.
Beekeeping
Beekeeping Agrowon
Published on
Updated on

Beekeeping Business Success Story : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्‍यात पिरली हे जेमतेम १२०० लोकसंख्येचे गाव आहे. येथील दत्तू नारायण येरगुडे यांची १२ एकर शेती आहे. त्यात धान (भात), सोयाबीन, हरभरा, भाजीपाला, उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल आदी पिके ते घेतात. त्यांच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी प्रयोगशीलता म्हणून संत्रा, मोसंबीचे प्रयोग केले. सुमारे २५० झाडे बागेत होती. सुमारे तीस वर्षे झाल्यानंतर ही बाग काढून टाकली. समस्या वाढल्याने व अर्थकारणाचे गणित न जुळल्याने हे पीक पुढे घेतले नाही.

प्रशिक्षणाने उघडले संधीचे दार

सन २००७ मध्ये भारतीय समाज प्रबोधन संस्थेचे (वरोरा) सचिव तात्यासाहेब धानोरकर यांनी गावात मधमाशीपालनविषयक प्रशिक्षण आयोजन केले होते. त्यात दत्तू यांनीही सहभाग घेतला. यावेळी मिळालेल्या शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून आपणही हा व्यवसाय सुरू करावी अशी प्रेरणा दत्तू यांना मिळाली.

सन २००८ मध्ये त्यांनी संस्थेकडून मिळालेल्या दोन पेट्यांच्या आधारे प्रारंभही केला. अभ्यास, आवड, अनुभव, व्यवसायातील प्रत्येक गोष्टीत पारंगत होण्याचे कौशल्य मिळवणे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्य टिकवणे या गुणांमधून दत्तू मधमाशीपालनात मास्टर होऊ लागले. आज सतरा वर्षांचा त्यांचा तगडा अनुभव तयार झाला असून मधपेट्यांची संख्या १७५ वर पोहोचली आहे.

Beekeeping
Beekeeping : ‘मॉडेल व्‍हिलेज’ चेलका गावात मधुमक्षिका पालन

आजचा मधमाशीपालन व्यवसाय- ठळक बाबी

कोल्हापूर जिल्ह्यातील लोहारी सुपारी कार्यशाळेतून होते तयार मधपेट्यांची खरेदी. या ठिकाणी तयार मधपेट्यांचा दर्जा उत्तम असल्याचे दत्तू सांगतात.

सातेरी मधमाश्यांचे होते पालन. विविध पिकांमध्ये परागीकरणासाठी या मधमाश्यांच्या वसाहती असलेल्या पेट्यांची मागणी राहते. त्यानुसार फुलोरा अवस्थेच्या काळात भाडेतत्त्वावर या पेट्या दत्तू शेतकऱ्यांना पुरवतात. प्रति महिना प्रति पेटी एक हजार ते १५०० रुपये शुल्क त्यासाठी आकारले जाते.

वर्षभरात सुमारे ७० शेतकऱ्यांकडून राहते पेट्यांना मागणी.

शेतकऱ्यांच्या शेतात पेट्या पुरवणे व पुढे तेथून घेऊन येणे हे नित्याचे काम राहते.

याशिवाय मधमाश्‍यांची वसाहत असलेल्या पेट्यांचीही प्रति पेटी आठ हजार रुपये दराने होते विक्री. गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर आदी भागांतून असते पेट्यांना मागणी. वर्षाला ७०, ८ ते १०० पर्यंत पेट्या वितरित होतात.

वर्षभरात सुमारे दीड ते दोन क्विंटलपर्यंत मधाचे संकलन होते. त्याची प्रति किलो १२०० रुपये दराने घरूनच विक्री होते. मधाची शुद्धता व गुणवत्ता असल्याने त्यास मागणी राहते. २००, २५०, ५०० ग्रॅम व एक किलो प्लॅस्टिक बॉटल असे पॅकिंग उपलब्ध आहे.

दत्तू यांनी ‘सिंगल फ्रेम’ असलेले मध काढणी यंत्र (हनी एक्‍स्ट्रॅक्टर) तयार केले आहे. सहा फ्रेम असलेले यंत्रही त्यांच्याकडे आहे. एकाचवेळेस या सहा फ्रेम्समधून मध मिळण्याचे काम होते.

Beekeeping
Beekeeping Training : आदिवासी शेतकऱ्यांना मधुमक्षिकापालनाचे प्रशिक्षण

व्यवसायाने दिली राज्यात ओळख

दत्तू सांगतात, की सुरुवातीला छंद म्हणून दोन पेट्यांपासून सुरुवात केली होती. आज शास्त्रीय पद्धतीने मधमाशीपालन व्यवसाय करतो आहे. त्याने कुटुंबाचे, शेतीचे अर्थकारण सक्षम केलेच शिवाय राज्यात नाव देखील मिळवून दिले. शेतीचा विकास व्यवसायातील उत्पन्नातून करता आला. परागीभवनासाठी पेट्यांचा वापर घरच्या शेतीसाठीही केला. त्यातून सोयाबीन व अन्य पिकांचे उत्पादन वाढण्यास मदत झाली.

कृषी विभाग, आत्मा, ग्रामीण स्वयंरोजगार गट आदी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून दत्तू यांना मधमाशीपालन प्रशिक्षक म्हणून आमंत्रित केले जाते. आजपर्यंत सात हजार ते आठ हजार व्यक्तींना प्रशिक्षित केल्याचे दत्तू अभिमानाने सांगतात.

दत्तू यांनी शेतीला परसबागेतील कुक्‍कुटपालनाचीही जोड दिला आहे. त्यांच्याकडे सुमारे १२० पक्षी आहेत. वर्षाला त्यापासून ५० हजार रुपयांचे उत्पन्न होईल अशी आशा आहे. नजीकच्या काळात शेळीपालनाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. उस्मानाबादी बोकडांची खरेदी झाली आहे.

मधाचे गाव म्हणून मान्यता, पण...

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने पिरली गावाला मधाचे गाव म्हणून मान्यता दिली आहे. सुमारे ५४ लाख रुपयांचा निधी अशा गावांना उपलब्ध करून दिला जातो. त्यातून प्रशिक्षण सभागृह व अन्य बाबींसाठी तरतूद होते. परंतु अद्याप हा निधी पिरली गावाला मिळालेला नाही. त्यामुळे हे काम पुढे सरकलेले नाही.

अपघातानंतरही आशावाद कायम

दिवाळीत कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दुचाकीने जात असताना दत्तू यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या पायाला जबर मार लागला. शस्त्रक्रिया करून त्यांच्या पायात ‘रॉड’ बसविण्यात आला.

या घटनेमुळे शारीरिक हालचाली करण्यावर काही बंधने आली. मात्र दत्तू खचले नाहीत. त्यांनी व्यवसायावर त्याचा कोणताही परिणाम होऊ न देता सुरवातीच्या जोमानेच त्यात वाटचाल सुरू ठेवली. कोशिश करनेवालोंकी हार नही होती हे त्यांनी आत्मविश्‍वासाच्या बळावर सिद्ध केले.

मधमाशीपालनात अनेक वर्षांपासून सातत्य राखणाऱ्या दत्तू यांचा अनेक व्यासपीठांवर सन्मानही करण्यात आला आहे, त्यांना आतापर्यंत सुमारे १५ पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. व्यवसायात व शेतीवर कायम जवळून लक्ष राहावे यासाठी त्यांनी शेतातच घर बांधले आहे. पत्नी कोमल आणि मुलगी भाविका यांचीही त्यांना समर्थ साथ आहे.

दत्तू येरगुडे ९७६७१७१९१२ ९७६६७१०६९३ (व्हॉट्‍सॲप क्र.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com