
अमृता शेलार
University Innovation: मला अमेरिका दौऱ्यामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले (यूसी बर्कले) या जागतिक पातळीवर ख्याती प्राप्त विद्यापीठाला भेट देण्याचा योग आला. ही भेट केवळ एका शैक्षणिक कार्यक्रमापुरती मर्यादित नव्हती, तर ज्ञान, नवोन्मेष आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाचे जगभरातील महत्त्वाचे केंद्र कसे कार्यरत आहे, याचा अनुभव घेण्याची चांगली संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या वास्तव्यासाठी बर्कले शहर हे अत्यंत उपयुक्त आणि समृद्ध वातावरण असलेले ठिकाण आहे. कॅलिफोर्नियामधील सॅनफ्रान्सिस्कोच्या जवळ वसलेले हे शहर शिक्षण, सांस्कृतिक विविधता आणि उदारमतवादी विचारसरणींसाठी प्रसिद्ध आहे.
येथे विविध देशांतून आलेले विद्यार्थी राहत असल्याने बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक समुदायाची अनुभूती मिळते. शहरामध्ये उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. विद्यापीठ परिसरात चालण्याच्या अंतरावर वसतिगृह, कॅफे, अभ्यास केंद्र आणि ग्रंथालयाची सोय उपलब्ध आहे. बर्कले हे पर्यावरणपूरक शहर आहे. विद्यार्थ्यांसाठी शांत, सुरक्षित, आणि अभ्यासपूरक जीवनशैली अनुभवण्यासाठी बर्कले हे आदर्श ठिकाण आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाची भव्य वास्तू, प्रगत प्रयोगशाळा, सर्वसुविधायुक्त वसतिगृहांची सोय तसेच प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण अत्यंत उत्साहवर्धक आहे. २०२४ मध्ये जागतिक विद्यापीठ क्रमवारीत जगातील अव्वल १० विद्यापीठांमध्ये स्थान मिळविणारे अमेरिकेतील एकमेव सार्वजनिक विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे टाइम्स उच्च शिक्षण क्रमवारीनुसार देखील अनेक विषयांमध्ये जागतिक पातळीवर आघाडीवर आहे. यूएस ‘न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट’नुसार या विद्यापीठाचा सार्वजनिक विद्यापीठांमध्ये पहिला क्रमांक आहे.
शिक्षण, संशोधनाची संधी
विद्यापीठामध्ये जगप्रसिद्ध संशोधक, नोबेल पुरस्कार विजेते आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ शिकवतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात मुक्त आणि सृजनशील संवाद घडतो. येथे अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, पर्यावरणशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध अशा अनेक शाखांमध्ये विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मोठ्या प्रमाणावर संधी आहे. सिलिकॉन व्हॅली जवळ असल्याने विद्यार्थ्यांना स्टार्टअप, उद्योग आणि नोकरीसाठी असंख्य संधी उपलब्ध आहेत. अनेक नामवंत कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू येथे घेतले जातात.
या विद्यापीठात ११० हून अधिक देशांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे इथे जागतिक विचारधारा, विविध संस्कृती, आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित होतो. येथे शिक्षण घेताना विद्यार्थी सामाजिक कार्य, लोकशाही, आणि पर्यावरणीय उत्तरदायित्व शिकतात. संकेतस्थळावर विद्यापीठाची सर्व विभागांची माहिती उपलब्ध आहे.
विद्यापीठातील स्टार्टअप कंपन्या सध्या बियाण्यांवर सूक्ष्मजीव आधारित प्रक्रिया, जैविक शेती, व्हर्टिकल फार्मिंग, कृत्रिम जीवशास्त्र आधारित खत निर्मिती, सेन्सर्स आदी तंत्रज्ञानामध्ये संशोधन करत आहेत. विद्यापीठाच्या भेटी दरम्यान मला कृषी, पाणी व्यवस्थापन आणि समुद्र उत्पादन क्षेत्रात झालेल्या संशोधन पाहण्याची संधी मिळाली. अमेरिका आणि विशेषतः विद्यापीठात विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सुरू असलेले संशोधन भारतीय शेतीसाठी उपयुक्त ठरणारे आहे.
कृषी नवसंकल्पना
हे विद्यापीठ कृषी आणि अन्न उत्पादन क्षेत्रातील संशोधनासाठी जगप्रसिद्ध आहे. येथील संशोधकांनी स्मार्ट शेती, टिकाऊ उत्पादन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. येथील वैज्ञानिक आणि संशोधकांनी शेतीसाठी उपयुक्त असलेल्या अनेक उच्च-तंत्रज्ञान प्रणाली विकसित केल्या आहेत. विद्यापीठातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ जेनिफर डूडना यांनी CRISPR-Cas९ या क्रांतिकारी जनुक संपादन तंत्रज्ञानाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे तंत्रज्ञान विविध पिकांमध्ये रोगप्रतिरोधक जाती विकसित करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
प्रयोगशाळांमध्ये विकसित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणालींमुळे पिकांची स्थिती, जमिनीचा पोत आणि सिंचनाची आवश्यकता यावर अचूक अंदाज घेता येतो, ज्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना अधिक वैज्ञानिक आणि प्रभावी निर्णय घेता येतात. येथील संशोधकांनी विकसित केलेले बायो सेंसर तंत्रज्ञान पिकांमधील पोषणमूल्ये, कीटक प्रादुर्भाव आणि विषारी घटकांचे अचूक परीक्षण करण्यासाठी सक्षम आहे.
पाण्याचा पुनर्वापर
विद्यापीठाने पाण्याच्या पुनर्वापरासाठी महत्त्वाचे संशोधन केले आहे. विद्यापीठात जलसंधारण आणि शाश्वत शेतीसाठी विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम केले जाते. शहरांमध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी पुन्हा शेतीसाठी वापरण्यायोग्य बनवले जाते, ज्यामुळे सिंचनाचा खर्च कमी होतो आणि पाण्याचा पुनर्वापर साध्य होतो. सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी जैविक पद्धतींचा वापर करण्यात येत आहे.
फायटोरिमीडिएशन या संकल्पनेवर सक्रियपणे संशोधन सुरू आहे. काही विशिष्ट वनस्पतींच्या साहाय्याने प्रदूषित पाण्यातील विषारी घटक नैसर्गिकरीत्या शुद्ध केले जातात. यामुळे पर्यावरणास हानी न पोहोचवता जलशुद्धीकरण शक्य होते. स्मार्ट सिंचन प्रणालीमध्ये सेन्सर्स, डेटा विश्लेषणाच्या साहाय्याने पिकांच्या गरजेनुसार अचूक प्रमाणात पाणी पुरवले जाते, जे भारतासारख्या देशात अत्यंत उपयुक्त ठरू शकते. या तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते, शेती अधिक कार्यक्षम बनवता येते.
मत्स्यपालनाला चालना
विद्यापीठ आणि आसपासच्या स्टार्टअप कंपन्यांनी बे एरियामधील मत्स्य व सागरी उत्पादन सुधारण्यावर भर दिला आहे. येथील संशोधकांनी मत्स्यपालन आणि मासेमारीच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. प्रयोगशाळेमध्ये शेवाळ आधारित आहार आणि कमी प्रदूषण करणाऱ्या जाळ्यांसारख्या नवकल्पनांची अंमलबजावणी करून अधिक पर्यावरणस्नेही आणि टिकाऊ मत्स्यपालन प्रणाली विकसित केली आहे.
ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य उत्पादन दर्जा आणि सुरक्षिततेची शाश्वती दिली जाते, जे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यास मदत करते. पर्यावरणपूरक मासेमारी धोरणे आणि उपकरणे विकसित केली आहेत. याचा फायदा जगभरातील मत्स्य उत्पादकांना होत आहे.
शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब
विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर विविध पिके तसेच शाश्वत शेतीसाठी विविध तंत्रज्ञान विकसित होत आहे. आंतरपीक लागवड, कंपोस्टिंग, स्मार्ट सिंचन प्रणाली आणि जैवविविधता संवर्धनावर विशेष संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांचे स्टार्टअप्स
विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणाला संशोधन आणि नवकल्पनांशी जोडले गेले आहे. येथे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता, प्रत्यक्ष प्रयोगशाळांमध्ये काम करण्याची संधी दिली जाते. उदाहरणार्थ, डेटा सायन्सचा वापर करून पीक उत्पादन आणि संसाधन व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना स्टार्टअप्स आणि उद्योगांमध्ये इंटर्नशिपची संधी देऊन त्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढविले जाते.
संशोधन सहकार्य, तंत्रज्ञान हस्तांतरण
विद्यापीठामधील अनेक स्टार्टअप्स कृषी, जलव्यवस्थापन आणि सागरी उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या तंत्रज्ञानाने जागतिक कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे. येथील प्रकल्पात उपग्रह प्रतिमा आणि मशिन लर्निंगचा वापर करून पीक उत्पादन आणि संसाधन व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.
amrutavijaykumarshelar@gmail.com
(रिसर्च फेलो,रासायनिक अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञान, तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.