
Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी सोळा वर्षांपूर्वी बळीराजा कृषक शेतकरी उत्पादक कंपनी सुरू केली. लोकपंचायत संस्थेच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय शेती, देशी बियाणे संवर्धन, धान्य खरेदी-विक्री या माध्यमातून तीसहून अधिक गावांतील शेकडो शेतकरी जोडले. अलीकडील काळात पशुखाद्य निर्मिती, दूध संकलन केंद्र, अवजारांचा भाडेतत्त्वावर पुरवठा आदींच्या माध्यमातून कंपनीने वार्षिक दीड कोटीपर्यंत उलाढालीचा आलेख उंचावला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर- अकोले तालुक्यात सुमारे पस्तीस वर्षांपासून लोकपंचायत संस्थेचे मोठे कार्य सुरू आहे. सारंग पांडे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेतर्फे या भागात जलसंधारणाची कामे होऊन अनेक गावांत पाणी उपलब्ध झाले. पीक पद्धती बदलू लागली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या गरजा बदलू लागल्या.
काळाचा वेध घेत शेतीच्या अन्य समस्यांवरही काम करण्याची गरज संस्थेच्या सभासदांना वाटू लागली. त्यातून आश्वी, सावरगाव देपा, वेल्हाळे, घुलेवाडी, सायखिंडी, निमज आदी गावांतील शेतकरी मित्रांनी एकत्र येऊन २००९ मध्ये बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. सध्या राजेंद्र सांबरे अध्यक्ष तर सोमनाथ सोनवणे उपाध्यक्ष आहेत.
गंगाधर चारुडे, बाळू हासे, मंदा पोपट राऊत हे संचालक तर सीताराम पुंजा राऊत तज्ज्ञ संचालक, दत्तात्रेय बाळाजी खेमनर कायदेशीर सल्लागार तर नीलेश सोनवणे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. बाळानाथ सोनवणे यांचेही संस्थेत महत्त्वाचे योगदान आहे. अकोले व संगमनेर भागातील पंचवीस गावांतील पुरुष व महिलांसह ६५५ शेतकरी कंपनीचे सभासद आहेत. लोकपंचायत संस्थेचे कंपनीला मार्गदर्शन मिळते.
सेंद्रिय उत्पादन, देशी बियाणे संवर्धन
बळीराजा कृषक कंपनीने सुरुवातीच्या काळात काही वर्ष सेंद्रिय शेतीमाल उत्पादन, विक्रीसह देशी बियाणे संवर्धनावर भर दिला. तीस गावांत प्रत्येकी पंचवीस शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्वारी, बाजरी, हुलगे, मका, मटकी, चवळी आदी अन्नधान्य, कडधान्यांचे उत्पादन घेतले. या मालाला बाजार दरांपेक्षा वीस टक्के अधिक दर मिळण्याचा प्रयत्न झाला.
दहा वर्षांपूर्वी ‘बळीराजा’ ने इर्जिक ऑरगॅनिक स्पॉट’ नावाने संगमनेर शहरात खरेदी-विक्री केंद्र सुरू केले. शेतकरी स्वतः येथे शेतीमाल आणून देत. त्यातून कंपनीने मोठा ग्राहकवर्ग जोडला. मजूर अडचणीमुळे सध्या हा उपक्रम तात्पुरता बंद आहे. अलीकडील काळात सोशल मीडियाचीही विक्रीसाठी मदत घेतली जात आहे. संगमनेर परिसरातील तीस ते चाळीस गावांत भाजीपाला, फळांचे उत्पादन घेतले जाते.
त्यात प्रामुख्याने फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, दोडके, कारल्याचे उत्पादन घेणारे शेतकरी अधिक आहेत. कांद्याचेही बऱ्यापैकी उत्पादन घेतले जाते. कोरोना काळातील साधारण आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीत विक्री व्यवस्था बंद होती. त्या काळात बळीराजाने पुढाकार घेतला. मुंबईतील मोठ्या निवासी गृहसंकुलांमध्ये शेतमालाची विक्री करत शेतकऱ्यांचे किमान चारशे ते पाचशे कोटींचे नुकसान टाळले.
बळीराजाचे विविध उपक्रम
बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई, खपली व बक्षी गहू, काळभात यांसह विविध पिकांच्या सुमारे १२५ देशी पीकवाणांचे संवर्धन. त्यासाठी संगमनेर, अकोले तालुक्यात २० बियाणे बॅंका कार्य करतात. त्या माध्यमातून काही टन देशी बियाण्याचे होते वाटप. उत्पादन आल्यानंतर नेलेल्या बियाण्यांसह त्यात काही टक्के वाढ करून ते बियाणे परत करण्याची परंपरा बळीराजाच्या सदस्यांनी जोपासली आहे.अकोला भागातील प्रसिद्ध काळभाताची दरवर्षी ग्राहकांना तीन टनांच्या आसपास होते विक्री. त्याचा किरकोळ दर ७० ते ८० रुपये प्रति किलो.
अवजारे बॅंक
मजूर टंचाई लक्षात घेता बळीराजाने यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने अवजारे बॅक सुरू केली आहे. यात नांगरणी, पेरणी, मळणी, काढणी यंत्र, ट्रॅक्टर आदी यंत्रणा उपलब्ध केली आहे.
प्रति एकरी कंपनीच्या सभासदांसाठी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर १८००, इतरांसाठी दोन हजार, ट्रॅक्टर व पेरणी यंत्र सभासदांसाठी १४०० रुपये, तर इतरांसाठी १६००, नांगरणी सभासदांसाठी २६०० व अन्य इतर शेतकऱ्यांसाठी २८००, मळणीसाठी ट्रॅक्टर व थ्रेशर ३२०० तर अन्य शेतकऱ्यांना ३५०० रुपये असे दर ठेवले आहेत. फवारणीसाठी ड्रोनही असून, सभासदांना एकरी ३०० रुपये, तर अन्य शेतकऱ्यांना ते ४०० रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.
शेतीमाल खरेदी
कंपनी शेतकऱ्यांकडून विविध शेतमालाची खरेदी करत आहे. यंदा पाच टन गहू, आठ टन मक्याची खरेदी केली. शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा अधिक दर दिला. धान्य खरेदीसोबतच शेतकऱ्यांनी आणलेल्या अन्नधान्य, कडधान्यांची स्वच्छता आणि प्रतवारी (क्लीनिंग व ग्रेडिंग) करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
सभासदांकडून त्यासाठी प्रति किलो एक रुपया तर अन्य शेतकऱ्यांकडून दीड रुपया शुल्क त्यासाठी घेतले जाते. खरेदी केलेल्या धान्याची थेट ग्राहकांना व काही प्रमाणात व्यापाऱ्यांना विक्री केली जाते.
दुग्ध व्यवसायाला चालना
संगमनेर, अकोले तालुक्यातील शेतकरी दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. शेतीबरोबरच पूरक व्यवसायांमधून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होण्याच्या दृष्टीने सहा महिन्यांपूर्वी कंपनीने दूध संकलन सुरू केले आहे. त्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेची शीतकरण यंत्रणा बसवले आहे. सध्या दररोज दोन हजार लिटर दूध संकलन होते. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या मक्यापासून भरडा तयार करून दिला जातो. बाजारभावांपेक्षा कमी दराने सभासदांना ही सेवा देण्यात येते.
आश्वासक उलाढालीचा पल्ला
कंपनीचे कार्यालय, भाडेतत्त्वावरील गोदाम उभारणी, अवजार बॅंक, स्वच्छता व प्रतवारी यंत्र, पशुखाद्याचे भरडा यंत्र आदी मिळून दीड कोटींच्या जवळपास भांडवल गुंतवणूक झाली आहे. ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गतही सहकार्य मिळाले आहे.
सभासदांच्या भागभांडवलातून अडीच लाखांमध्ये बळीराजाने सुरवात केली होती. आज कंपनीने दीड कोटी उलाढालीपर्यंत मजल मारली आहे. नजीकच्या काळात साडेतीन कोटींचा पल्ला गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कंपनीने काही मजुरांना शाश्वत रोजगारही दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.