
Success Story: सांगली शहरापासून दहा किलोमीटर वसलेल्या बुधगावातील प्रयोगशील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना दिली आहे. यासाठी ‘उमेद’चे मार्गदर्शन मोलाचे ठरले. यातून बुधगावमध्ये विविध महिला गट स्थापन झाले. बुधगावमध्ये श्रीगणेश स्वयंसाह्यता महिला समूह गट आणि स्वामीनी महिला बचत गट कार्यरत आहे.
अर्चना सचिन कोंडेकर आणि छाया श्रीधर शिंदे या गटाच्या सदस्या आहेत. ‘उमेद’च्या रूपाली पाटील, संचिता सुतार यांनी या गटांना मार्गदर्शन केले. गटांसोबत ‘उमेद’ची बैठक झाल्याने या महिलांना व्यवसायाची नवी दिशा मिळाली.
अर्चना सचिन कोंडेकर यांचा जवस, शेंगदाणा आणि कारळा चटणी तयार करण्याचा व्यवसाय आहे. छोट्या यंत्राद्वारे चटण्यांचे उत्पादन करून गाव परिसरात त्या विक्री करत होत्या. ‘उमेद’मार्फत गावात गट स्थापन झाल्यावर त्यांनी व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू केला. चटणी निर्मितीसाठी लसूण मोठ्या प्रमाणात लागतो. लसूण सोलण्यासाठी मनुष्यबळ आणि वेळ जास्त लागतो.
हे लक्षात आल्यानंतर त्यांनी यंत्राद्वारे जलदगतीने लसूण सोलला जातो का? याची चाचणी केली. यातून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील बावडा येथे लसूण सोलून दिला जातो अशी माहिती मिळाली. त्या ठिकाणावरून लसूण सोलून आणून त्याची विक्री सुरू केली. मागणी वाढल्याने त्यांनी यांत्रिकीकरणाचा विचार सुरू केला. परंतु भांडवल कमी पडत असल्याने काय करावे, असा प्रश्न पडला होता.
व्यवसायवाढीच्या दरम्यान अर्चनाताईंना प्रक्रिया उद्योगाच्या विविध योजनांची माहिती मिळाली. मिरज येथील तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेमध्ये अर्ज दाखल केला. याअंतर्गत दहा लाखांचा प्रकल्प उभारण्यासाठी ३ लाख ३४ हजार अनुदान मिळाले. यामध्ये लसूण सोलण्याचे यंत्र, ड्रायर, सिलिंग यंत्र, बल्ब ब्रेकर यंत्रणा खरेदी केली. अर्चनाताईंनी लसूण पावडर निर्मितीचे प्रशिक्षणही घेतले आहे. त्यामुळे येत्या काळात चटणीसोबत लसूण पावडर विक्रीचे ध्येय ठेवले आहे.
विक्रीचे नियोजन
उत्पादनांच्या विक्रीबाबत अर्चनाताई म्हणाल्या, की हॉटेल व्यावसायिक, घरगुती लोकांकडून शेंगदाणा, जवस, कारळा चटणीला चांगली मागणी आहे. ग्राहकांकडून चटणीसोबत सोललेल्या लसणास देखील मागणी वाढते आहे. सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव बाजारपेठेतून लसणाची खरेदी केली जाते. सध्या शेंगदाणा, कारळा चटणी २८० रुपये किलो आणि जवस चटणी २४० रुपये किलो दराने विकली जाते. सोललेले लसूण १०० ते १३० रुपये किलो दराने विकले जातात. बाजारपेठेप्रमाणे दर बदलत राहतात. वार्षिक उलाढालीतून सरासरी १० ते १५ टक्के नफा हाती शिल्लक राहत असल्याने चांगला आर्थिक आधार मिळाला आहे.
अर्चना कोंडेकर ९७६४३८३१५३
बुधगावमधील सुषमा विकास पाटील या आवळा प्रक्रियेतील उद्योजिका. तीन वर्षांपूर्वी पाटील यांनी यशश्री गृह उद्योगाची सुरुवात केली. बाजारपेठेची मागणी लक्षात आवळ्यापासून विविध पदार्थांच्या निर्मितीवर भर दिला. त्यांच्या प्रक्रिया उद्योगात आवळा मुरंबा, लोणचे, सिरप, कॅंडी आणि तेल निर्मिती केली जाते. पारंपरिक पद्धतीने प्रक्रियेसाठी त्यांनी आज्जीकडून मार्गदर्शन घेतले.
उत्पादनांच्या विक्रीसाठी यशश्री ब्रॅण्ड तयार केला. सुरुवातीला मित्र परिवार, पाहुण्यांना उत्पादने दिली. त्यांच्या प्रतिसादानुसार त्यांनी चव आणि दर्जामध्ये बदल केले. उत्पादन करणे सोपे, पण त्याची विक्री करणे तसे अवघडच असते. पहिल्या टप्यात छोट्या स्वरूपात सुषमाताईंनी उत्पादनांची विक्री सुरू केली. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेत विक्री साखळी उभी करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला. सोशल मीडियाद्वारे उत्पादनांची विक्री सुरू केली. या माध्यमातून विक्रीला गती आली.
सांगली शहरासह राज्याच्या इतर भागातून उत्पादनांना मागणी येऊ लागल्याने कुरिअर, पोस्ट, खासगी ट्रान्स्पोर्टद्वारे ग्राहकांना उत्पादने पाठवली जातात. गेल्या वर्षी त्यांनी बुधगावमध्ये विक्री केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात परिसरातील बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी ठेवली जातात. दरवर्षी दिवाळीनंतर सरासरी तीन टन आवळ्याची प्रक्रियेसाठी खरेदी केली जाते. आवळ्यापासून तयार केलेल्या पाच उत्पादनांच्या विक्रीच्या वार्षिक उलाढालीत त्यांनी दोन लाखांपर्यंत मजल मारली आहे.
- सुषमा पाटील ८८३०२२६९८३
प्रत्येक महिलेकडे व्यावसायिक दृष्टिकोन असतोच. तोच दृष्टिकोन प्रत्यक्षात अमलात आणला, की त्यात यश मिळतेच. असेच उदाहरण म्हणजे बुधगावमधील छाया श्रीधर शिंदे. चार वर्षांपूर्वी छाया शिंदे या स्वामीनी महिला बचत गटात सहभागी झाल्या. प्रक्रिया व्यवसाय सुरू असतानाच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून त्यांनी दहा लाखांचा प्रकल्प उभारण्याचा निर्धार केला.
योजनेतून प्रक्रिया प्रकल्पासाठी ३ लाख २५ हजारांचे अनुदान मिळाले. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी फार मोठी मदत झाली. पहिल्यापासून त्यांची उत्पादन विक्रीची व्यवस्था होती, ती बळकट करण्यासाठी घरच्यांची मदत झाली.
सध्या केळी, बटाटा वेफर्स तसेच चिलिमिली निर्मिती आणि विक्री सांगली जिल्ह्याच्या बरोबरीने कर्नाटक, गोवा राज्यातील हॉटेल, दुकान, बेकरीमध्ये केली जाते. प्रक्रिया उद्योगातील व्यवस्थापनाबाबत छायाताई सांगतात, की प्रक्रियेसाठी आम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून केळी खरेदी करतो.
सध्या कच्ची केळी ९ ते २० रुपये प्रति किलो या दराने खरेदी केली जातात. बटाट्याची खरेदी सांगली बाजार समितीतून केली जाते. बटाटा आणि साबुदाण्याच्या मिश्रणातून चिलीमिली हा पदार्थ तयार केला जातो. प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून दहा महिलांना रोजगार मिळाला आहे. प्रक्रिया उद्योगातील वार्षिक उलाढालीतून ५ ते १५ टक्के निव्वळ नफा शिल्लक रहातो. येत्या काळात प्रक्रिया उद्योग वाढीचे त्यांनी नियोजन केले आहे.
छाया शिंदे ९१४५७४९६५२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.