
Wardha News: वायगाव निपाणी (ता. जि. वर्धा) येथील विजय ज्ञानेश्वर शिंदे या भुमिहीन शेतमजूराने शेळीपालनातून परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जातीवंत शेळ्यांची खरेदी करून त्यांचे चार महिन्यांपर्यंत संगोपन करायचे आणि त्यानंतर त्यांची विक्री करून पैसे कमवायचे, अशा अभिनव व्यवसायात विजय यांनी सातत्य राखले आहे.
असे झाले वायगाव निपाणी
वर्धा जिल्हा मुख्यालयापासून दहा किलोमीटरवर असलेल्या वायगाव (निपाणी) या गावाच्या नावात निपाणी शब्द कसा जुळला याविषयी अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. कधीकाळी या गावात पाण्याचे दुर्भिक्ष होते. दीड ते दोन किलोमीटरवरील विहिरीवरून पाणी आणावे लागत होते. पाणी नसल्यामुळेच गावाच्या नावात नि-पाणी शब्द जुळला तो आजही कायम असल्याचे विजय शिंदे सांगतात.
असे आहे व्यवस्थापन
२०१९ मध्ये जमुनापारी जातीच्या जोड्याची खरेदी करण्यात आली. तीन महिन्यांच्या या जोडीसाठी ३० हजार रुपये मोजावे लागले. या जातीच्या शेळीपासून वर्षाला एकच वेत मिळतो. त्यामुळे आणखी २० पिले वर्धा जिल्ह्यातील एका शेळीपालकाकडून खरेदी केली. हजार रुपये किलो याप्रमाणे याची विक्री होते. तीन महिन्यांपासूनच्या पिलांची विक्री केली जाते. जन्मल्याबरोबर याचे वजन साडेतीन किलो असते. तीन महिन्यांत त्याचे वजन १६ ते २० किलोपर्यंत वाढते. सुरुवातीचे अडीच तीन महिने पिले आईच्या दुधावरच राहतात. त्यानंतर ढेप तसेच गहू, हरभरा, मका यांचे मिश्रण भरडधान्य म्हणून दिले जाते. हिरवा चारादेखील दिला जातो.
‘पशुसंवर्धन’कडून सन्मान
पशुसंवर्धन विभागाला २०१७ मध्ये विजय शिंदे यांच्या या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांचे गाव गाठले. त्यानंतर विविध पशु प्रदर्शनात त्यांना आमंत्रित केले जाते, यातून ग्राहकही वाढले. विजय शिंदे यांच्या उद्यमशीलतेची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी देखील गौरविण्यात आले. ‘पशुसंवर्धन’कडून त्यांच्या बिटल जातीच्या शेळीला पाच हजारांचा पुरस्कारही मिळाला.
विजय शिंदे यांचे शेळीपालन
भटक्या जमातीतील विजय शिंदे यांनी दहा वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरुवात केली. सुरुवातीला गावरान शेळीपालनावर भर दिला. दरम्यान काही पशुपालकांपासून बिटल, तोतापरी, गावरानी या सारख्या बाजारात चांगला दर मिळणाऱ्या शेळ्यांची माहिती मिळाली. त्यानुसार तोतापरी आणि बिटल जातीच्या शेळीच्या नर-मादीची खरेदी करण्यात आली.
चार वर्षांच्या कालावधीत बिटलपासून सरासरी १ ते २ याप्रमाणे सात पिल्ले मिळाली. याच्यापासून मिळालेल्या पिल्लांची प्रति नग २० ते २४ हजार रुपयांना विक्री करण्यात आली. संगोपन करून मोठ्या शेळ्या विकण्याऐवजी त्यांची चार महिन्यांची पिले विक्रीवर ते भर देतात. तोतापरी जातीच्या पिल्लांसाठी प्रति नग २० ते २५ हजार रुपयांचा सरासरी दर मिळतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.