Masala Business : ‘टीएसजी’ ब्रॅण्डचा परराज्यांत विस्तार

Spice Industry : श्रीरामपूर (जि. नगर) येथील नानासाहेब तांबे यांनी काही वर्षे कृषी निविष्ठा क्षेत्रातील व्यवसाय केला. परंतु त्यात सातत्याने येणारी आव्हाने ओळखून अभ्यासाअंती ते मसाला उद्योगाकडे वळले. आज त्यांचा ‘टीएसजी’ हा त्यांचा ब्रॅण्ड राज्यासह परराज्यातही पोहोचला आहे.
TSG Brand
TSG BrandAgrowon

सूर्यकांत नेटके

TSG Masala Business : नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील नानासाहेब निवृत्ती तांबे यांच्यासह तिघा भावांचे कुटुंब आहे. दोन बंधू अन्य व्यवसाय पाहतात. नानासाहेब प्रामुख्याने मसाले उद्योग व शेती पाहतात. कुटुंबातील सदस्य त्यांना प्रक्रिया उद्योगात मदत करतात. वडिलोपार्जित १८ एकर शेती असून, शेतीतही विविध प्रयोग सुरू असतात.

नानासाहेबांनी ‘बीएस्सी ॲग्री’ व त्यानंतर ‘एमबीए’ची पदवी घेतली आहे. पूर्वी ते बियाणे, खते आदी निविष्ठांचा विक्री व्यवसाय करायचे. त्यानंतर स्वतःची काही उत्पादने असावीत असे त्यांना वाटू लागले. मग २००६ ते २०१७ पर्यत जैविक व सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते निर्मिती करून व्यवसाय केला.

TSG Brand
Spices Production : घरगुती मसाले निर्मितीत हातखंडा

मात्र या उद्योगात त्यांना कच्चा मालाची उपलब्धता तसेच अन्य समस्या भेडसावू लागल्या. त्यामुळे शाश्‍वती व स्थिरता मिळवण्यासाठी त्यांनी शेतीशी निगडित अन्य उद्योगांची चाचपणी सुरू केली. त्यातून कायम मागणी असलेला व देशभरात विस्तार करणे शक्य असलेला मसाला उद्योग त्यांना अधिक फायदेशीर वाटला.

प्रशिक्षणापासून सुरुवात

तांबे यांनी उद्योगाला सुरुवात करण्यापूर्वी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अन्नप्रक्रिया शाखेत एक महिन्याचे प्रशिक्षण घेतले. जोडीला पुणे येथेही खासगी ठिकाणी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. सुमारे सहा वर्षांपूर्वी श्रीरामपूर येथील औद्योगिक वसाहतीत उद्योगाला सुरुवात झाली.

सुरुवातीच्या काळात सहा महिने यांत्रिकीकरणाचा ‘सेटअप’ उभा राहिला नव्हता. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर अन्य ठिकाणाहून मसाले तयार करून घेतले. उद्योग सुरू केल्यानंतर दोन वर्षांत कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यातून सावरण्यासाठी काही काळ गेला. पुन्हा नव्‍या उमेदीने उद्योग सुरू केला. टप्प्याटप्प्याने उद्योग वाढवताना उत्पादन निर्मिती ते पॅकिंग या प्रत्येक टप्प्यावर यांत्रिकीकरण केले. त्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली.

सुमारे अठरा पदार्थांची निर्मिती

बदलती बाजारपेठ व ग्राहकांची मागणी ओळखून अस्सल गावरान चवीचे मसाले तयार होण्याकडे लक्ष दिले. आज सुमारे १८ प्रकारची उत्पादने त्यांच्या युनिटमध्ये मागणीनुसार तयार होतात. यात मिरची, धना, हळद यांची पावडर तसेच शाकाहारी पद्धतीसाठी पावभाजी, सांबर, बिर्याणी, पनीर, छोले मसालातर मांसाहारी पद्धतीसाठी चिकन, मटण, फिश करी आदी मसाला यांचे उत्पादन घेतले जाते.

TSG Brand
Masala Business : शून्यातून उभारलेला शिवनेरी मसाले उद्योग

याशिवाय शहरांसह ग्रामीण भागातही अधिक मागणी असलेला कांदा लसूण व काळा मसाला यांचेही उत्पादन होते. सर्व उत्पादनांचा ‘टीएसजी’ असा ब्रॅण्ड तयार केला आहे. दर दिवसाला दोन ते तीन टनांपर्यंत मसाले तयार करण्याची उद्योगाची क्षमता आहे. कच्चा मालाची काही प्रमाणातील गरज घरच्या १८ एकर शेतीतून तसेच शेतकरी व गरजेनुसार बाजारपेठेतून पूर्ण केली जाते. या उद्योगात कायमस्वरूपी पाच कामगारांना रोजगार मिळाला आहे. अधिक मागणी आल्यास बाहेरून त्यांची मदत घेतली जाते.

परराज्यांपर्यंत पोहोचला ब्रॅण्ड

घरगुती ते व्यावसायिक असे विविध प्रकारच्या ग्राहकांची गरज ओळखून पाच ग्रॅमपासून ते २५ किलो वजनापर्यंत पॅकिंग केले आहे. जिल्हा, तालुका व गावनिहाय मिळून दोनशेहून अधिक वितरक व उपवितरक नेमले आहेत. श्रीरामपूर येथेही ‘आउटलेट’ सुरू केले आहे. अलीकडील काळात ऑनलाइन पद्धतीला महत्त्व आल्याने या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांच्या ‘प्लॅटफॉर्म’वर उत्पादने उपलब्ध केली आहेत.

महाराष्ट्र ओलांडून गुजरात, मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत ब्रॅण्ड पोहोचवला आहे.छत्तीसगड येथे शासकीय संस्थेला तर निर्यातदारांच्या संपर्कातून न्यूझीलंड येथे पंधरा टन मसाल्याची निर्यात मागील वर्षी करणे शक्य झाले आहे. नानासाहेबांनी शेतीतही प्रयोगशीलता जपली आहे. चार एकरांत तुरीचे तीन खोडवे घेऊन चांगले उत्पादन त्यांनी घेतले आहे. बागायती कापूस शेतीतही त्यांनी प्रयोग केले आहेत.

नानासाहेब तांबे ९९२२९२२३१३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com