Mango Pickle Business : आंबा लोणचे निर्मितीने बदलले आयुष्य

Mango Pickle Success Story : गदाना (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रेखा प्रभाकर चव्हाण यांच्या आंबा प्रक्रिया उद्योगाला सुरुवात झाली. गेल्या चार वर्षांत ‘आई लोणचं’ हा ब्रॅण्ड राज्यभर पोहोचला आहे.
Mango Pickle Production
Mango Pickle ProductionAgrowon
Published on
Updated on

Mango Pickle Production : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गदाना येथील रेखा प्रभाकर चव्हाण यांनी घरची दीड एकर कोरडवाहू शेती सांभाळत गावातील दहा महिलांचा सिद्धी विनायक स्वयंसाह्यता समूह तयार केला. या गटाचे अध्यक्षपद तसेच बचतीसह इतर कामांची जबाबदारी रेखाताई सांभाळायच्या.

त्यांच्या महिला समूहाचे काम पाहून गावातील महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत समूहात सहभागी होण्याची तयारी दर्शविली. रेखाताईंनी गावामध्ये ३७ महिला गटांची स्थापना केली आहे. या गटाचे काम पाहत असतानाच त्यांना उमेद अभियानाच्या माध्यमातून गावातील बचत गटाची सीआरपी आणि महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याची संधी उपलब्ध झाली.

महिला बचत गटाच्या माध्यमातून सीआरपी म्हणून काम करत असताना २०१८ मध्ये रेखा चव्हाण यांची गावात पाणलोटावर काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रशिक्षणासाठी निवड झाली. प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना पाणलोटाच्या कामाचे महत्त्व सांगितले.

गावकऱ्यांनी पाणलोटाचे चांगले काम केल्याने गदाना गाव पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत खुलताबाद तालुक्‍यातून दुसरा क्रमांकावर आले. रेखाताईंनी २०१८ ते २०२१ पर्यंत पाणी फाउंडेशनमध्ये काम केले.प्रक्रिया उद्योगाला मिळाली चालना

Mango Pickle Production
Agriculture Success Story : मिश्रपीक, दुग्धव्यवसायातून मिनाक्षीताईंची यशाला गवसणी

कोरोना काळात बरीच कामे थांबली होती. त्यावेळी बचत गटाचे काम करीत असताना महिलांना बचत करा, उद्योग करा असं आपण सांगतो, त्यापेक्षा आपणच काहीतरी करून उदाहरण उभं करावे असा विचार रेखाताईंच्या मनात आला. पण काय करावे? याचा मार्ग सापडत नव्हता. एक दिवस बचत गटाच्या बैठकीच्या निमित्ताने त्या गेल्या. त्या ठिकाणी बचत गटात काम करणाऱ्या सर्व जणी एकत्र जेवण करत होत्या.

रेखाताईंनी आणलेले आंबा लोणचे सर्वांना आवडले. हे लोणचे रेखाताईंच्या आई भिकूबाई संपत नलावडे यांनी तयार केले होते. त्या वेळी काही महिलांनी एक, दोन किलो लोणचे विकत मिळेल का, अशी विचारणा केली. त्यांच्या आईने पुन्हा मागणीनुसार लोणचे तयार करून दिले. यातून या महिलांच्या नातेवाइकांकडून लोणच्यास मागणी वाढत गेली. त्यामुळे पुन्हा पाच किलो लोणचे त्यांच्या आईने तयार करून दिले.

चव आवडल्याने रेखाताईंना लोणच्यास मागणी वाढू लागली. परंतु शेतीकामामुळे रेखाताईंना लोणचे निर्मितीला वेळ नव्हता आणि आईकडून किती प्रमाणात आंबा लोणचे तयार करून घ्यायचे यालाही मर्यादा होत्या. या दरम्यान दिल्ली येथील मंजिरी शर्मा एका प्रकल्पाच्या कामानिमित्ताने गदाना गावात आल्या होत्या.

त्यांनाही रेखाताईंनी आंबा लोणच्याचे छोटे सॅम्पल तयार करून त्यांच्या ओळखीच्या विविध ठिकाणी देण्याची विनंती केली. शर्मा यांनी दिल्लीमधील ओळखीच्या लोकांना लोणच्याचे सॅंपल दिले. याचा चांगला परिणाम दिसून आला.

Mango Pickle Production
Food Processing Industry : कथा : अन्नप्रक्रिया उद्योग वाढीची

दिल्ली येथील मंजिरी शर्मा यांच्या संपर्कातून रेखाताईंना वीस किलो आंबा लोणच्याची मागणी मिळाली. मागणी वाढत गेल्याने त्याची पूर्तता रेखाताईंच्या आईला करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे रेखाताईंनी आईकडून लोणच्यासाठी गावरान आंब्याची निवड कशी करावी, त्यासाठी कोणत्या घटकांचा वापर करावा, त्याचे प्रमाण कसे असावे, अशी सर्व माहिती अवगत करून मोठ्या प्रमाणात आंबा लोणचे निर्मितीस सुरुवात केली.

चार वर्षांपूर्वी पाच किलो लोणचे तयार करण्यापासून सुरू झालेला प्रक्रिया उद्योग आता ४०० क्‍विंटलपर्यंत पोहोचला आहे. रेखाताईंचे पती प्रभाकर चव्हाण हे शेतीसोबत लोणचे विक्रीचे व्यवस्थापन सांभाळतात. बाजारपेठेत आंबा लोणच्याला स्वतंत्र ओळख मिळण्यासाठी रेखाताईंनी ‘आई लोणचं’ हा ब्रॅण्ड तयार केला. दरमहा लोणचे विक्रीतून पंचवीस हजारांची उलाढाल रेखाताई करतात. यंदा त्यांनी ४०० क्‍विंटल लोणचे तयार केले. पावसाळी हंगाम सोडून आठ महिने लोणच्याला चांगली मागणी असते. प्रति किलो २५० रुपये दराने दररोज स्वतःच्या विक्री केंद्रावरून २० किलो लोणचे विक्री होते.

वर्षनिहाय लोणचे विक्री

२०२१ २ क्‍विंटल

२०२२ १२१ क्‍विंटल

२०२३ १७७ क्‍विंटल

२०२४ ४०० क्‍विंटल (विक्री सुरू)

प्रक्रिया उद्योगाची प्रगती

चव्हाण दांपत्याकडे स्वत:ची दीड एकर शेती. यामध्ये एक एकर मका, अर्धा एकर सीताफळ बाग.

महिलांना रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन. कैरी फोडणाऱ्यांनाही मिळतो रोजगार.

दरवर्षी आठ गावातील शेतकऱ्यांकडून गावरान आंबा खरेदी. यंदा ३५ टन आंबा खरेदी.

छत्रपती संभाजीनगर -जटवाडा मार्टर्गावरील शेवरी फाट्याजवळ लोणचे विक्री केंद्र.

पुणे, नागपूरसह राज्यातील विविध ठिकाणांवरून लोणच्याला मागणी.

छत्रपती संभाजीनगरात सात ठिकाणी मॉल आणि दुकानात लोणचे उपलब्धता.

दररोज दुकान, मॉलमधून ३५ ते ४० किलो लोणचे विक्री.

कामाचा आवाका, अनुभवामुळे ‘सायन्स फॉर सोसायटी‘शी संपर्क.

ओवी शेतकरी उत्पादक कंपनीसाठी पुढाकार. सतरा गावातील ७०० महिलांचा शेतकरी कंपनीमध्ये सहभाग.

प्रक्रिया उद्योगासोबत घेतले शिक्षण

कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी झटणाऱ्या रेखाताईंनी आपले शिक्षण बारावीपर्यंतच मर्यादित न ठेवता मुक्‍त विद्यापीठातून एमए पूर्ण केले. शेती, प्रक्रिया उद्योगाचा रहाटगाडा हाकताना पती प्रभाकर यांची समर्थ साथ त्यांना मिळाली आहे. चव्हाण दांपत्याची पहिली मुलगी साक्षी ही बीसीएस आणि दुसरी मुलगी दिव्या बारावी शिकत आहे. त्यांची देखील प्रक्रिया उद्योगामध्ये चांगली साथ आहे.

- रेखा चव्हाण ८४२१३२०३८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com