Food Processing Industry : कथा : अन्नप्रक्रिया उद्योग वाढीची

Article by Sunil Dsouza : एका दशकापेक्षा कमी कालावधीत, भारताचे अन्न आणि कृषी क्षेत्र अशा प्रकारे बहरले आहे, ज्याला तेजीची लाटच म्हणणे सयुक्तिक ठरेल. कृषी आणि दुग्धोत्पादनापासून ते अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत, सगळे आकडे वाढीचीच कथा सांगतात.
Food Processing
Food ProcessingAgrowon
Published on
Updated on

Journey of Food Processing Industry in India : २०२२-२३ या वर्षासाठी देशातील एकूण अन्नधान्य उत्पादन ३२९६.८७ लाख टन एवढे विक्रमी आहे, जे मागील पाच वर्षांच्या (२०१७-१८ ते २०२१-२२) अन्नधान्याच्या सरासरी उत्पादनापेक्षा ३०८.६९ लाख टन अधिक आहे.  २०२१-२२ मध्ये, भारताने १०७.२४ दशलक्ष टन फळे आणि २०४.८४ दशलक्ष टन भाज्यांचे उत्पादन घेतले. जागतिक दूध उत्पादनात भारताचा वाटा, २४.६४ टक्के असून, दूध उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. २०१४-१५ मधील १४६.३१ दशलक्ष टन वरून २०२२-२३ मध्ये २३०.५८ दशलक्ष टनांपर्यंत, दुधाचे उत्पादन ५.८५ टक्केच्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने वाढले आहे.

अन्न प्रक्रिया क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन (GVA) २०१४-१५ मधील १.३४ लाख कोटी रुपयांवरून २०२१-२२ मध्ये २.०८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे, या क्षेत्राने एप्रिल २०१४ ते मार्च २०२३ दरम्यान ६.१८५ अब्ज अमेरिकी डॉलर्स थेट परदेशी गुंतवणुकीचा इक्विटी इनफ्लो (रोखे-समभागांचा भारतामध्ये वळलेला ओघ, अर्थात परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली भारतीय रोख्यांची खरेदी आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली भारतीय रोख्यांची विक्री यातील फरक किंवा समभागांच्या विक्रीपेक्षा खरेदीत झालेली वाढ) आकर्षित केला आहे. 

कृषी-निर्यातीत, प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीचा वाटा २०१४-१४ मधील १३.७ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये २५.६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एकूण नोंदणीकृत/संघटित क्षेत्रात १२.२२ टक्के रोजगारासह अन्न प्रक्रिया क्षेत्र हे संघटित उत्पादन क्षेत्रातील सर्वांत मोठे रोजगार प्रदाता ठरले आहे.

या गतिमान अन्न आणि कृषी परिसंस्थेत, निकोप नियामक चौकट स्थापन करण्यामध्ये असलेले भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) गंभीर महत्त्व हे अतिरंजित नाही‌. हे प्राधिकरण आपल्या देशाच्या अन्न मूल्यसाखळीमध्ये सुरक्षा आणि गुणवत्तेची हमी देऊन ग्राहकांच्या आरोग्याचे तर रक्षण करतेच, सोबत अन्न उद्योगात वाढ आणि नवोन्मेष यांची देखील भर घालते. एफएसएसएआयने नियमन, मानके आणि कठोर अंमलबजावणी यंत्रणेद्वारे अन्न सुरक्षा सुनिश्‍चित करण्यावर कठोर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपल्या अन्न उत्पादनांवरील विश्‍वास वाढत ग्राहकांमध्ये आत्मविश्‍वासही वाढला आहे.

Food Processing
PM Food Processing Industry Scheme : पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘केव्हीके’मध्ये प्रशिक्षण

प्राथमिक चाचणी प्रयोगशाळा आणि संदर्भ प्रयोगशाळांची (रेफरल लॅब्ज) संख्या (२०१४ मधील १२ वरून २०२३ मध्ये २२ पर्यंत) वाढवून अन्न चाचणी पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या अन्न प्राधिकरणाच्या प्रयत्नांमुळे, अन्न उत्पादनांचा दर्जा आणि सुरक्षा सुनिश्‍चित करण्याची प्राधिकरणाची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. विशेष अंमलबजावणी अभियान आणि पाळत-देखरेख ठेवण्यासाठी राबवलेल्या मोहिमा, भेसळीसारख्या गैरप्रकारांना रोखत, अन्न पुरवठा साखळीत ग्राहकांचा विश्वास वाढवतात. देशाच्या अन्न क्षेत्रातील वाढीशी जुळणारी गती राखत, अन्न प्राधिकरणातील वैज्ञानिक समित्यांची संख्या २०१३ मधील नऊ वरून २१ पर्यंत वाढली आहे.

या समित्या, तृणधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, फळे, भाज्या आणि मसाले, तेल आणि मेद-मेदजन्य पदार्थ, पाणी, मासे आणि मत्स्य व्यवसाय, मांस आणि मांस उत्पादने, मिठाई, जनुकीय बदल घडवलेले जीव आणि अन्नधान्य, खाद्यपदार्थ, खाद्यपदार्थांमध्ये मिसळले जाणारे वर्धक घटक (फूड अॅडिटिव्ह्ज) असे सर्व प्रकारच्या श्रेणीतील खाद्यपदार्थ हाताळतात. आयसीएमआर, सीएसआयआर, आयसीएआर, एनआयएफटीईएम, आयआयटी आणि अन्न सुरक्षा तसेच पोषण क्षेत्रात कार्यरत विविध वैज्ञानिक संस्थांमधील २०० हून अधिक वैज्ञानिक तज्ज्ञांना प्राधिकरणाने यासाठी नियुक्त केले आहे.

एफएसएसएआयने ७०० हून अधिक अन्न मानके विकसित केली आहेत. अन्न विज्ञान, अन्न वापर पद्धती, नवीन उत्पादने आणि फूड अॅडिटिव्ह्ज, प्रक्रिया तंत्रज्ञान आणि अन्न विश्‍लेषणात्मक पद्धतींमध्ये प्रगती यांच्या अनुषंगाने, तसेच अन्न उत्पादनांच्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांमधील फरक कमी करण्याच्या दृष्टीने या मानकांचा आढावा घेतला जातो. गेल्या दशकात, देशाच्या सर्वोच्च अन्न नियामकांनी आपला दृष्टिकोन, कार्य आणि नियामक वितरणाच्या पद्धतीमध्ये एक उल्लेखनीय बदल घडवून आणला आहे,

ज्यायोगे कामगिरी तसेच प्रमुख भागधारकांची मानसिकता- समज या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिले गेले आहे. व्यवसाय सुलभता निर्माण करून अन्न क्षेत्राची खरी क्षमता उपयोगात आणण्यासाठी अनुकूल, सकारात्मक, सहयोगी आणि सर्वसमावेशक वातावरण तयार करण्यास मदत करून, नियामकांनी आपल्या भूमिकेमध्ये, अंमलबजावणीकर्त्या पासून ते  सक्षमकर्ता असा दृश्य बदल केला आहे.

Food Processing
Government Scheme : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना नेमकी काय आहे?

एफएसएसएआय द्वारे इंडियन फूड लॅबोरेटरी नेटवर्क (इनफोनेट) हे भारतीय अन्न प्रयोगशाळांचे जाळे, अन्न सुरक्षा अनुपालन प्रणाली (एफओएससीओ) आणि फूड इम्पोर्ट क्लीयरन्स सिस्टम (एफआयसीएस) ही खाद्यपदार्थ आयात निष्कासन व्यवस्था, यासारख्या डिजिटल मंचांच्या विकासाने, नियम आणि परवाना प्रक्रिया सुलभ करून अन्न व्यवसाय परिसंस्था सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

भागधारकांच्या वाढत्या गरजा आणि मागण्यांसह एफएसएसएआयने, परवाना/नोंदणी शुल्क, कागदपत्रांचे सादरीकरण यासाठी डिजिटल भरणा सुविधा, आणि क्यूआर-कोड युक्त (शीघ्र प्रतिसाद संकेतांक) परवाना/नोंदणी प्रत थेट नोंदणीकृत ई-मेलवर पाठविण्यासारख्या उपाययोजनांद्वारे वापरकर्त्याचा अनुभव वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अधिकाऱ्यांकडून कोणताही हस्तक्षेप किंवा मान्यता न घेता आपला परवान्याचे त्वरित नूतनीकरण करण्याची परवानगी, अन्न व्यवसायांना २०२३ पासून देण्यात आली आहे.

भरडधान्य आणि त्यांचा नियमित आहारात समावेश करण्यावर, एफएसएसएआयने आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ मध्ये काम केले. या उपक्रमामुळे झालेल्या जनजागृतीने, भरडधान्यांनी बनवलेल्या खाद्य पदार्थांच्या मागणीत  लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, एफएसएसएआयने १५ प्रकारच्या भरडधान्यांसाठी गट मानके विकसित केली आहेत. ही गटमानके गुणवत्तेचे आठ निकष मांडतात.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटना आणि एफएओ (अन्न आणि कृषी संघटना) यांनी १८८ सदस्य देशांसह तयार केलेल्या कोडेक्स एलिमेन्टेरियस कमिशन (सीएसी), या आंतरराष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानक संस्थेने, भरडधान्यांवरील भारताच्या मानकांचे कौतुक केले आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये रोम, इटली येथे झालेल्या ४६ व्या सत्रात, भरडधान्यासाठी जागतिक मानके विकासित करण्याचा भारताचा प्रस्ताव स्वीकारला. अन्न सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी आहे आणि पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, पौष्टिक आणि शाश्‍वत अन्न पुरवठा सुनिश्‍चित करण्याच्या उद्देशाने, एफएसएसएआय सोबत आदर्श पद्धतींचा अवलंब करणे, भारताच्या अन्न परिसंस्थेतील भागधारक म्हणून, उद्योगांचे आवश्यक कर्तव्य आहे.

(लेखक टाटा ग्राहक उत्पादनाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com