True Education: सद्‍गुणांचा शोध म्हणजे खरे शिक्षण

Value Based Learning: तुम्ही मुलाला शाळेत का घालता? या प्रश्‍नाचे उत्तर आहे, उत्तम रोजगार संधी मिळण्यासाठी. शिक्षण रोजगारक्षम असावेच, पण केवळ रोजगारनिर्मिती म्हणजे शिक्षण नव्हे. केवळ वित्तकेंद्री धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थाच कोलमडून पडत आहे.
Education
EducationAgrowon
Published on
Updated on

शिवाजी काकडे

Education For Life: एका गावात गौतम बुद्धाचे आगमन झाले होते. त्याच गावात सुदास नावाचा एक गरीब चर्मकार राहत असे. आज सुदासला एक अनोखा चमत्कार पाहायला मिळाला. त्याच्या झोपडीच्या पाठीमागील तलावात बिगरमोसमी कमलपुष्प फुलले होते. ते कमलपुष्प घेऊन तो बाजारात निघाला. कमलपुष्प विकून किमान एक रुपया आपल्याला मिळेल, असा तो विचार करत होता. तेवढ्यात वाटेत त्याला नगरशेठ भेटला.

नगरशेठने सुदासला कमलपुष्पाची किंमत विचारली. सुदास म्हणाला, ‘‘बिगरमोसमी फुल आहे, तुम्हीच द्या काय द्यायचे ते.’’ नगरशेठ म्हणाला, ‘‘मी पाचशे सुवर्णमुद्रा देणार.’’ तेवढ्यात सेनापती तिथे येतो आणि तो म्हणतो, ‘‘हे कमलपुष्प मी घेणार, मी नगरशेठच्या दहा पट सुवर्णमुद्रा देतो.’’ सुदासला आश्‍चर्य वाटले. तो म्हणतो, ‘‘अरे, तुम्ही दोघे वेडे झालात की काय? एवढे महाग फूल घेऊन तुम्ही काय करणार?’’ तेवढ्यात तिथे राजा येतो तो म्हणतो, ‘‘हे कमलपुष्प कुणीही घेणार नाही.

ते मीच घेणार आहे. सेनापतीच्या दहा पट सुवर्णमुद्रा मी देतो.’’ आता मात्र सुदास खूपच आश्‍चर्यचकित होतो. तो मोठ्या हिमतीने राजाला एवढ्या महाग किमतीत फूल घेण्याचे कारण विचारतो. राजा म्हणतो, ‘‘आज आपल्या राजधानीत गौतम बुद्ध आले आहेत. हे बिगरमोसमी कमलपुष्प मला बुद्धांच्या चरणी अर्पण करायचे आहे.’’ बुद्धाचे नाव ऐकताच सुदास म्हणतो, ‘‘हे फूल मला विकायचे नाही. हे कमलपुष्प मीच बुद्धांच्या चरणी अर्पण करणार.’’ ते तीनही जण म्हणतात, ‘‘अरे, सुदास तू वेडा झाला की काय? अरे, फूल विकून तुझी पिढ्यांची दारिद्र्यता मिटेल.’’ सुदास म्हणतो, ‘‘बुद्ध भेटले म्हणजे माझी पिढ्यान् पिढ्यांची दारिद्र्यता मिटलीच की.’’

नगरशेठ, सेनापती आणि राजा बुद्धाच्या दर्शनासाठी निघून जातात. घडलेला प्रसंग ते बुद्धाला सांगतात. थोड्या वेळाने सुदास तेथे पोहोचतो. गौतम बुद्ध सुदासला म्हणतात, ‘‘अरे, सुदास तू फूल विकायला हवे होते. तुझ्या आयुष्याची गरिबी मिटली असती.’’ सुदास त्यावर उत्तर देतो. प्रेमापेक्षा पैसा अधिक मूल्यवान नाही. पैशासाठी हृदय विकता येत नाही. जोपर्यंत हे कमलपुष्प होते तोपर्यंत विकण्याचा विचार होता.

जेव्हा तुमच्या पदकमलाचा विचार मनात आला तेव्हा ते विकण्याचा प्रश्‍नच येत नाही. बुद्ध नंतर आपल्या शिष्यांना उपदेश देतात. सुदास शिकलेला नाही. त्याला लिहिता - वाचता येत नाही. परंतु तो खरा विद्वान आहे. ज्याला जीवनात श्रेष्ठ मूल्यांचा बोध झाला तो खरा विद्यावान. आज शाळा, विद्यापीठांतून विद्यावान नागरिक निर्माण होत नाहीत. आपण मुलांना रोजगार मिळविण्याचे शिक्षण देतो. रोजीरोटी कमावणे ही व्यवस्था आहे, विद्या नाही.

Education
Marathi Medium Education: शिक्षणाची दीपस्तंभ – स्पृहा इंदू!

वित्तकेंद्री शिक्षण आणि समाज

तुम्ही मुलाला शाळेत का घालता? या प्रश्‍नाचे उत्तर आहे उत्तम रोजगार संधी मिळण्यासाठी. शिक्षण रोजगारक्षम असावेच पण केवळ रोजगारनिर्मिती म्हणजे शिक्षण नव्हे. केवळ वित्तकेंद्री धोरणांमुळे शिक्षण व्यवस्थाच कोलमडून पडत आहे. पालक मुलांना नोकरीसाठी शिकवतात आणि शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होण्याची तयारी करून घेतात. आणि बऱ्याचदा परीक्षा घेणारी यंत्रणाच पेपरफुटी किंवा कॉपी करण्यात सहभागी होते. कारण प्रत्येकाचे अंतिम ध्येय आहे पैसा. पैशासाठी वाटेल ते करण्याची कृती म्हणजे आपणास आपला केलेला आत्मघात आहे.

ज्ञानदानाचे, विद्यादानाचे पवित्र क्षेत्र पैशामुळे अपवित्र होत आहे. केवळ शिक्षणव्यवस्थाच नव्हे तर समाजव्यवस्था वित्तकेंद्री होत आहे. समाजात नियम, कायदे, तत्त्वे, मूल्ये यांचा आदर करणाऱ्या व्यक्तीपेक्षा पैश्यावाल्यांना अधिक मानसन्मान मिळतो. काहीही कष्ट न करता, बसून खाणाऱ्या लोकांना नशीबवान समजले जाते. मग प्रत्येकजण झटपट श्रीमंत होऊन चंगळवादी, भोगवादी जीवन जगण्यासाठी धडपड करताना दिसतो.

प्रत्येक ठिकाणी नीतिभ्रष्ट व्यवहार सुरू आहे. सरकारी दवाखान्याला बनावट औषध पुरवठा केल्याची बाब मागे उघड झाली. एका आमदाराने विधानसभेत खरे आणि खोटे पनीर संपूर्ण राज्याला दाखवले. आपल्या पोटात जाते ते अन्न, पाणी देखील आम्ही भेसळयुक्त केले. कारण आम्हाला पैसा कमवायचा आहे. हे सगळं थांबवून नीतिवान, तर्कशील, सहानुभूतीशील, सहृदयी आणि शीलवान नागरिक घडविणे हे काम शिक्षणव्यवस्थेला आणि सामाजिक व्यवस्थेला करावे लागेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाने देखील या दृष्टीने पावले उचलली आहेत.

Education
Maharashtra Education Policy : ‘सीबीएसई’चा आग्रह कशासाठी?

भारतीय ज्ञानप्रणाली

राष्ट्रीय शिक्षण धोरण - २०२० ने भारतीय मूल्यांचा आदर आणि त्यावर आधारित शिक्षणप्रणाली असावी, असे नमूद केले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात शिक्षणाची व्याख्याच जे आत्मिक गुणांचा विकास करते ते शिक्षण अशी केली आहे. सद्‍गुणांचा शोध घेणे म्हणजे खरे शिक्षण आहे. आसक्ती शिकवते ते शिक्षण नव्हे तर माणसाला अनासक्त करते ते खरे शिक्षण. सा विद्या या विमुक्तये. माणसाला अज्ञानातून मुक्त करते ती विद्या.

अशी भारतीय ज्ञानपरंपरा सांगते. ज्ञान, सत्ता आणि पैसा ज्यांच्याकडे आहे त्यांनी त्याग, समर्पण करून ते समाज उभारणीसाठी वापरावे हेच भारतीय संस्कार आणि मूल्य आहे. ज्ञान ही अत्यंत पवित्र आणि मौल्यवान गोष्ट आहे. ज्ञानामुळे भौतिक आणि आत्मिक सुखाचा शोध घेता येतो. प्रत्येकानं आपलं जीवन सुखमय करण्यासाठी ज्ञान मिळवायलाच हवं. पण केवळ भाकरीसाठी शिक्षण घेणे म्हणजे ज्ञान मिळवणे नव्हे. जीविका आणि जीवनविकास या दोनही गोष्टीचे ज्ञान देते तेच खरे शिक्षण.

आज जास्त शिकलेली लोकच आपल्या ज्ञानाचा, अधिकाराचा गैरवापर करताना दिसतात. चांगला रोजगार, पैसा मिळुनही मला अजून काहीतरी मिळवायचं आहे, यासाठी शिकलेले लोक धावताना दिसतात. कारण आपण मुलांना फक्त पैसे कमाविण्याचे शिक्षण देतो. विद्या आणि ज्ञान देत नाही. विनोबा भावे म्हणतात, ‘‘जीवनाची होडी पैशाच्या पाण्यावर चालते हे खरेच आहे. म्हणून कुणी काही पाणी होडीत भरून घेत नाही.’’ भारतीय शिक्षण परंपरेत पैसा, संपत्ती यापेक्षा ज्ञान सर्वश्रेष्ठ मानले आहे.

कोणताही समाज ज्ञान आणि मूल्य यावर उभा राहतो. निकोप समाजव्यवस्था उभी राहण्यासाठी ती ज्ञानकेंद्री असावी लागते. नीती, मूल्य, संस्कार यांना आपल्या परंपरेत मोठे स्थान आहे. ‘विद्या ददाति विनयम्’ हे मूल्य भारतीय परंपरेने आपल्याला दिलेले आहे. ज्या ज्ञानाने, विद्येने माणूस विनयशील होतो ते खरे ज्ञान.

आपल्या सहवासात येणाऱ्या माणसाला आपल्या ज्ञानाचा दर्प नव्हे तर सुगंध यायला हवा. उच्च नैतिक मानवी मूल्ये जीवनात आनंद देतात. केवळ पैसा, सुखलोलुपता यातून समाजाचे अधःपतन होते. अर्थकेंद्री समाजात अशांती निर्माण होते. धनदौलतीपेक्षा शील, चारित्र्य, नीती, मूल्ये, तत्त्व, त्याग, समर्पण, निष्ठा, श्रद्धा, तपश्‍चर्या आणि ज्ञान यांची किंमत अधिक असते. ज्ञानाचे पावित्र्य जपून विद्यावान होण्यास कटिबद्ध होऊया.

: ७८८७५४५५५७

(लेखक सहायक शिक्षक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com