Milk Processing : ‘वाळेखिंडीचे लकडे पेढे ‘ब्रॅण्ड’ लोकप्रिय केला

वाळेखिंडी (जि. सांगली) येथील मनोहर लकडे यांनी १९९८ मध्ये पेढानिर्मिती व्यवसाय सुरू केला. त्यानंतरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीनंतर त्यांची मुले शिवानंद आणि सोमनाथ यांनी जिद्द, चिकाटी, सचोटी, सातत्यातून व्यवसाय सावरला.
Milk Processing
Milk ProcessingAgrowon

सांगली जिल्ह्यातील जत (Jata) या कायम दुष्काळी तालुक्याच्या दक्षिण दिशेला वाळेखिंडी गाव (Walekhindi village) वसले आहे. इथली बहुतांश शेती कोरडवाहूच (Dry Land Agriculture) आहे. गावातील शिवानंद मनोहर लकडे हे युवा शेतकरी. त्यांची पाच एकर शेती आहे.

एक एकरांत डाळिंब पीक (Pomegranate Cultivation) आहे. दहा वर्षांपूर्वी या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. वडिलांचे किराणा दुकान होते. जत तालुक्यात सन २००६-०७ पर्यंत कापसाचे पीक घेतले जायचे. लकडेदेखील हे पीक घ्यायचे.

दरम्यान वडील कापसाचे व्यापारी (Cotton Trader) म्हणून काम पाहू लागले. त्यातून कुटुंबाला आर्थिक हातभार लागला. भागात म्हैसाळ, टेंभूचे पाणी आले. पण या गावात अद्याप योजना न पोहोचल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र आहे.

पेढेनिमिती व्यवसायाचा प्रारंभ

गावातच शिवानंद यांच्या आत्याच्या पतींचे (मामा) हॉटेल होते. ते गावातून दूध खरेदी करायचे. घरातच मोठ्या आकाराचे पेढे तयार करुन हॉटेलमध्ये विक्री करायचे. पुढे ते गावात पोष्ट खात्यात नोकरीस लागले.

साधारण १९९८ च्या सुमारास त्यांनीच मग शिवानंद यांच्या वडिलांना पेढे तयार करण्याचे धडे दिले. दररोज पाच ते सहा किलो पेढे तयार होऊ लागले. त्या वेळच्या दुचाकीवरून पंचक्रोशीतील हॉटेलमध्ये जाऊन विक्री होऊ लागली.

हळूहळू याच व्यवसायावर लकडे कुटुंबाचे अर्थकारण सुरू झाले. त्या वेळी गावात पाच ते सहा पेढा व्यावसायिक होते. परंतु विक्री गावातील किराणा दुकानापुरतीच होती. दरम्यान, शिवानंद यांच्या वडिलांचे निधन झाले.

पुन्हा नव्याने सुरुवात

शिवानंद सांगतात, की वडिलांच्या जाण्याने आधारच गेला होता. आर्थिक ताणही मोठा आला होता. तरीही पेढानिर्मिती सुरूच होती. येणे कमी आणि देणे जास्त अशी स्थिती निर्माण झाली होती.

पण आता खचलो तर पुढे निभाव लागणार नाही आणि आहे तेथून मागे येऊ, त्यापेक्षा पुन्हा नव्याने आणि जोमाने काम करायचे असा विचार केला.

केवळ गावापुरते थांबायचे नाही तर जवळपासच्या तालुक्यांतील बेकरी व हॉटेल व्यावसायिक आणि किराणा दुकानांपर्यंत आपला पेढा पोहोचवायचा असा निश्‍चय केला. त्या दृष्टीने पावले उचलली.

Milk Processing
Animal Feed : बार्शीत दूध संघाच्या पशुखाद्य कारखान्याचे बुधवारी उद्‍घाटन

पेढ्यांचे झाले नाव

विक्री व्यवस्था मजबूत करण्यासाठी शिवानंद जत, सांगोला तालुक्यातील किराणा दुकानांपर्यंत दुचाकीवरून पोहोचले. पण अशा दुकानांमध्ये ग्राहक पेढ्याची मागणी करणार नाही, अशा शंका दुकानदार उपस्थित करीत होते. पण सकारात्मक वृत्ती व चिकाटी कामी आली.

तुम्ही ठेवून तर पाहा, ग्राहकांच्या प्रतिक्रियाही कळवा, असे शिवानंद यांनी त्यांना सांगितले. अखेर अनेक प्रयत्नांनंतर ‘मार्केट’मध्ये वाळेखिंडीचे ‘लकडे पेढे’ असे नाव होऊ लागले.

बाजारपेठेत नाणे खणखणीत टिकवायचे तर उत्पादनाचा दर्जा हवाच हे जाणले होते. ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असेच पेढे तयार करण्याचा निश्‍चय केला. वेगळेपण जपताना ३० ग्रॅम वजनाचा पेढा तयार केला. तो ग्राहकांच्या पसंतीसही उतरला.

नेहमीच्या आकाराचा १५ ग्रॅमचा पेढा सोबत होताच. आज प्रयत्नपूर्वक व्यवसायात स्थिरता मिळवली आहे. यात विक्री व्यवस्था सांभाळणारे शिवानंद यांना उत्पादनाची बाजू सांभाळणारे बंधू सोमनाथ आणि आत्येभाऊ महेश विसापुरे यांचे मोठे सहकार्य आहे.

दुधाची खरेदी

गावातीलच डेअरीसह बेवनूर, नवाळवाड, कोसारी या गावांतून ६.५ ते ७ फॅट असलेल्या म्हशीच्या दुधाची खरेदी प्रति लिटर ६० रुपये दराप्रमाणे होऊ लागली. विशेष म्हणजे दुधापासून दर्जेदार, शुद्ध खवा आणि मग पेढे तयार केले जातात. त्यासाठी दररोज ४०० ते ५०० लिटर दुधाची गरज भासते.

उद्योग विस्तारणार

शिवानंद सांगतात, की सध्या मागणी भरपूर आहे. पण दुधाची उपलब्धता तेवढी नाही. त्यामुळे चोवीस तासांत दोन हजार लिटर दुधावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचा भविष्यातील मानस आहे. संपूर्ण राज्यभर विक्री व्यवस्था उभारण्याचा विचार आहे.

Milk Processing
Clean Milk Production : स्वच्छ दूध निर्मितीवर लक्ष द्या

शंभर मुऱ्हा जातीच्या म्हशींचा आधुनिक गोठा उभारण्याचे नियोजन आहे. पण त्यासाठी एकाच वेळी मोठ्या भांडवलाची गुंतवणूक करणे शक्य होत नाही. सध्या चार म्हशी आहेत. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक व म्हशींची संख्या वाढवण्यात येईल.

त्यामुळे पेढा निर्मितीला घरचे दूध अधिक उपलब्ध होईल.यांत्रिकरणही गरजेनुसार विस्तारण्यात येत आहे. कृषी विभागाकडून आत्मनिर्भर सूक्ष्म अन्नप्रक्रिया उन्नयन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे.

लकडे ब्रॅंड पेढ्याची वैशिष्ट्ये

१) सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर या ठिकाणी बेकरी, हॉटेल व किराणा दुकानदारांना पुरवठा. पुणे, मुंबई येथेही काही प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्सद्वारे पाठवणूक. सुमारे आठ शहरांतून दोनशे ठिकाणी होतो पुरवठा.

२) प्रति किलो ३६० रुपये दर (वजनी पेढ्याचा). वर्षाकाठी सुमारे पाच टनांपर्यंत विक्री.

३) वार्षिक उलाढाल ६० ते ७० लाख रुपये.

४) श्रावण महिना, रक्षाबंधन, गणपती, नवरात्र, दिवाळी त्याचबरोबर दहावी, बारावीचे निकाल या काळात अधिक मागणी.

५) ३० ग्रॅम वजनाच्या पेढा हे वेगळेपण जपण्याबरोबर आकर्षक पॅकिंग.

६) पेढा जिभेवर ठेवल्यानंतर विरघळेल असा मिठास स्वाद.

७) पाचशे लिटर दुधापासून १६० ते १७० किलो पेढे तयार होतात

८) २०१६ मध्ये ‘फूड सेफ्टी’ विभागाचा परवाना

शिवानंद लकडे, ९७६४७४००७५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com