Mango Orchard Farming: आंबा बागेतून शाश्‍वत उत्पन्नाचा आधार

Farmer Success: पांडुरंग बळीराम ढोबळे यांनी पुण्यातील व्यवसायाचा मार्ग सोडून धाराशिव तालुक्यातील गावात परत येऊन केसर आंबा लागवडीत यशस्वी उत्पादन सुरू केले. या शाश्वत उत्पन्नाने त्यांचे आणि परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन बदलले आहे.
Pandurang Baliram Dhoble
Pandurang Baliram DhobleAgrowon
Published on
Updated on

Rural Enterpreneurship: वीस वर्षांपूर्वी तावरजखेडा (ता. जि. धाराशिव) येथील पांडुरंग बळीराम ढोबळे हे गाव सोडून पुण्याला रोजगारासाठी गेले. तेथे विविध कामे केली. कोकणात वाहतूक व्यवसाय करताना आंबा लागवडीबाबत सखोल माहिती मिळाल्याने त्यांनी गावी दोन एकरांमध्ये केसर आंबा लागवड केली. फळबागेतून उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यांनी पूर्णपणे शेतीमध्ये लक्ष दिल्याने शाश्‍वत उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार झाला आहे.

मुरूड ते औसा रस्त्यावर कोंड शिवेलगत पांडुरंग ढोबळे यांची वडिलोपार्जित नऊ एकर जमीन आहे. आई गोजरबाई, वडील बळीराम, पत्नी मनीषा आणि दोन मुली, एक मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. दहावीनंतर १९९६ साली ढोबळे यांनी रोजगारासाठी पुणे गाठले. सुरुवातीला खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर भाड्याने पानटपरी घेऊन व्यवसाय सुरू केला. त्यात चांगला आर्थिक फायदा झाला.

त्यानंतर पाच वर्षे वाहतूक व्यवसाय केला. पुढे तीन वर्षे हडपसरमध्ये हॉटेल व्यवसाय केला. या व्यवसायात मनुष्यबळाच्या समस्यांसोबत अनेक अडचणी होत्या. या दरम्यान त्यांच्या मुलीला आलमला (ता. औसा) येथे तंत्रनिकेतन शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. त्यामुळे २०१५ ला ते कुटुंबासह गावी परत आले आणि शेतीमध्ये लक्ष देण्यास सुरुवात केली. यामध्ये कुटुंबाची चांगली साथ त्यांना मिळाली.

Pandurang Baliram Dhoble
Kesar Mango Farming: केसर आंबा बागेत व्यवस्थापनावर भर

फळबागेच्या दिशेने...

गावी परत येण्यापूर्वी २०१२ मध्ये पांडुरंग ढोबळे हे वाहतूक व्यवसाय करत होते. या काळात ते टेम्पो घेऊन रत्नागिरीला गेल्यानंतर तेथे मित्राची वीस एकर आंब्याची बाग पाहिली. आंबा फळबागेचे अर्थकारण आणि व्यवस्थापन लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शेतीमध्ये आंबा लागवडीचे नियोजन केले. २०१२ मध्ये रत्नागिरी परिसरातून केसर, हापूस, बदामी, मल्लिका आणि पायरी आंबा जातीची कलमे आणून दोन एकरांवर लागवड केली. या लागवडीमध्ये केसर आंबा कलमांचे प्रमाण जास्त ठेवले आहे.

परागीभवनासाठी आंब्याच्या इतर जातींची मुद्दामहून त्यांनी लागवड केली. काळ्या सुपीक जमिनीत आंब्याची लागवड करत असल्याचे पाहून अनेकांना नवल वाटले. त्या वेळी नऊ एकर शेतीमध्ये विहीर, कूपनलिका नव्हती. त्यांच्या वडिलांनी तब्बल तीन वर्षे घागरीने पाणी देऊन कलमांचे चांगले संगोपन गेले. पांडुरंग ढोबळे देखील पुण्याहून महिन्यातून दोन ते तीन वेळा येऊन बागेची काळजी घेत होते. मात्र फळबाग तयार झाल्यावर २०१५ मध्ये ते कायम स्वरूपी गावी स्थायिक झाले.

साधारणपणे २०१६ मध्ये कलमांना फळधारणा सुरू झाली. पहिल्यांदा आलेल्या फळांच्या विक्रीतून त्यांना नऊ हजारांचे उत्पन्न झाले. त्यानंतर जसजशी फळधारणा वाढेल त्या प्रमाणात पुढील टप्प्यात तीस, चाळीस हजारांचे उत्पन्न मिळू लागले. आंब्याच्या दर्जेदार उत्पादनासाठी येडशी (ता. धाराशिव) येथील प्रयोगशील आंबा बागायतदारांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. त्यानुसार बागेची मशागत, खत व्यवस्थापन, कीड,रोग नियंत्रणाच्या उपाययोजना योग्य पद्धतीने सुरू केल्या. त्यानंतर फळधारणेत चांगली वाढ दिसून आली.

Pandurang Baliram Dhoble
Kesar Mango Farming: केसर आंब्यांचा दर्जा राखण्यावर भर

बागेसह हंगामी पिकांचे नियोजन

पांडुरंग ढोबळे यांच्या शिवारात सध्या दोन एकर आंबा बागेसह, दोन एकरांमध्ये ऊस आणि पाच एकरांमध्ये सोयाबीन, तूर, मका, गहू, ज्वारी या हंगामी पिकांची लागवड आहे. शेतीला पुरेसा पाणी उपलब्ध होण्यासाठी चार कूपनलिका आणि शेतात दोन विहिरी आहेत. गरजेनुसार कूपनलिकांचे पाणी विहिरीत सोडले जाते. तेथून ठिबक सिंचनाने फळबागेस पाणी दिले जाते. मध्यंतरी ढोबळे यांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता.

मात्र शेतात जाण्यासाठी अयोग्य रस्ता आणि पावसाळ्यात शेळ्यांमध्ये पसरणारा आजार लक्षात घेऊन त्यांनी नुकसान टाळण्यासाठी हा व्यवसाय बंद केला. त्यानंतर ढोबळे यांनी शेतीमशागतीसाठी ट्रॅक्टरची खरेदी केली. त्यामुळे परिसरात इतर शेतकऱ्यांच्याकडे शेतीमशागतीच्या कामातून उत्पन्नाचा नवीन स्रोत त्यांनी तयार केला. पुण्यामध्ये हॉटेल व्यवसायातून दिवसाला एक हजारांचे उत्पन्न मिळायचे, परंतु मानसिक त्रास भरपूर होता.

आता आंबा बागेतून त्यांना कायमस्वरूपी किफायतशीर उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार झाला आहे. आता मानसिक ताण न घेता फळधारणा हंगामाच्या काळात दीड महिना बागेत चांगले लक्ष दिल्याने उत्पन्नात शाश्वतता आली आहे, असे ढोबळे सांगतात. दर्जेदार फळ उत्पादनामुळे परिसरातील शेतकरी ढोबळे यांच्याकडे फळबाग लागवडीसाठी मार्गदर्शन घेण्यास येतात. या वर्षी त्यांनी परिसरातील आंबा उत्पादकांचा गट तयार केला आहे. या गटाच्या माध्यमातून यंदा नवीन दहा एकरावर केसर आंबा लागवडीचे नियोजन झाले आहे.

फळबागेचे व्यवस्थापन

घरी दुभत्यासाठी गाई, म्हशी असल्याने बाहेरून शेणखत खरेदी करण्याची गरज पडत नाही. दरवर्षी कलमांच्या आळ्यात पुरेशा प्रमाणात शेणखत दिले जाते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून कलमांची जोमदार वाढ होते.

शिफारशीनुसार सेंद्रिय खते, कीडनाशकांचा जास्तीत जास्त वापर. गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी. योग्य वेळी कीड, रोगांचे नियंत्रण केल्याने दर्जेदार फळांच्या उत्पादनात सातत्य. फळमाशीच्या नियंत्रणासाठी सापळ्यांचा जास्तीत जास्त वापर.

कलमांच्या फांद्याची ताकद आणि उंची लक्षात घेऊन मोजकीच फळे ठेवली जातात. वाढीच्या टप्यात दुय्यम दर्जाच्या फळांची विरळणी फायदेशीर ठरते.

ठिबक सिंचनाने पाणी व्यवस्थापन. उपलब्ध पाण्यात सर्व कलमांना पुरेसे पाणी देणे शक्य होते.

यंदाच्या वर्षी तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार पॅक्लोब्युट्राझोलचा वापर.

कलमांची उंची वाढल्याने या वर्षी ड्रोनद्वारे सूक्ष्मअन्नद्रव्यांची फवारणी. याचे चांगले परिणाम दिसून आले.

एप्रिलमध्ये फळांची काढणी सुरू होते. व्यापारी बागेत येऊन आंबे खरेदी करतात. यंदाच्या वर्षी आठ टन उत्पादन. व्यापाऱ्यांना ७० ते ८० रुपये प्रति किलो दराने विक्री. परिसरातील ग्राहकांना आंब्याची ८० ते ९० रुपये प्रति किलो दराने थेट विक्री.

- पांडुरंग ढोबळे ९८६०९४७८९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com