
Mango Crop : बदलत्या वातावरणानुसार आंबा बागेमध्ये परागीभवन न होणं, फळधारणा न होणं तसचं फळगळ आणि फळांवर डाग पडणं अशा समस्या दिसून येतात. त्यामुळे आंब्याचं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे आंबा फळे टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी आणि त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे. आंबा बागेतील फळधारणे नंतरच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
आंबा मोहोरामध्ये नर व संयुक्त फुले ओळखणं आवश्यक आहे. अतिथंडीमुळे फुलांच प्रमाण वाढून संयुक्त फुलांच प्रमाण अतिशय कमी होतं. तसच थंडीमुळे परागीभवन करणारे कीटक कमी प्रमाणात आढळतात. यामुळे परागीभवन न होता आंबा मोहर वाळताना दिसतो. आंबा मोहरातील परागीभवन वाढविण्यासाठी मोहरावरून हात फिरविणे, उंच फांदीवरील मोहोरासाठी बांबूच्या काठीला केरसुणी बांधून फिरवावी.
आंबा बागेत कीटकांना आकर्षित करण्यासाठी सुका मासा पाण्यात भिजवून लटकवावा. यासाठी निकृष्ट दर्जाच्या बांगडा माशाची निवड करावी. माशाला पक्ष्यांपासून वाचविण्यासाठी रिकाम्या बाटलीचा तळ काढून बुचातून तार घालून आत माशाचा काही भाग लटकत ठेवावा. या लटकवलेल्या माशाचा वास पसरावा म्हणून बाटलीला झरोके निर्माण करावेत. यामुळे परागीभवन करणारे कीटक विशेष करून माश्या आकर्षित होऊन आंब्यामध्ये परागीभवन होताना आढळते.
आंबा मोहोराच्या दांडीवर फळे पिवळी होऊन पडताना किंवा देठाजवळ पिवळी रिंग तयार होताना दिसते.अशा वेळी ऑक्झिन संजीवकाची कमतरता निर्माण होऊन अबसेसिक ॲसिड निर्मिती होते. त्यामुळे गळ झालेली दिसते.अशा वेळी फळधारणेनंतर एकाच दांडीवर भरपूर फळे धरली असल्यास उत्तम वाढ होणारी एक ते दोन फळे ठेवून उरलेली फळे काढून टाकावी.
फळे वाटाण्याएवढी असताना आणि पुढे पुन्हा पंधरा दिवसांनी संजीवकाची फवारणी करावी. आलेल्या मोहोराचे एक ठरावीक आयुष्य असते. वाऱ्याचा वेग अधिक असल्यास फळधारणा न झालेली व सुकलेली फुले गळून पडतात. अशावेळी वारा नसल्यास बांबूच्या काठीला लोखंडी हूक बांधून फांदी हलवून सुका मोहर पाडणे, मेलेल्या फांद्या व बांडगूळ काढून टाकणे गरजेचे आहे.फळवाढीच्या अवस्थेत फळे एकमेकाला घासून फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत असल्याचे आढळते.अशावेळी दोन मोठ्या फळांमध्ये सुके पान अडकवणे गरजेचं असतं.
फळांवर डाग पडल्यास फळांचा दर्जा कमी होतो.त्यामुळे कमी दर मिळतो.अशावेळी डागविरहित फळे मिळण्यासाठी २० × २५ सेंटिमीटर आकाराच्या वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करून गोटीच्या आकाराची फळे गळून गेल्यानंतर उरलेल्या फळांना त्यांचे वेष्टण घातल्यास आत सूक्ष्मवातावरण निर्माण होऊन फळांच्या दर्जात सुधारणा होते. साकाविरहित उत्तम दर्जाची फळे उपलब्ध होतात. आंब्याच्या विविध जातींना बाजारात त्यांच्या गुणधर्मामुळे मागणी असते. अवीट गोडीचा हापूस खाण्यासाठी, लोणच्यासाठी, रसासाठी व परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी फेब्रुवारी ते जून या कालावधीत उपलब्ध होतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.