
Mango Farming Management:
शेतकरी नियोजन । पीक : केसर आंबा
शेतकरी ः गजानन कऱ्हाळे
गाव : खानापूर ता. जाफराबाद, जि. जालना
केसर आंबा क्षेत्र : ७ एकर
एकूण झाडे : ३३००
जालना जिल्ह्यातील खानापूर (ता. जाफराबाद) येथील गजानन काळुबा कऱ्हाळे यांची एकत्रित कुटुंबाची ४२ एकर शेती आहे. त्यात आले, ऊस, केसर आंबा, कपाशी, सोयाबीन, कांदा आदी पिकांची विविधता आहे. सुमारे १२ एकरांवर आले, ५ ते ६ एकर ऊस, ७ एकर आंबा, ४ ते ५ एकर कापूस, ३ ते ४ एकर सोयाबीन व ४ एकरांपर्यंत कांदा अशा पीक पद्धतीचा त्यांनी अवलंब केला आहे.
सात एकरांमध्ये विस्तीर्ण केसर आंबा बागेत ३३०० कलम आहेत. ही लागवड १४ बाय ६ फूट अंतरावर आहे. पारंपारिक पिकातून खात्रीशीर उत्पन्न हाती मिळत नसल्याने आंबा तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६-१७ मध्ये केसर आंबा लागवडीचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१८ ते २०२१ या दरम्यान तीन टप्प्यात केसर आंब्याच्या सुमारे ३३०० झाडे लावली.
योग्य व्यवस्थापनातून उत्पादनात सातत्याने वाढ मिळाली आहे. मागील वर्षी एका निर्यातदार कंपनीने आंब्यांचा दर्जा पाहून खरेदी केली. त्यातून चांगले आर्थिक उपन्न मिळाले. यावर्षी पुन्हा आंबा निर्यात करण्याच्या अनुषंगाने तयारी केल्याचे श्री. कऱ्हाळे असल्याचे ते सांगतात.
खत, सिंचन व्यवस्थापन
मार्च, एप्रिल महिन्यात प्रति झाड पाच किलो प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत झाडांना दिले. साधारणतः १० ते २० ऑगस्टच्या दरम्यान आंबा बागेला शिफारसीत घटकांची फवारणी घेण्यात आली.
जूनमध्ये मोठ्या झाडांना प्रति झाड अर्धा किलो, तर लहान झाडाला २५० ग्रॅम या प्रमाणात डीएपी खताची मात्रा दिली.
नोव्हेंबरच्या शेवटी आंबा झाडांना मोहर येण्यास सुरुवात होते. साधारणपणे ६० ते ७० टक्के मोहर आल्यानंतर ठिबकने पाणी देणे सुरू केले.
मोहर आल्यानंतर भुरी रोगाचा प्रादुर्भाव बागेत दिसून आला. त्यासाठी पंधरा दिवसांच्या अंतराने शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यात आल्या.
पावसाळ्यात बागेस सिंचन बंद केले जाते. मार्च व एप्रिलमध्ये पंधरवड्याच्या अंतराने पाटपाणी दिले जाते. बागेत वाफसा स्थिती कायम राहील अशा पद्धतीने सिंचनाचे नियोजन केले जाते.
दर तिसऱ्या वर्षी छाटणी
आंबा बागेत दर तिसऱ्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात झाडांची छाटणी केली जाते.
झाडे सात ते आठ फुटांपेक्षा जास्त उंच वाढणार नाहीत अशा पद्धतीने छाटणी केली जाते.
याशिवाय दरवर्षी आंबा बागेतील काडी काढली जाते. झाडाची वाढ नियंत्रित ठेवल्यास फळे चांगली पोसत असल्याचा गजानन कऱ्हाळे यांचा अनुभव आहे.
आगामी नियोजन
सध्या बागेतील झाडे कैऱ्यांनी भरून गेली आहेत. काही झाडांवर ॲपल बोरच्या आकाराचे आंबे लागले आहेत.
यावर्षी साधारणपणे मे महिन्याच्या १५ ते २० तारखेच्या दरम्यान बागेतील केसर आंबे काढणीस येतील. यावर्षी देखील केसर आंब्याची निर्यात केली जाणार आहे. त्यादृष्टीने कामकाजावर भर देण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून तापमानात चांगली वाढ होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने मागील आठवड्यात बागेला मोकळे पाणी दिले आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन पुन्हा एकदा मोकळे पाणी देण्याचे नियोजन आहे. यापुढील काळात दर पंधरा दिवसांनी एकदा मोकळे पाणी दिले जाईल.
बागेतील फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी सापळे लावले आहेत.
फळांचा दर्जा राखण्यासाठी शिफारशीनुसार रासायनिक फवारणी आणि सिंचनाचे नियोजन केले जाईल.
आगामी काळात केसर आंबा बागेत सिंचना करण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही कामे केली जाणार नाहीत, असे गजानन कऱ्हाळे यांनी सांगितले.
गजानन कऱ्हाळे ९३०९७८१०६८
(शब्दांकन : संतोष मुंढे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.