Kesar Mango Farming: केसर आंबा बागेत व्यवस्थापनावर भर

Success Story: परभणी जिल्ह्यातील कारेगावकर समर्थ सोपानराव आवचार यांनी पाच एकरावरील केसर आंबा बागेत काटेकोर पाणी, खत आणि कीड–रोग व्यवस्थापनाचा अवलंब करून उत्कृष्ट फळ निर्मिती साधली आहे.
Mango Farming
Mango FarmingAgrowon
Published on
Updated on

Mango Farming Mangement:

शेतकरी नियोजन । केसर आंबा

शेतकरी : समर्थ सोपानराव आवचार

गाव : कारेगाव, ता. जि. परभणी

केसर आंबा क्षेत्र : ५ एकर

परभणी जिल्ह्यातील कारेगाव (ता. परभणी) येथील समर्थ सोपानराव आवचार कारेगावकर यांनी दर्जेदार केसर आंबा उत्पादनात सातत्य राखले आहे. बागेत काटेकोर पाणी, खते, कीड व रोग व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो.

समर्थ आवचार कारेगावकर यांनी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी पदवी, तर गुजरातमधील दंतेवाडा येथील सरदार पटेल कृषी विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. उच्चशिक्षण घेऊनही त्यांनी घरची शेती कसण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून फळबाग केंद्रित शेतीवर भर दिला. आवचार कुटुंबाची कारेगाव शिवारात हलक्या ते भारी प्रकारची ४० एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहिरीची सुविधा आहे.

Mango Farming
Kesar Mango Farming: केसर आंब्याच्या आकारवाढीसह दर्जा राखण्यावर भर

केसर आंबा लागवड

समर्थ सोपानराव आवचार यांनी २०११-१२ मध्ये ५ एकर क्षेत्रावर केसर आंब्याच्या ६०० झाडांची लागवड केली आहे. ही लागवड ६ बाय ५ मीटर अंतरावर आहे. मागील काही वर्षात काही झाडांची मरतुक झाली. सध्या या बागेत केसर आंब्याची ४५० झाडे शिल्लक राहीली आहेत. या लागवडीमधून २०१६ पासून केसर आंबा उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. पहिली दोन तीन वर्षे कमी उत्पादन मिळाले. मात्र त्यानंतर दरवर्षी उत्पादनात वाढ होत गेली.

मागील कामकाज

यावर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या ते चौथ्या आठवड्यात मोहोर येण्यास सुरुवात झाली. मोहोर टिकवून ठेवण्यासाठी शिफारशीत घटकांच्या फवारण्या घेण्यात आल्या.

लहान आकाराची फळधारणा सुरु झाल्यानंतर जानेवारीच्या अखेरीस शिफारशीत रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या दोन फवारण्या घेण्यात आल्या.

फेब्रुवारीमध्ये तापमानात बऱ्यापैकी चांगली वाढ झाली. या काळात ठिबक संचाद्वारे पाण्याचे योग्य नियोजन केले. साधारण एक दिवसाआड १ तास सिंचन करण्यात आले. या माध्यमातून प्रतिझाड ७० लिटर पाणी देण्यात आले.

केसर आंब्याचा आकार वाढण्यासाठी ०ः५२ः३४ या ग्रेडच्या अन्नद्रव्यांची फवारणी घेतली.

बागेत नियमित निरिक्षण करण्यात आले. फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी रासायनिक फवारणी घेतली.

मार्च महिन्यात आठवड्यातून एकदा पाच तास प्रतिझाड २०० लिटर प्रमाणे सिंचन केले. याचदरम्यान ठिबकद्वारे ०ः०ः५० या विद्राव्य अन्नद्रव्यांचा वापर, तसेच जिब्रेलीक ॲसिडची फवारणी घेतली.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात फळमाशी सापळे लावण्यात आले.

साधारणपणे १० एप्रिलपासून बागेला पाणी देणे पूर्णपणे थांबविले.

Mango Farming
Kesar Mango Farming: केसर आंब्यांचा दर्जा राखण्यावर भर

आगामी नियोजन

सध्या बागेत केसर आंबा फळांचे तोडे सुरु आहेत. परिपक्व आंबा फळांचा तोडे करण्यात येत आहेत. साधारण १५ मे पर्यंत आंबा उतरणी पूर्ण होईल. त्यानंतर झाडांना काही दिवस विश्रांती दिली जाईल.

हलकी छाटणी करून बागेतील वाळलेल्या तसेच बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या फांद्या काढून टाकल्या जातील. साधारण १० जून पर्यंत छाटणीचे काम पूर्ण होईल. छाटणी केल्यामुळे बागेत भरपूर सूर्यप्रकाश पडेल.

फांद्यांच्या छाटणी केलेल्या भागावर बोर्डो पेस्टचा वापर करण्यात येईल. तसेच शिफारशीत रासायनिक कीटकनाशक तसेच बुरशीनाशकाची फवारणी घेतली जाईल.

जूनमध्ये पहिला पाऊस पडण्याआधी झाडाभोवती चर खोदून १५ः१५ः१५ खतामध्ये झिंक व फेरस (जस्त व लोह) हे घटक मिसळून प्रतिझाड मात्रा दिली जाईल. तसेच शेणखताची प्रति झाड ४० किलो प्रमाणे दिली जाईल.

पहिल्या पावसानंतर पालवी फुटण्यास सुरुवात होते. या काळात रासायनिक बुरशीनाशकाची फवारणी घेतली जाईल. पावसाळ्यात दोन वेळा झाडाच्या बुंध्याभोवती मोरचुदाची फवारणी करण्यात येईल.

आंबा विक्री नियोजन :

आंबा बागेतील उत्पादन खर्चाचा मेळ लावून तसेच बाजारभावाचा अंदाज घेऊन आंब्याची विक्री केली जाते. यावर्षी प्रतिकिलो ६५ ते ७० रुपये दर दिला तरच  थेट बागेतून व्यापाऱ्यांना विक्री केली. व्यापाऱ्यांकडून कमी दराने मागणी झाली, तर स्वतः विक्री करतात. त्यासाठी आंबा झाडावरून काढल्यानंतर साळीचे (साळवण) तणस, गवताचे काड, पेपर कटिंग यांचा वापर करून माच लावून आंबे नैसर्गिकरित्या पिकवितात. कागदी बॅाक्समध्ये १ किलो, ५ किलो,१० किलो वजनामध्ये पॅकिंग करून विक्री केली जाते.

समर्थ आवचार कारेगांवकर ९४२३४४३३१८

(शब्दांकन : माणिक रासवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com